आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशय आणि मत्सर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपलं माणूस फक्त आपलंच असावं, असं प्रेम करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला वाटतं. ही एक अशी गोष्ट असते की ज्यात ती वाटेकरी सहन करूच शकत नाही. मी ज्याची आहे तो सर्वस्वी फक्त माझाच असावा ही भावना त्यामागे असते. मात्र, या प्रेमभावनेचा अतिरेक होतो तेव्हा येतो तो संशय आणि डोकावतो मत्सर. नात्यातल्या अशा बाजूंवरही हिंदी चित्रपटात काही गीतं तयार झाली. आज त्याचीच झलक...

 

“स्त्री चे दुसरे  नाव मत्सर असावे.”
हे शेक्सपिअरने कशाला म्हणायला पाहिजे? आहेच.
स्त्रियांसाठी  प्रेम म्हणजे फक्त प्रेम नसते. भक्तीही असते. निदान त्याच्या प्रेमात असतानाचा प्रत्येक क्षण त्याच्याच नावाचा असतो. स्वत:चे निराळे अस्तित्व ठेवते कुठे ती? हे समर्पण पुरुषाला क्वचित जमते. जेव्हा प्रेमात ती स्वत:ला विरघळून टाकते तेव्हा आपला माणूस आपलाच राहावा, असे वाटणे यात काय चूक आहे?
भागीदारी स्वीकारायला व्यवहार आहे का तो? मी फक्त ज्याची आहे, तो आणखी कुणाचा तरी आहे हा फक्त प्रेमाचा घात नाही तर विश्वासाचा आहे; त्याहीपेक्षा अस्मितेचा. मग गुलाबी रंग जाऊन हिरवट झाला तर नवल काय?
अगदी शेकडो वर्षांपूर्वी राधेचाही झाला.
मधुबन में जो कन्हैया किसी गोपी से मिले
कभी मुस्काये, कभी छेड़े कभी बात करे
राधा कैसे न जले?
कवी जयदेव यांच्या “गीत गोविंद’मध्ये एक सुंदर प्रसंग वर्णिलेला आहे.
राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमात आणि एक वाटेकरी आहे. ती आहे त्याची मुरली. तिला तर कृष्णाच्या ओठांवर स्थान मिळाले आहे. कृष्णाने तिच्यात आपला प्राण फुंकला आहे. राधेचे प्रेम एवढे उत्कट की, तिला कृष्णाची मुरलीशी जवळीक सहन होत नाही मग इतर गोपिकांबरोबर असलेली मैत्री कशी सहन होणार!
याला कृष्णाने दिलेले उत्तर पाहा.
मधुबन में भले कान्हा किसी गोपी से मिले
मन में तो राधा के ही प्रेम के हैं फूल खिले
किस लिये राधा जले
कृष्ण मधुबनात गोपिकांना भेटतो, गप्पा मारतो, अगदी त्यांची मस्करीही करतो पण म्हणून काय झाले? अशा अनेक गोपिका येतील आणि मागच्या दाराने जातील पण राधेचे मनातील स्थान थोडेच कोणी हिसकावणार? कसे कळत नाही तिला?
खरंच समजत नाही तिला, नाही तर असा खेळ तिनेसुद्धा खेळला असताच की!
ही कृष्ण भाषा अजूनही नाही बदलली पण आता अशा कृष्णाला माफी देण्याची राधाची तयारी नाही.
मत्सराची भावना प्रबळ असणारे अजून एक गीत आहे.
जा जा रे जा, बालमवा
सौतन के संग रात बिताई
काहे करत अब झूठी बतियाँ ....
ही तक्रार आहे, मत्सर आहे आणि दुःखसुद्धा आहे.
ही नायिका प्रियकराने फसवलेली. दुसरीबरोबर रात्र घालवून आलेल्या प्रियकराला क्षमा करण्याची तिची तयारी नाही. तिला येण्याचे वचन देऊनही तो रात्री घरी परतत नाही. तेव्हा क्रोधायमान झालेली ती त्याची निर्भर्त्सना करते. ती दु:खी आहेच, निराश आहे आणि अपमानितसुद्धा झाली आहे.
गैर के घर कई रात जगाई
मोसे कहे  तेरे बिना निंद न आयी
कैसो हरजाई दैया.
जा जा रे जा बालमवा…
तो बालम आहेच. एकापाठोपाठ बलमा बदलायला ती काही पुरुषाचे हृदय घेऊन जन्माला आली नाही पण त्याचे अपराध नजरेआड करून त्याला परत मोकाट सोडून द्यायची तिची तयारी नाही. “असा अप्रामाणिक आणि बेवफा तू होऊच कसा शकतोस,’ हा तिचा प्रश्न तिच्या जागी बरोबरच आहे.
यानंतर जी तान येते... वाह! चाबूक.
शंकर जयकिशन यांनी संगीत दिलेल्या बसंत बहार या चित्रपटातील या गीतात लताबाईंनी कमाल केली आहे.
थोडासा मत्सर नात्याला अजून घट्ट बनवतो. प्रेमाची गोडी वाढवतो पण त्याचे प्रमाण वाढले तर मात्र दुरावा वाढतो. संशयाचे बीज रोवले जाते आणि नात्याला वाळवी लागते. खरे तर स्वतःबद्दल आदर आणि आत्मविश्वास असेल, तर मत्सराला जागा उरत नाही.
अपराध या सिनेमात एक गीत आहे.
मुलगा विचारतो, “हमारे सिवा तुम्हारे और कितने दीवाने हैं?”
प्रश्न सहजच आलेला पण त्यातली असूया आणि प्रेयसीबद्दल असलेला अविश्वास जाणवतोच.
मुलगी समजवायचा प्रयत्न करते.
“कसम से किसी को नहीं मैं जानती
और किसी को नहीं पहचानती”
तुला सोडून मी कुणालाही ओळखत नाही हे वदवून घ्यायची गरजच का पडावी!
स्वतःच्या स्थानाबद्दल वाटणारी असुरक्षितता आणि न्यूनगंड हे मत्सराचे प्रमुख कारण असते. मग प्रियकराची किंवा प्रेयसीची, दुसऱ्या व्यक्तीशी असणारी साधी मैत्रीसुद्धा खटकू लागते. एकदा संशयाचा किडा डोक्यात वळवळू लागला की आरोप प्रत्यारोप केले जातात आणि नाते संपते.
या गीतातसुद्धा तेच दिसते. परोपरीने सांगूनही त्याचा विश्वास बसत नाहीच.
एकमेकांवर विश्वास नसेल तर मनातले शल्य बाहेर पडत नाही आणि प्रेमापेक्षा मत्सरच डोईजड होतो.
तो म्हणतो,
छोड़ो-छोड़ो ये तो बहाने हैं, 
हमारे सिवा तुम्हारे और कितने दीवाने हैं?
मत्सर फक्त दुसऱ्यांना त्रासदायक ठरत नाही. त्याच्या आगीत स्वतःचीसुद्धा होरपळ होते हे  वेळेतच समजले तर नात्याची वीण अभंग राहते.

 

बातम्या आणखी आहेत...