शाश्वत संस्कृतीचा आदिवारस
आदिम आणि आदिवासी या दोन भिन्न संकल्पना आहेत. मात्र, शहरी व्यवस्थेने संस्कृती, जीवनपद्धती आणि चालीरीती सकस-अस्सल असूनही आ
-
आदिम आणि आदिवासी या दोन भिन्न संकल्पना आहेत. मात्र, शहरी व्यवस्थेने संस्कृती, जीवनपद्धती आणि चालीरीती सकस-अस्सल असूनही आदिवासींना दुर्लक्षिले आहे. हे आत्मघाताचे लक्षण आहे, याची जाणीव शहरी जनतेत निर्माण होणं हेच जागतिक आदिवासी दिनाचे खरे औचित्य आहे...
निसर्ग आणि मानवाचं अद्वैत सगळ्यात आधी आदिवासींनी जाणलं होतं. माणसाच्या जीवनात निसर्गाचा किती आणि कसा वाटा असतो, हे त्यांना नेमकेपणाने ठाऊक होतं. म्हणून उत्क्रांतीचे इतके टप्पे ओलांडूनही, ते निसर्गाच्याच सानिध्यात राहिले. आज जगात नैसर्गिक जे काही उरलं असेल, ते फक्त आदिवासींजवळच! बाकी जगाचा बहुतांश भाग, अनैसर्गिक गोष्टींनी व्यापलेला आहे. आज भौतिक सुख सुविधांच्या हव्यासापायी भांडवलशाहीच्या अजस्र हातांनी निसर्गाला चोहीबाजूने ओरबाडलं जात आहे. दुसरीकडे विकासाच्या नावाखाली मोठ-मोठे कारखाने, खाणी, धरणं बांधून आदिवासींचं जीवन पार उजाड केलं जात आहे. जर निसर्गच उरला नाही, तर आदिवासी उरणार नाही आणि आदिवासी उरला नाही, तर निसर्ग उरणार नाही. अशी ही करुण कहाणी आहे.
संक्रमण काळात असताना सर्वच मानवी समाज आदिम अवस्थेत जगत होता. परंतु नंतर उत्पादन साधनांचा शोध लागल्यानंतर त्यांचे भटकेपण संपले. वस्ती करून राहण्याची वृत्ती वाढली. विवाहादी कुटुंब संस्था स्थापित झाल्याने त्यांचे सामाजीकरण झाले. आजचे आदिवासी या अर्थाने आदिम नाहीत. आदिम आणि आदिवासी या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. या भूमीवरचा मूळचा रहिवासी या अर्थाने आदिवासी (इंडिजिनियस) हा शब्द आहे. आदिम अवस्थेच्या फार पुढे व आधुनिक समाजाच्या काठावर आजचा आदिवासी समाज उभा आहे. त्यांची विवाह संस्था, जीवन पद्धती, संस्कृती, चालीरीती या निसर्गाच्या सान्निध्यात घडल्यामुळे त्या सकस आणि अस्सल आहेत. फक्त ते व्यवसाय, उत्पादन पद्धती आणि वस्तुविनियमता या महत्वाच्या गोष्टीत, स्थिर आणि नैसर्गिक राहिल्याने, अनैसर्गिकरित्या विकास पावलेल्या आजच्या आधुनिक समाजाच्या व्याख्येत ते अविकसित राहिले आहेत. आणि हा विकासाचा अघोरही शेवटी मानवसृष्टीला विनाशाकडे घेऊन जात असेल, तर आदिवासी अविकसित राहिले तेच बरे आहे.
आदिवासी विनाशाचे भागीदार नाहीत, हे आजचं वास्तव आहे. आता या घटकेला विकास नेमकं कशाला म्हणायचं त्याची नीट व्याख्या झाली पाहिजे. विकास याचा अर्थ, गरजा वाढवत जाणे आणि त्यांच्या पूर्तीसाठी नैसर्गिक साधन संपतीची अमर्याद लूट करणे, असा होत नाही. विकास म्हणजे, निसर्गाकडून मानवाला व मानवाकडून निसर्गाला कुठलीही इजा न होऊ देता एकमेकांच्या सहकार्याने भौतिक सोयी-सुविधांकडे केलेली संतुलित वाटचाल होय. जग या आदर्श वाटेवरून फार पुढे आलेय. आता मागेही जाता येत नाही आणि पुढचे धोकेही कमी होत नाहीत, अशी कोंडी झालेली आहे. मात्र, आदिवासी आजही निसर्गाशी जोडलेले असल्यामुळे त्यांची जीवनशैली अतिशय संतुलित दिसते. ते निसर्गाशी इतके एकरूप झालेले आहेत, की त्यांची नावे आणि पाडेही निसर्गाशी संबंधितच असतात. उदा. डोंगऱ्या, झाड्या, पावशा, पेचारा, टेंबऱ्या, जंगल्या ई.
