आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेशर कशाचं ?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळा-कॉलेजात शिकणारं आपलं लेकरू प्रत्येक वेळी पहिल्या क्रमांकानंच पास व्हावं असं प्रत्येक पालकाला वाटत असतं. पण यामुळे येणाऱ्या पिअर प्रेशरखाली विद्यार्थी अत्यंत दबून जातात. त्यांची वाढ, त्यांचा नैसर्गिक विकास खुंटतो. पालक आणि विद्यार्थी यांच्यातला दुवा असणारे शिक्षकच विद्यार्थ्यांना यातून बाहेर काढू शकतात.   

 

खरं तर ही गोष्ट मागच्या वर्षीची. जेव्हा मी सीनियर डिपार्टमेंटला होते. यंदा ज्युनियरला आहे आणि अनुभव तसेच येत आहेत.


ज्युनियरच्या म्हणजे अकरावी-बारावीच्या मुलांच्या परीक्षा झाल्यात. त्यांचे मार्क्स दाखवायला कॉलेजने पालकांना बोलवायला सांगितलंय. आमचे सीनियरचे प्रॅक्टिकल्स सुरू होते आणि तिथंच ज्युनियरच्या शिक्षकांना भेटायला पालक येत होते. एक मुलगी तिच्या बाबांबरोबर आलेली. सरांनी पेपर्स दिले.
पालक - हे काय अहो सर? सगळ्याच विषयांत कमीयत.
शिक्षक - करेल कव्हर. आता प्रिलिमला जास्ती मिळवेल.
पालक - प्रत्येक विषयात चारपाच चारपाच कमीयत. गणितात तर दहा कमी. सर, अहो मी रिअल इस्टेटमध्ये आहे. (खिशातलं कार्ड काढून सरांना दिलं.) पोरीला सिव्हिल इंजिनिअर बनवायचंय. आणि ही तर असं करतीय. काय करायचं?
(पोरीकडे बघून) - हे काय? या प्रश्नाचं तर कायच लिहिलं नाही? या केमिस्ट्रीमध्ये किती लाल खुणा सरांच्या? यासाठी शिकवतोय का? पैसा भरून ट्यूशन लावल्या ना? काय कमी केलं?
(पोरगी बिचारी भेदरलेली. काहीच बोलली नाही.)
सर, काय करू सांगा? कशानं कमी पडत असतील मार्क्स?
आता मात्र मला राहावलं नाही.
‘काही नाही काका, तिला कमी मार्क्स प्रेशरमुळे पडतायत.’
पालक - अहो मॅडम, आम्ही नाही प्रेशर टाकत.
मी - काका, प्रेशर तुमचं किंवा सरांचं नाही, समाजाचं आहे. सगळ्यांना त्यांच्या मुलांना पहिलं आणायचंय. डॉक्टर वा इंजिनिअर बनवायचंय. तिला कशात इंटरेस्ट आहे विचारा ना. ज्यात असेल ते करू द्या. स्कोप वगैरेचा विचार नका करू, उलट पोरगी खुश होईल. शेवटी प्रत्येक बापाला आपली पोरगी सुखी बघायची असते. समाज काय कधीही नावंच ठेवतो. आज मी इथं आहे. इथं जॉइन होऊन सहा महिने झाले. माझे पप्पा जॉयनिंंगच्या दिवशी जेवढे खुश होते तेवढे कधीच नव्हते. तुम्हालाही तेच हवंय ना? मग उडू द्या तिला, नाही तर लेकरू आयुष्यभर तुम्हाला कोसत राहील.

बाळा, जास्ती सिरियस नको होऊस. उलट जसा नववी-आठवीत अभ्यास केलास तसाच कर. बारावी म्हणजे शेवट नाही. मज्जा आहे. कर धमाल.
पालक - चालतंय मॅडम. अहो, भावाची पोरं इंजिनिअर म्हणून करायचं होतं, पण आता तुम्ही म्हणताय तसंच करतो.
पोरीनं मस्त स्माइल दिली जाताना.
ते गेल्यावर ज्युनियरचे सर - मॅडम, हेच सांगायला जमत नाही अहो. पालक आम्हाला आणि लेकरांना ओरडतात. लैच अपेक्षा यांच्या. बरं झालं बोललात.
मागच्या वर्षी मला खूप वाटायचं की, डिग्री सोडून अकरावी-बारावीला शिकवावं. त्या पिअर प्रेशरमधून शिक्षक, पालक, आणि लेकरांना बाहेर काढावं. यंदा ती संधी रोजच येतेय.

बातम्या आणखी आहेत...