आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्यात प्रियंका गांधी घेणार दोन सभा? सभा घेण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवल्याची सुशीलकुमार शिंदे यांची माहिती 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. लोकसभा निवडणुकीची मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. त्यापूर्वीच प्रदेश काँग्रेस राज्यात प्रचाराची राळ उडवून देणार आहे. त्यासाठी काँग्रेसच्या स्टार नेत्या प्रियंका गांधी यांच्या राज्यात दोन सभा ठेवण्यात येणार आहेत, त्यासंदर्भातला प्रस्ताव दिल्लीला पाठवण्यात आला आहे, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व कँपेन समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवारी दिली. 

 

परळच्या टिळक भवनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कँपेन समितीची शिंदेंच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्यात वातावरण निर्मिती करण्यासाठी चार मोठ्या सभांचे नियोजन करण्यात आले. त्यातील दोन प्रियंका यांच्या, तर दोन सभा राहुल गांधी यांच्या असणार आहेत. राहुल यांची पहिली सभा १३ फेब्रुवारी रोजी सुशीलकुमार शिंदे यांच्या सोलापूर जिल्ह्यात घेण्यात येणार आहे. प्रियंका यांच्याकडे सध्या उत्तर प्रदेशच्या एका भागाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रियंका गांधी यांचे भाषण व त्यांचे व्यक्तिमत्त्व याविषयी जनतेमध्ये कमालीचे औत्सुक्य आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रियंका यांच्या सभा मोठ्या आकर्षणाचा विषय असणार आहे. प्रियंकाच्या रायबरेली, अमेठीच्या यापूर्वीच्या सभा चर्चेच्या विषय ठरल्या गेल्या आहेत. त्यामुळे प्रियंकाच्या सभा घेण्यासंदर्भात बैठकीत आग्रही मागणी झाली. आचारसंहिता जाहीर झाली की सभांचा खर्च उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट होतो. त्यामुळे राहुल व प्रियंका यांच्या दोन-दोन सभा आचारसंहिता लागण्यापूर्वी घ्याव्यात. त्यामुळे प्रदेश काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत चैतन्य येईल, असा काँग्रेसच्या नेत्यांनी बैठकीत सूर लावला होता. 

 

या बैठकीत राज्यात विभाग, जिल्हा व तालुका पातळीवर कँपेनच्या उपसमित्या स्थापन करण्यात आल्या. या समित्या प्रचारासाठी कोणते नेते आणावेत, त्यांच्या सभा कुठे घ्याव्यात यासंदर्भातली शिफारस करणार आहेत. 

 

महाराष्ट्रात ६४ जणांची 'जंबो' प्रचार समिती 
प्रदेश काँग्रेसच्या कँपेन समितीत तब्बल ६४ नेते आहेत. सुशीलकुमार शिंदे या समितीचे अध्यक्ष असून अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, मुकुल वासनिक, संजय निरुपम, कुमार केतकर अशी दिग्गज मंडळी त्यात सदस्य आहेत. 
 

बातम्या आणखी आहेत...