आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रियंका आयी...(अग्रलेख)

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

१९९९च्या लोकसभा निवडणुकांत उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यापुढे भाजपने अरुण नेहरू यांच्या रूपाने आव्हान उभे केले होते. त्या वेळी प्रचारात, 'अरुण नेहरू यांनी माझ्या वडिलांचा (राजीव गांधी) विश्वासघात केला, त्यांना तुम्ही कसे मत देता?' असा सवाल प्रियंका गांधी यांनी मतदारांना विचारला. या सवालाने मतदारसंघाचा नूर पालटला व तेथे सोनिया निवडून आल्या. बरोबर २० वर्षांनी प्रियंका गांधी काँग्रेसच्या एक प्रभावशाली नेत्या म्हणून प्रत्यक्ष राजकारणात उतरल्या आहेत. सोमवारी त्यांनी योगी आदित्यनाथ यांचे साम्राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये येऊन रोड शो केला. या रोड शोला तुफान प्रतिसाद मिळाला. प्रियंका यांची सकारात्मक देहबोली, त्यांचा सहज वावर, लोकांशी थेट संवाद साधण्याची कला याने हा रोड शो गाजला. शिवाय उ. प्रदेशातीलच नव्हे तर देशभरातील लाखो काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये या रोड शोमुळे भलताच उत्साह दिसून आला. आजपर्यंतच्या लोकसभा निवडणुकांत प्रियंका काँग्रेसतर्फे प्रचार करत होत्या. पक्षाच्या राजकीय निर्णय प्रक्रियेत, धोरणांमध्ये त्यांचा सहभाग अभावाने असे. तरीही सर्वच काँग्रेसजनांना प्रियंका आज ना उद्या पक्षाची सूत्रे हाती घेतील, गर्तेत गेलेल्या काँग्रेसला बाहेर काढतील, मोदींच्या राजकारणाला तगडे आव्हान देतील, असे वाटत होते. आता या चर्चांना विराम मिळाला आहे. प्रियंका यांच्या राजकीय प्रवेशामुळे हेही दिसून आले आहे की, गांधी घराण्याच्या बाहेरचे नेतृत्व काँग्रेस पक्षाला उभारी देऊ शकत नाही. दुसरीकडे प्रियंका यांच्या एंट्रीमुळे विरोधकांना काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करण्यास संधी मिळणार आहे. तरीही प्रियंका यांची उत्तर प्रदेशातील नाट्यमय एंट्री ही आगामी राष्ट्रीय राजकारणाला वळण देणारी ठरू शकते, इतकी महत्त्वाची आहे. संपूर्ण उ. प्रदेशात काँग्रेसला म्हणावा तसा जनाधार नाही. २००९मध्ये २२ लोकसभा जागा जिंकल्या असल्या तरी पुढे काँग्रेसची सातत्याने घसरण दिसून येते. त्यात काही दिवसांपूर्वी समाजवादी पार्टी व बसपा यांनी त्यांच्याशी युती न करण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेस एकाकी पडली आहे. ही परिस्थिती पाहता काँग्रेसने प्रियंका यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पार्टी, बसपा व भाजप या तिघांच्या विरोधात एकटेपणाने संघर्ष करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो महत्त्वाचा आहे. प्रियंका यांना एकाच वेळी सवर्ण, दलित, अल्पसंख्याक व ओबीसी असा मतदार आपल्याकडे वळवायचा आहे. काँग्रेसकडे असा सर्व जातींचा जनाधार आल्यास या पक्षाची राष्ट्रीय प्रतिमाही उजळू शकते. त्यांच्या नेतृत्वाने राज्यात काँग्रेस पुनरुज्जीवित झाल्यास, राज्यात सर्वाधिक लोकसभा जागा व विधानसभेत एकहाती विजय मिळाल्यास भारतीय राजकारणात तो शक्तिशाली असा राजकीय भूकंप असेल. 


प्रियंका यांचा राजकारणातील प्रवेश लाखो काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करणारा आहेच, पण देशातील प्रसारमाध्यमांना, सोशल मीडियाला आता चर्चा करण्यास एक नवा चेहरा सापडला आहे. माध्यमांना नव्या चेहऱ्याचा, नव्या राजकीय मांडणीचा हव्यास असतो. त्यांना राजकारणात सततचा कलगीतुरा हवा असतो. चेहऱ्यांची लढाई झुंजवण्यात तर ते वाकबगार असतात. म्हणून गेली दहा वर्षे विशेषत: इलेक्ट्रॉनिक माध्यमे व सोशल मीडियाचा प्रभाव व प्रसार वाढल्यानंतर माध्यमांना राज ठाकरे, अण्णा हजारे, मोदी, राहुल गांधी, डॉ. मनमोहन सिंग, सोनिया गांधी, केजरीवाल अशा विविध चेहऱ्यांमध्ये कमालीचा रस आलेला दिसून येतो. या माध्यमांना २०१४च्या अगोदरपासून प्रियंका केव्हा एकदा राजकारणात येतात याची घाई झाली होती. त्या काळातले मोदींचे झंझावाती प्रचारदौरे, त्यांची विकासपुरुष म्हणून निर्माण करण्यात आलेली प्रतिमा व त्यांची काँग्रेसवर प्रहार करणारी आक्रमक शैलीतली भाषणे यांचा सामना करण्यासाठी तेवढ्याच क्षमतेचे प्रभावशाली नेतृत्व काँग्रेसमध्ये दिसत नसल्याने प्रसारमाध्यमांना 'चेहऱ्यांची लढाई' खेळता येत नव्हती. आता ही लढाई खेळण्यास, निवडणुका विकण्यास माध्यमे सज्ज होतील. पण बहुसांस्कृतिकता असलेल्या आपल्या लोकशाहीने आजपर्यंत प्रतिमांच्या खेळाचे तोटे व धोके अनुभवले आहेत. केवळ करिष्म्याच्या बळावर जनसामान्यांचे प्रश्न चुटकीसारखे सुटतात असे आजपर्यंत झालेले नाही. मोदींची माध्यमांनी निर्माण केलेली प्रतिमा हे एक त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रियंका यांना दुसरी इंदिरा गांधी संबोधणे हाही एक मूर्खपणा आहे. प्रियंका यांची प्रतिमा देशातील वृद्धांना, महिलांना, तरुणांना, बुद्धिवाद्यांना भूरळ घालणारी असली तरी त्यांच्या राजकारणातील प्रवेशाने देशात सर्व काही आलबेल होईल असा समज करून घेणे हा भाबडेपणा ठरेल. आपली लोकशाही बहुसांस्कृतिक समाजाचे प्रश्न सोडवणारी बहुपक्षीय आहे. ती दोनच प्रमुख उमेदवार असलेल्या अध्यक्षीय पद्धतीची नाही हेही समजून घेतले पाहिजे. 

 

बातम्या आणखी आहेत...