Success Story / उसाच्या पट्ट्यात शतावरीचा डंका, एकरात ३ लाखांचा नफा

एकरी ६ टन उत्पन्नाची व प्रतिटन ५० हजार रुपये दराने खरेदीची शेतकऱ्यांना दिली जाते खरेदीदाराकडून हमी

दिव्य मराठी

Aug 06,2019 10:13:00 AM IST

रासायनिक खतांचा, औषधांचा कमीत कमी वापर आणि सेंद्रिय व जिवाणू खताचा जास्तीत जास्त वापर करून केल्या जात असलेल्या शेतीला नैसर्गिक शेती असे म्हणता येईल. असाच नैसर्गिक शेतीचा वापर करून नेवासे तालुक्यातील देवगाव येथील दत्तात्रय जीवन निकम या तरुण शेतकऱ्याने पारंपरिक उसाच्या शेतीला फाटा देत आयुर्वेदिक औषधी गुणधर्मासाठी अतिमहत्त्वाच्या असलेल्या शतावरी वनस्पतीची शेती यशस्वी केली आहे. उसाचा पट्टा म्हणून ख्याती असलेल्या या परिसरात शतावरीने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. वर्षभरात या शेतीतून एका एकरात तीन लाखांचा नफा िमळाला आहे.

नेवासे तालुक्यात भेंडे येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यापासून हाकेच्या अंतरावर देवगाव शिवारात दत्तात्रय निकम यांची शेती. पारंपरिक उसाच्या शेतीला दुष्काळाचा फटका बसला आणि पाणीटंचाई, मजुरांचा तुटवडा व इतर अडचणींमुळे उसाच्या शेतीऐवजी वेगळे पीक घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी आयुष या पुणे येथील केंद्र शासनाने शून्य हर्बल कंपनीच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली शतावरी हे औषधी पीक घेण्याचे ठरवले.


८ जुलै २०१८ रोजी निकम यांनी त्यांच्या एक एकर क्षेत्राची निवड केली. यासाठी ११२० शतावरीची रोपे आणली. शेतीच्या मशागतीनंतर दोन ओळीत ८ फूूट व दोन रोपांत ४ फुटांचे अंतरावर रोपांची सरीत लागवड केली. प्रतिरोपट्यास २५ ते २६ रुपये खर्च झाला. प्रायोगिक तत्वावर हे पीक असल्याने लागवड तंज्ञाच्या मार्गदर्शनाखालीच झाली. गेल्या दुष्काळातील उन्हाळ्यात आठवड्यातून एकदाच एक तास ठिबकनेच पाणी दिले.
लागवडीनंतर पंधरा दिवसांनी जिवामृत, अमृतपाणी, गायीच्या शेणापासून तयार झालेले जिवाणू संवर्धन आदी संेद्रिय खतांचा वापर करण्यात आला. या पिकास अत्यल्प पाणी लागते. तर पिकांच्या मुळ्या कंपन्या खरेदी करतात. तर पाल्याचा वापर जनावरांना चारा म्हणून होतो. पावसाळ्यातही गरजेनुसार या पिकास पाणी द्यावे लागते. शतावरी हे वेलवर्गीय २० वर्षे चालणारे पीक आहे. वाढीकरिता त्यास बांबू व तारेचा आधार दिला आहे.
लागवडीनंतर १२ व्या महिन्यात सरीच्या एका बाजूची मुळे खणून काढावी लागतात व त्याची विक्री करावी लागते. विशेष म्हणजे या पिकावर कोणतीही फवारणी करावी लागत नाही. दर एकरी उसाचे ८० ते ८५ टन उत्पादन घेणारे निकम यांनी यावर्षीच्या दुष्काळात हा दुर्मिळ नवीन पिकाचा प्रयोग उसाच्या पट्ट्यात यशस्वी केला आहे.

शतावरीत अश्वगंधा आंतरपीक
या पिकात पालक,कोथिंबीर, गवार, मिरची ही भाजीपाल्याची आंतरपिके घेतली. सेंद्रिय भाजीपाला असल्याने लगतच्या आठवडे बाजारात चांगली विक्री झाली. त्यातून शतावरीचा मशागतीचा व लागवड खर्चही परत मिळाला. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी शतावरीत अश्वगंधा हेही औषधी आंतरपिकाची लागवड करण्यात आली आहे. तर सीताफळाचीही आंतरपीक लागवड केली जाणार आहे. आंतरपिकामुळे शेतकऱ्यांना नफा अधिक मिळतो, त्यामुळे आंतरपीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. शेतकऱ्यांनी या पद्धतीने नियोजन केल्यास अस्मानी व सुलतानी संकट आल्यास शेतकऱ्यांना फारसा फटका बसत नाही.

शतावरी : ५० हजार रुपये खर्च
रोपे ३५ हजार रुपये व ठिबक संच ३५ हजार रुपये असा ७० हजार रुपये खर्च अाला. वर्षभरात आंतरपीक म्हणून घेतलेल्या भाजीपाल्यातून ७० हजार मिळाले. वर्षभरात शतावरीचे ६ टन, प्रत्येकी ५० हजार रुपये याप्रमाणे ३ लाख रुपये नफा मिळाला.

प्रतिटन ५० हजार रुपये दराने खरेदीची हमी
शतावरीचे एकरी ६ टन उत्पन्नाची व प्रतिटन ५० हजार रुपये दराने खरेदीची हमी व जागेवरच भाव देण्याचा करारही हर्बल कंपनीशी झालेला आहे. अशी हमी शेतकऱ्यांना मिळाल्याने या आैषधी पिकाकडे शेतकरी वळू लागले आहेत.

X