आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चमच्याने खत, थेंबाने पाणी अन् टनाने उत्पन्न घेत दुष्काळात झाले लखपती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेततळे व ठिबक सिंचनातून नेवासे तालुक्यातील जेऊरहैबती येथील अंबादास भाऊसाहेब   खराडे  हा तरुण शेतकरी ऐन दुष्काळात उसाच्या उत्पादनातून लखपती बनला आहे. चमच्याने खत, थेंबाने पाणी अन् टनाने उत्पन्न हे त्यांच्या यशाचे गमक आहे. 
 

उसाचे सर्वाधिक उत्पादन घेणारा तालुका, साखरेचे आगार अशी नगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्याची ओळख. मुळा, भंडारदरा व जायकवाडी या तिन्ही धरणांच्या पाण्याच्या लाभामुळे तालुक्यात ७५ टक्क्यांहून अधिक उसाचे उत्पन्न घेणारे शेतकरी, परंतु गेल्या सहा- सात वर्षांत अनियमित व अपुरा पाऊस यामुळे धरणातील पाणी मिळणेही जिकिरीचे  बनले आणि ऊस शेतीच्या दृष्टीने पाण्याचा प्रश्न चांगला भेडसावू लागला. उपलब्ध पाण्यात जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी  आधुनिक पाणी व्यवस्थापनाच्या आधुनिक सिंचन पद्धतीकडे शेतकरी वळला आहे. खराडे यांनीही हाच मार्ग अवलंबल्याने ते यशस्वी झाले आहेत. 


ऊस जळाल्याने ८० लाख लिटर्स क्षमतेचे शेततळे उभारले 
अंबादासला दीड एकराच्या उसाच्या शेतीतून १२० टनांचे उत्पन्न झाले.  खर्च  ४० हजार वजा जाता ३ लाख ६८ हजार रुपये मिळाले. देवगाव शिवारात अंबादासची १२ एकर शेती. २०१३ सालीही पाऊस अत्यल्प झाल्याने ऐन उमेदीत असलेले उसाचे पीक पाण्याअभावी जळाले. हाच धडा मिळाल्याने त्याच वर्षी साडेपाच लाख रुपये  स्वखर्चातून ८० लाख लिटर्स पाणी साठवण क्षमता असलेले  शेततळे बांधले. पावसाळ्यात पाणी साठवण्यात आले.
 

 

१२ एकरांपैकी अवघ्या दीड एकरावर उसाची लागवड  
यंदाच्या दुष्काळामुळे १२ एकरांपैकी अवघ्या दीड एकरावर उसाची आडसाली लागवड केली, तर एक एकरावर केळी. ८६०३२ जातीच्या बेण्याची निवड केली. ठिबक सिंचन संचही बसवण्यात आला. पाच फुटी सरळ सरी पद्धतीचा वापर लागवडीसाठी केला. शेतीच्या मशागतीवेळी सेंद्रिय खत व लागवडीनंतर योग्य प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केला. गवतासाठी तणनाशकाऐवजी खुरपणी केली.    


दुष्काळात शेततळ्यांनी दिला आधार
दुष्काळाने गेल्या मार्चच्या पहिल्याच आठवड्यात विहिरी आटल्या, पण उन्हाळ्याच्या तीन महिन्यांत साथ दिली ती शेततळ्याने. गेल्या जुलैच्या २०१८  शेवटच्या आठवड्यात लागवड केलेला ऊस उन्हाळ्यात आवश्यकतेनुसार ठिबकने पाणी देऊन जगवला. पाण्याची  व्यवस्था केली नसती तर इतर शेतकऱ्यांसारखीच परिस्थिती माझी झाली असती, असे खराडे म्हणतात.

 

दीड एकरात १२० टनाचे मिळाले उत्पन्न
उसाची एक कांडी पाच सहा इंचापर्यंत झाली तर एकूण २० ते २२ कांड्यावर ऊस आला.   गेल्या  जूनमध्ये या उसाला  रसवंती व जनावरांच्या चाऱ्यासाठी मागणी येऊ लागली. एकरी ८८ टनाचे व दीड एकरात १२० टनाचे उत्पन्न मिळाले. प्रतिटन ३४०० रुपये भाव मिळाला. ऊस वाढ्यांसहित विकण्यात आला. १२० टनाची रक्कम ४ लाख ८ हजार झाली. त्यात उसाचा उत्पादन खर्च ४० हजार सोडला तर निव्वळ नफा ३ लाख ६८ हजारांचा झाला.

 

उत्तम व्यवस्थापन हेच यशाचे गमक
महाराष्ट्रात उसासाठी अत्यंत अनुकूल हवामान असतानाही गेल्या दहा -बारा वर्षांत सातत्याने या पिकाचे हेक्टरी उत्पादनात घट होत आहे. त्यामुळे उसाच्या जाती, पाणी, लागवड पद्धती, यासह पाणी व्यवस्थापनाच्या आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर करणे व शेतीत स्वकष्ट करणे महत्त्वाचे आहे.
अंबादास खराडे, शेतकरी

 

उसाच्या उत्पादनाची स्पर्धा असलेले गाव
देवगाव या गावच्या शिवारात दर एकरी १०५ टनांपर्यंत उसाचे उत्पन्न मिळवणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १०० हून अधिक आहे. या गावात ९० टक्के शेती उसाचीच, मात्र उसाची शेती शेतमजुरांच्या भरवशावर नव्ह,े तर स्वत: च्या कष्टाशिवाय फुलत नाही; असा ऊस उतपादकांचा विश्वास त्यामुळे कितीही मोठा बागायतदार असला तरी शेतीत राबणारच.