आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्याच आठवड्यात देशाचा ७२वा स्वातंत्र्यदिन आपण साजरा केला. हिंदी चित्रपटांमधून ‘आझादी‘ची भावना अनेक गाण्यांमधून व्यक्त झालेली आहे.
संध्याकाळची वेळ. पार्क माणसांनी फुलून गेले होते. समोरच्या रस्त्यावर वाहनांची गर्दी. न थांबता रहदारी चालू होती. कोणती तरी सभा असावी. संपल्यावर रिवाजाप्रमाणे जन गण मन राष्ट्रगीताला सुरुवात झाली. स्पीकरवर गीत चालू असल्याने रस्त्यावरसुद्धा ऐकू गेले असणार. एक चमत्कार झाला. भर गर्दीच्या रस्त्यावरील रहदारी थांबली. रस्ता ओलांडणारी माणसे डिव्हायडरवर अटेन्शनमध्ये उभी राहिली. कट्ट्यावर बसलेली जोडपी, गप्पांत रंगलेली तरुणाई, निवांत बसलेली म्हातारी माणसे, कुणीही न सुचवता उत्स्फूर्त उभी राहिली. राष्ट्रगीत संपल्यावर परत आपापल्या रस्त्याला लागली. एका मिनिटाच्या या गीतात असंख्य लोकांना, स्वतःचा धर्म, जात, वय, वर्ण विसरून काही क्षण का असेना एकत्र आणण्याचे सामर्थ्य होते.
आज राष्ट्रगीत चालू असताना उभे राहावे की नाही यावर अनेक चर्चा होत आहेत. त्याबद्दल असलेल्या सर्व मतांचा आदर ठेवूनसुद्धा मी एक निश्चित म्हणेन, जेव्हा राष्ट्रगीताचे स्वर छेडले जातात तेव्हा हृदय अभिमानाने भरून येते. नकळत हाताच्या मुठी वळल्या जातात आणि आपल्याही कंठातून “गाये तव जयगाथा” गायली जातेच.
लहानपणी शाळेच्या प्रार्थनेत श्लोकांबरोबर राष्ट्रगीताचा समावेश असायचा. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला झेंडावंदन असायचे. त्या दिवशी वीरकथा, वीरगीतांच्या माध्यमातून देशाचा इतिहास, संस्कृती, परंपरांंची जाणीव व्हायची.
स्वातंत्र्याच्या संग्रामातही वंदे मातरम, मेरा रंग दे बसंती चोला, सारे जहाँ से अच्छा यासारख्या गीतांनी महत्त्वाची भूमिका बजावली. लोकांना प्रेरणा देण्याचे काम या गीतांनी केले.
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र भारताचे.
धर्म, वर्ण, वर्ग या साऱ्याच्या पल्याड जाऊन हे वीर एकत्र आले. श्वास न श्वास खर्ची पडला तो देशाच्या सेवेसाठी. एकच ध्यास, एकच उद्धिष्ट घेऊन जगणाऱ्या वीरांचा एकच मंत्र होता “वंदे मातरम” जो कोणत्याही धार्मिक ग्रंथांपेक्षा पवित्र होता. हा मंत्र ओठावर घेऊन अनेक क्रांतिकारी हसत हसत फासावर गेले.
सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है
देखना है ज़ोर कितना बाज़ू-ए-क़ातिल में है
९ ऑगस्ट १९२५ला एक ऐतिहासिक घटना घडली. भारतीय स्वातंत्र्यसैनिकांनी रेल्वेवर हल्ला करून ब्रिटिश सरकारचा खजिना लुटला. यात भाग घेणारे प्रमुख क्रांतिकारी रामप्रसाद बिस्मिल यांनी हे गीत लिहिले. देशासाठी कुर्बान व्हायची मनीषा हृदयात जागवली आहेच आम्ही, आता फक्त जोखायची आहे ती आमच्या मारेकऱ्यांची ताकद. केवढे हे धैर्य, केवढी ही हिंमत.
ज्या ज्या वीर आणि वीरांगनांनी देशासाठी प्राण अर्पित केले, आपले सर्वस्व दिले त्यांची आठवण करून देणारे हे गीत आहे. लढाईचा नारा देणारे, स्वातंत्र्याची उर्मी जागवणारे हे गीत शहीद भगतसिंग यांच्या जीवनावरील आधारित शहीद या सिनेमात वापरले गेले. बुद्धाने म्हटले आहे, “संशयापेक्षा दुःखदायक असे काहीही नाही. विश्वास उडाला की, माणसे दुरावतात आणि एका सुखद नात्याचा अंत होतो.”
चक दे इंडिया या सिनेमात एक गीत आहे. भारत आणि पाकिस्तानच्या अंतिम सामन्यात जाणून बुजून हरल्याचा आरोप कबीर खानवर लावला जातो. त्याच्या देशभक्तीविषयी शंका घेतली जाते. त्याच्या उद्विग्न आणि हताश मनस्थितीचे वर्णन करताना कवी म्हणतो,
तीजा तेरा रंग था मैं तो
जिया तेरे ढंग से मैं तो,
तू ही था मौला तू ही आन
मौला मेरे ले ले मेरी जान
एका भूमीत जन्मलेले सर्वच, तिची लेकरे असतात. तुमचा रंग भले बहुसंख्यापेक्षा वेगळा असेल पण तुमचा प्रामाणिकपणा, भूमातेविषयी असलेली तुमची निष्ठा ही तेवढीच सच्ची असते.देशभक्ती ही कोणा एका धर्माची, वर्णाची मक्तेदारी नाही. तिरंग्यातला तिसरा रंग हिरवा आहे. हिरवा रंग हा इस्लामचा रंग. इस्लाम हा शांतीचा, प्रेमाचा, बंधुत्वाचा संदेश देणारा विचार आहे. परमेश्वराप्रत नेणारा मार्ग आहे. इथे कवी जयदीप सहानी म्हणतात, मीसुद्धा या तिरंग्याचाच एक घटक आहे. मग माझ्यावर अविश्वास का? हे मौला, मातृभूमीच्या सन्मानासाठी माझी प्राण देण्याचीही तयारी आहे. तसे झाले तर कदाचित लोकांच्या मनातील माझ्याबद्दल असलेल्या अविश्वासाचा अंधःकार दूर होईल.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जन्माला आलेल्या या पिढीला स्वातंत्र्याचे महत्त्व माहीत नाही. शब्दांपेक्षाही सूर निरागस अंतःकरणाला सहज समजतात. स्वतःच्या मातृभूमीची ओळख त्यांना लहान वयातच करून देण्याचे काम हे सच्चे सूर करतात. माझी आई, माझे वडील, भावंडे याचबरोबर हा देशही माझा आहे ही भावना अंगात रुजायला या देशभक्तीपर गीतांचा महत्त्वाचा वाटा आहे.
- प्रिया प्रभुदेसाई, मुंबई
nanimau91@gamil.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.