आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतातली चावी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण भागातले विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात येतात. पण बुजऱ्या स्वभावाच्या या विद्यार्थ्यांना, कधी लाज, तर कधी भीतीमुळे मोकळेपणानं शंकेचं समाधान करून घेता येत नाही. शिक्षकांनी अशा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातल्या रोजच्या घटनांचे संदर्भ शिकवण्यासाठी वापरले तर या मुलांच्या मनातला न्यूनगंड दूर करता येतो.


छोट्या शहरांमध्ये शिकायला येणारी मुलं ही प्रामुख्याने गावाकडची असतात. शेतकऱ्यांची मुलं असतात. शहरं क्वचित बघितलेली. आणि वर्गात सगळीच सरमिसळ असते. काॅन्वेंटची मुलं आणि शेतकऱ्यांची मुलं... दोन टोकंच जवळपास. त्यामुळं शिकवताना भाषा सगळ्यांना समजेल अशी वापरावी लागते. उदाहरणं दोघांनाही समजतील अशी द्यावी लागतात.


अगदी परवाच moment of inertia of angular ring चं प्रॅक्टिकल घेत होते. यात एका ठरावीक वस्तुमान असणाऱ्या मेटल रिंगचा moment of inertia काढायचा असतो. आता MI म्हणजे moment of inertia काय तर एखाद्या गोष्टीचं जडत्व. म्हणजे त्या वस्तूची त्या परिस्थितीत स्वतःहून न बदलण्याची प्रवृत्ती. आणि तो मोमेंट काढायचा. यात ती रिंग विशिष्ट वस्तुमान असलेल्या डिस्कवर ठेवायची. ती डिस्क एका कमी व्यास असणाऱ्या तारेनं बांधायची आणि तिला गोल दोलनं द्यायची. कधीकधी वायर तुटते मध्ये. मग ज्या नटने ती फिट केलेली असते तो पूर्ण घट्ट बसलेला असतो. निघता निघत नाही. एक मुलगा वायर तुटल्यावर आला माझ्याकडे.
“मॅडम, हे असं झालं आता काय करू?”
एक तर वस्तू हाताळायचा अनुभव नसतो, त्यात काही झालं तर आपल्याला ओरडतील ही भीती.
“तो नट करा ना सैल.”
“होईना मॅडम.”
“आणा पकड.”
“ती कुठून आणू?”
“अरे घरून नाही, तिथं ठेवलेली असते. या घेऊन.”
मग तो नट सैल करता करता बोलणं होतं.
“शेतात जातोस का रे?”
“हो.”
“मग शेताला पाणी देताना चावी/टी/चंबरचा नट निघत नसेल तर घरी रडत जातोस का?”
“नाही मॅडम.”
“मग काय करतो?”
“मीच काढतो पाना लावून.”
“मग इथं तेच करायचं होतं.”
“इथं पकड मागितल्यावर तार तुटली म्हणून ओरडतील वाटलं.”
“लॅबमध्ये येताना लाज आणि भीती दारावरच ठेवून यायची आणि जे रोजच्या जीवनात वस्तू हाताळता तशाच इथंही हाताळायच्या. शेवटी त्यातून फिजिक्स तरी शिकाल नाही तर यातून शेतातल्या वस्तू हाताळणं तरी. शिकाल हे महत्त्वाचे आहे ना?”
बऱ्याचदा शिकताना लाज आणि भीतीच विद्यार्थ्यांना शिकू देत नाही. न्यूनगंड दूर करायचा तर त्यांच्या रोजच्या आयुष्यातल्या घटनांच्या संदर्भानेच होऊ शकतो. एवढं शिकलं तरी पुरेसं आहे.

- प्रियांका पाटील, सोलापूर
pppatilpriyanka@gmail.com 

बातम्या आणखी आहेत...