आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात साखरेचे १०७१.९४ लाख क्विंटल उत्पादन, सलग दुसऱ्या वर्षी विक्रम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ऊस गाळप हंगामात यंदा राज्यात एकूण ९५१.७९ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले. यातून १०७१.९४ लाख क्विंटल साखर उत्पादित झाली. गतवर्षी ९५०.६९ लाख मेट्रिक टन गाळप आणि १०६७.८१ लाख क्विंटल साखर उत्पादित झाली होती. त्या तुलनेत यंदा ४ लाख क्विंटल साखरेचे जास्त उत्पादन झाले आहे. सलग दुसऱ्या वर्षी साखरेचे विक्रमी उत्पादन झाल्याने बाजारात भाव नियंत्रित राहून लाखो ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. 


सततच्या दुष्काळामुळे २०१५ मध्ये ऊस लागवडीच्या क्षेत्रात घट झाली होती. संपूर्ण हंगामांवर विपरीत परिणाम झाला.  औरंगाबाद प्रादेशिक विभागात केवळ १९ लाख ६१ हजार २०० क्विंटल  सर्वात कमी साखर उत्पादित झाली आहे. त्याचे परिणाम बाजारात दिसून आले. अशीच स्थिती राज्यभर होती. बाजारात मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होऊन साखरेचे दर प्रथमच ४२ रुपये किलोवर जाऊन पोहोचले होते. 


२०१६ मध्ये सरासरी एवढा पाऊस पडला होता. परतीचा मान्सूनने मेहरबानी केली होती. २०१७-१८  मधील मान्सून सरासरीपेक्षा कमी पडला. परतीचा पावसाने दिलासा दिला होता. त्यामुळे तीन हंगामात ऊस लागवड दोन्ही वर्षे बऱ्यापैकी झाली होती. २०१८ मधील मान्सून सरासरीपेक्षा ३५ ते ४५ टक्के कमी पडला. मात्र, ऊस उत्पादकांनी पाण्याची बचत व गरजेनुसार वापर या तंत्राचा अवलंब केल्याने उसाचे उत्पादन चांगले हाती आले. २०१७-१८ च्या हंगामात १०६७.८१ लाख क्विंटल साखर उत्पादित झाली होती. दर ७ ते ८ रुपयांनी घसरून ३४ रुपये किलोवर खाली आले होते. यंदा २०१८.१९ चालू हंगामात गतवर्षीच्या तुलनेत ४ लाख क्विंटलने वाढ होऊन १०७१.९४ लाख क्विंटल साखर उत्पादित झाल्याची नोंद साखर आयुक्तालय पुणे यांनी घेतली आहे.  त्यामुळे साखरेचे दर स्थिर राहण्यास मोठी मदत मिळणार असल्याचे मत साखरतज्ञांनी व्यक्त केले आहे.


औरंगाबाद, नांदेडच्या तुलनेत सोलापूर, कोल्हापूर पुणे, नगर साखर उत्पादनात दुप्पट ते अडीच पटीने पुढे पश्चिम महाराष्ट्रात पाण्याची उपलब्धता, सिंचन तंत्रज्ञानाचा वापर सर्वाधिक आहे. त्या तुलनेत मराठवाडा खूप मागे आहे. परिणामी ऊस उत्पादन व गाळप अन् साखर उत्पादित करण्यात सोलापूर, कोल्हापूर, नगर, पुणे जिल्हा सर्वात पुढे आहे. 


औरंगाबाद प्रादेशिक विभागात सहकारी १३, खासगी ११ असे एकूण २४ साखर कारखान्यातून ९३ लाख क्विंटल, नांदेड २३ कारखान्यातून ८८.२७ लाख, कोल्हापूर २६ कारखान्यातून सर्वात जास्त २६७.४३ लाख क्वि.,  पुणे २४०.६६ लाख क्विं., सोलापूर २०८.३६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. विदर्भ पाण्याच्या अभावामुळे ऊस उत्पादन, साखर कारखाने, साखर उत्पादनात खूपच मागे आहे. 

 

दर कमी का होत नाहीत? 
२००६-७ पर्जन्यमान चांगले झाले होते. अडसाली, पूर्व हंगामी आणि चालू हंगामी अशा तिन्ही हंगामात ऊस लागवड झाली. त्यामुळे औरंगाबाद विभागात प्रथम १ कोटी ३८ हजार १८ किलो साखर उत्पादन झाले. तेव्हा साखरेचा दर १५ ते १७ रुपये किलो होता. गत दोन वर्षांपासून राज्यात विक्रमी उत्पादन असूनही दुष्काळाने दर १७ रुपयांवरून ४२ रुपये किलोवर पोहोचले. त्या तुलनेत उत्पादन वाढल्यावर दरात घसरण होणे गरजेचे होते तसे झाले नाही.