आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज सजन मोहे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदी सिनेमात शब्दाला आणि सुराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या भावना, मग त्या आनंदाच्या, दु:खाच्या, विरहाच्या, संतापाच्या, कोणत्याही रसाच्या असोत, व्यक्त करण्यासाठी त्या पात्राला शब्दाचा आधार घ्यावा लागतो. संगीतकार, गीतकार, गायक या गरजेवरच आपले साम्राज्य उभारतात. आपल्या भावना गीतातून त्या पात्रानेच पोहोचवल्या पाहिजे, मग त्याची व्यक्तिरेखा गायकाची असो वा नसो, या आग्रहामुळे मुका माणूससुद्धा स्वप्नात गाऊ शकतो असा विपर्यासही कधी कधी  केला जातो.


काही गाणी मात्र अशी आहेत की ती ज्यांच्याशी संबंधित आहे त्या व्यक्तिरेखा ती गात नाहीत. कोणी तरी तिसरेच त्यांच्या मनातील भावनांना शब्दरूप देऊन जाते. अनेक वेळा सिनेमातील पात्रांना आपल्या भावनांचा अंदाज नसतो. कधी मनातील भावना ओठांवर आणण्याचे धारिष्ट्य नसते. अशा वेळी त्यांची मैत्रीण किंवा अगदी तिऱ्हाईत व्यक्तीसुद्धा आपल्या सुरांच्या साहाय्याने त्यांना जवळ आणते. ही गाणी म्हणजे पार्श्वभूमीला वाजणारी गीते नाहीत. स्पर्शातून, नजरेतून, गप्पांतून माणसांची ओळख होते. ती पक्की करण्याचं काम फक्त ही गाणी करतात. या गीतांमुळे कथा पुढे जायला मदत होते. प्यासा या सिनेमात एक गीत आहे. 


‘आज साजन मोहे अंग लगा लो, जनम सफल हो जाये’
या सिनेमाची नायिका आहे एक सामान्य वेश्या. जगाचे टक्केटोणपे खाऊन व्यावहारिक शहाणपण तिने अंगात मुरवलेले आहे. व्यवसायासाठी आवश्यक म्हणून चेहरा रंगवलेला आहे, पण त्यात तिचा खरा चेहरा ती विसरून गेली आहे. अंगावर घातलेल्या खोट्या दागिन्यांसारख्याच तिच्या भावना, खोट्या आणि तकलादू, पण अजूनही तिला कविता आवडते. तो हळुवारपणा जपला आहे तिने. बागेत भेटलेल्या विजयला कवितेतील ओळी म्हणून भुरळ घालण्याचा प्रयत्न करते खरी, पण जेव्हा तो तिला पोलिसापासून वाचवण्यासाठी, तिची ओळख स्वतःची पत्नी म्हणून करून देतो तेव्हा मात्र तिलाही अनोळखी असलेली एक भावना जन्म घेते. एक अजब आकर्षण. तिने पुरुषी सहवास कंटाळा येईल इतका भोगलेला. पण आता मात्र  कोणाचे तरी होण्यातला, त्या समर्पणातला आनंद तिला हवाहवासा वाटतो. त्यातील अनिश्चितता तिला माहित आहे. त्याचे जग तिच्याहून वेगळे. त्यात तिला स्थान नाही. तरीही त्याच्याकडे खेचले जाणाऱ्या पावलांवर तिचे नियंत्रण नाही.


सखी री बिरहा के दुखड़े सह सह कर जब राधे बेसुध हो ली
तो इक दिन अपने मनमोहन से जा कर यूँ बोली,
आज सजन मोहे अंग लगालो
जनम सफ़ल हो जाये
हृदय की पीड़ा देह की अग्नि
सब शीतल हो जाये
तसा विचार केला तर हे भजन. एक जोगीण गाते हे. मधुरा भक्तीमध्ये देवावर असलेले शारीरिक प्रेम अभिप्रेत आहे. तेच इतके उत्कट की, भक्त त्याच्याशीच एकरूप होतो, त्याच्या अस्तित्वात विरघळून जातो. जोगिणीची जी देवाप्रती ओढ आहे, आसक्ती आहे,  ही ओढ, फक्त राधाची नाही तर ती गुलाबोचीही होते, तिच्या विजयसाठी. जेव्हा गीत सुरू होते तेव्हा ती जिन्याच्या पायाशी आहे, काहीशी साशंक. काहीशी खिन्न. एवढे निर्दयी नमुने पाहूनही पहिल्यांदा पटलेली प्रेमाची ओळख तिला विजयकडे जायला धीर देते. असेच एक गीत जंजीर या सिनेमात आहे. याचा नायक विजय. त्याला एक स्वप्न पडते. बालपणातील काही प्रसंग असावेत, ज्याची काळीकुट्ट सावली त्याच्या मनावर आहे. विजयची स्वप्ने त्याला उद्ध्वस्त करणारी. त्यामुळे त्याला डोळे मिटावेसे वाटतच नाही. त्याचा कोणावरही विश्वास नाही. हसणे, बोलणेसुद्धा मोजून मापून. तो काय स्वत:ला व्यक्त करणार! शब्दांनी त्याची साथ कधीच सोडलेली. पण त्या अंधारातसुद्धा आशेचा किरण बनून ती येते. त्याच्या घरात तिने आश्रय घेतला आहे आणि हळूहळू त्याच्या भोवताली असलेल्या तटबंदी तोडून त्याच्या हृदयात शिरकावसुद्धा केला आहे. त्याची अस्पष्टशी जाणीव, एवढेच नाते आहे त्या दोघांत. त्यांच्या अबोल भावनेला शब्दरूप मिळते ते बंजाऱ्यांच्या गीताने. 


दीवाने हैं दीवानों को न घर चाहिए ना दर चाहिए
मुहब्बत भरी इक नज़र चाहिए
बाहेरची जोडी बेभान होऊन नाचत असते. ते शब्द आणि सूर यांच्या हिंदोळ्यावर झुलत असलेली त्यांची मने, गुंतलेल्या नजरा आणि जरी आजूबाजूचे भान असले तरी हा नवीन पाशसुद्धा आता हवाहवासा. प्रत्येक गोष्ट व्यक्त करण्यासाठी शब्द लागत नाहीत आणि जरी लागले तरी ते पुरेसे होत नाहीत. शब्दांची ताकदसुद्धा मर्यादित असते. काही भावना, काही इच्छा शब्दाच्या आवाक्याच्या बाहेर असतात. जिथे शब्द संपतात तिथे स्पर्श येतो. हे गीत दोन प्रेमिकांना जवळ आणणारे साकव ठरते. सिनेमाच्या इतिहासात दोन अडाणी प्रेमिकांना स्वत:ची भावना समजावून देण्याची कामगिरी अशा अनेक अनाहूत गायकगायिकांनी केली आहे.
प्रिया प्रभुदेसाई, मुंबई
nanimau91@gmail.com

बातम्या आणखी आहेत...