आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियंका गांधी शाेधणार लाेकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणे; आज उत्तर प्रदेशच्या दाैऱ्यावर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ  - नुकत्याच पार पडलेल्या लाेकसभा निवडणुकीत झालेल्या लाजिरवाण्या पराभवाची कारणे काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वढेरा व मध्य प्रदेशमधील पक्षाचे तरुण नेते ज्याेतिरादित्य शिंदे हे शाेधणार आहेत. त्यासाेबतच उत्तर प्रदेशात २०२२ मध्ये हाेणाऱ्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी रणनीतीदेखील आखणार आहेत. 


काँग्रेसच्या पूर्व उत्तर प्रदेशातील महासचिव प्रियंका गांधी या मंगळवारी दाेनदिवसीय दाैऱ्यावर रायबरेलीला जाणार असून बुधवारी त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्या बैठकीत श्रीमती गांधी पूर्वेकडील राज्यात पक्षाच्या ४० जागांवरील दयनीय कामगिरीवर विचारविनिमय करतील. रायबरेलीतील प्रस्तावित सुमारे सात तासांच्या मॅरेथाॅन बैठकीत राज्यातील ४० मतदारसंघात पक्षाच्या झालेल्या पराभवाबाबत उमेदवार व जिल्हाध्यक्षांशी चर्चा करणार आहेत. याशिवाय ११ जून राेजी संध्याकाळी सात वाजता फुरसतगंज विमानतळावरून भुईमऊ येथील विश्रामगृहाकडे रवाना हाेतील. त्यानंतर बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता पूर्व उत्तर प्रदेशातील पक्षाच्या बैठकीत सहभागी हाेतील.


संध्याकाळी ५ वाजेपर्यंत चालणाऱ्या या बैठकीत कार्यकर्ते व ज्येष्ठ नेत्यांशी संवाद साधून पुढील आदेश देणार असून त्यानंतर रात्री नऊ वाजता दिल्लीकडे रवाना हाेणार आहेत. यापूर्वी प्रियंका गांधी यांचा शनिवारी प्रस्तावित असलेला प्रयागराजचा दाैरा शेवटच्या क्षणी रद्द झाला हाेता. दुसरीकडे पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रभारी ज्याेतिरादित्य शिंदे हेदेखील १४ जून राेजी उत्तर प्रदेशचा दाैरा करणार असून पक्ष कार्यकर्त्यांच्या बैैठकीत पराभवाच्या कारणांचा शाेध घेऊन पक्षाला नवी ऊर्जा व शक्ती देण्यासाठी रणनीती आखणार आहेत. तसेच पक्षाचे आजी-माजी खासदार, आमदारांशीही पराभवावर चर्चा करणार आहेत. दरम्यान, लाेकसभा निवडणुकीत काँग्रेसला उत्तर प्रदेशातील रायबरेलीची एकमेव जागा जिंकण्यात यश आले. त्यामुळे तेथील मतदारांचे आभार मानण्यासाठी संयुक्त पुराेगामी आघाडीच्या अध्यक्षा साेनिया गांधी या बुधवारी रायबरेलीत जाणार आहेत. या वेळी त्या नागरिकांशी संवाद साधून पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले. 

 

आत्मचिंतन करून सुधारणेचा प्रयत्न करू : शिंदे 
शिवपुरी - लाेकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणे शाेधून आत्मचिंतन करू. तसेच यापुढील कामगिरीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्यासह लाेकसेवक या नात्याने आपल्या मतदारसंघाची नेहमी सेवा करत राहू, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व पक्षाचे महासचिव ज्याेतिरादित्य शिंदे यांनी साेमवारी सांगितले. ते शिवपुरी येथे पत्रकारांशी बाेलत हाेते. शिंदे म्हणाले की, मी माझ्या जीवनात अन्नदाता व जनतेलाच माझा ईश्वर मानले आहे. त्यामुळे ते जाे निर्णय देतील ताे मला मान्य असेल. तसेच पराभव झाला असला तरी या मतदारसंघाशी असलेले नाते कायम राहील. त्यामुळे यापुढेही मी माझ्या मतदारसंघाची सेवा करत राहीन. पराभवाबद्दल मी काेणाकडेही बाेट दाखवणार नाही व माझी तशी सवयही नाही. त्यामुळे मी आत्मचिंतन करून सुधारणा करीन, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, यापूर्वीही शिंदे यांनी मतदारसंघातील लाेकांशी चर्चा केली. 

बातम्या आणखी आहेत...