निसर्गाच्या कार्य शृंखलांमध्ये प्रत्येक सृजनाचं स्वतःचं विशिष्ट स्थान आहे, महत्व आहे. आणि हे सर्व परस्पर सहजीवन आहे. जर या साखळीतील एखादी कडी तुटली, तर सगळ्यांचीच फार मोठी हानी होत असते. निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या, स्वच्छंदी व स्वतंत्र वृत्तीच्या आणि आधुनिक जगाशी संपर्क न आल्यामुळे भ्रष्ट न झालेल्या आदिवासींचे जीवन अधिक सुखमय आहे, असे म्हणता येईल. काही विद्वानांच्या मते, विज्ञान युगात सभ्यतेचा प्रगतीशील विकास झाला असला, तरी त्यामुळे नैसर्गिक सुखांपासून माणसे दुरावतात. विज्ञानामुळे मिळालेल्या भौतिक सुखांपेक्षा, त्यातून निर्माण झालेली मानसिक दुःखे अधिक आहेत. त्यामुळे जंगलात वेगवेगळ्या अभावात जगणारा उघडा-वाघडा आदिवासी शहरातल्या सर्व प्रकारच्या भौतिक सोयी-सुविधेत लोळणाऱ्या श्रीमंत वर्गापेक्षा अधिक सुखी व निरोगी आयुष्य जगतो. अर्थात, अलीकडच्या काळात काही सुशिक्षित आदिवासींचा नोकरी-धंद्यानिमित्त शहरीकरणाशी संबंध आल्याने त्यांचा निसर्गाशी संबंध तुटला आणि तेही तणावाचे, वेगवेगळ्या जीवघेण्या रोगांचे शिकार बनले आहेत.
माझा एक ३५ वर्षांचा आदिवासी मित्र दोन वर्षांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने गेला आणि दुसरा ब्लड कॅन्सरने. आमच्या मागच्या कित्येक पिढ्यांत हे आजार झाले नाहीत. आज माझ्या बापाचं वय ऐंशी वर्षांचं आहे. पण किरकोळ आजाराव्यातिरिक्त कधी सुई घेतली नाही, किंवा गोळीही खाल्ली नाही. आजही ते चार-पाच किमी पायी जाऊन फाट्यावरून बस पकडतात आणि मी मात्र पस्तिशीच्या आतच छोट्या-मोठ्या आजारांना बळी पडलो. असे का झाले? याच्या मुळाशी गेलं तर लक्षात येतं, की मानवाच्या मूलभूत गरजांच्या पूर्तीचे आधुनिक मार्ग निसर्गाशी फारकत घेणारे आहेत. एक काळ असा होता, की भारतात पुरेसं अन्न-धान्य पिकत नव्हतं, पण जे पिकत होतं ते गावरान होतं, कसदार होतं. आज हायब्रीडच्या वाणामुळे प्रत्येकाला पुरून उरेल इतकं अन्न-धान्य पिकतं. पण त्यात कसदारपणा कुठेय? रासायनिक खतं आणि कीटकनाशकाचा अंश अन्नासोबत पोटात गेल्यावर शरीर सुदृढ तरी कसं राहणार आहे?
आदिवासींमध्ये निसर्ग रक्षण करण्याची जन्मजात वृत्ती आहे. ते वन आणि वन्य प्राण्यांपासून तितकंच घेतात, जितकी त्यांना गरज आहे. गरजेपेक्षा जास्त वापरण्याची किंवा गरजा वाढवण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये नाही. कमी साधनांमध्ये अतिशय सुखी आयुष्य जगतात. त्यामुळेच निसर्गचक्रात संतुलन राहिलं. हे संतुलन पहिल्यांदा बिघडलं, ते इंग्रजांच्या वसाहतवादी धोरणांमुळे. त्यांना उद्योग-धंद्यासाठी जल-जंगल-जमीन हवी होती. त्यासाठी त्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंट निर्माण केलं. त्याद्वारे आदिवासींचे जंगलावरचे परंपरागत मालकी हक्क काढून घेतले आणि त्या हक्कांनाच गुन्हा ठरवणारे कायदे केले. फॉरेस्ट डिपार्टमेंटनेच जंगलाला आणि आदिवासींना सगळ्यात मोठी हानी पोहोचवलेली आहे. ठेकेदाराकरवी बेसुमार वृक्षतोड (कूप तोडणे असे म्हटले गेले) करून जंगलाच्या-जंगलं नष्ट करण्यात आली. आणि जंगलासह तिथले वन्य जीवही नष्ट झाले. इथूनच भारतात निसर्गाचा समतोल बिघडायला सुरुवात झाली. म्हणूनच आदिवासींनी इंग्रजांना प्रचंड विरोध करत सळो की पळो करून सोडले होते. बस्तरची आदिवासी राणी प्रफुल्ला कुमारी देवीने इंग्रज सरकारला जंगलातली झाडं तोडण्याची परवानगी नाकारल्यानं तिच्यावर कपटाने विषप्रयोग करण्यात आला. तिच्यानंतर तिचा अवघ्या सात वर्षांच्या प्रवीणचंद्र भंजदेवला गादीवर बसवून इंग्रजांनी बस्तरमध्ये भरमसाट वृक्षतोड केल्याचा इतिहास जुना नाही, तर विसाव्या शतकाच्या तिसऱ्या-चौथ्या दशकाचा आहे. पुढे भारत स्वतंत्र झाल्यानंतर प्रवीणचंद्र भंजदेवने भारत सरकारला बस्तरच्या जंगलात घुसू दिले नाही. त्या विरोधात उठाव केला म्हणून १९६६ मध्ये त्यालाही गोळी घालून ठार मारण्यात आलं. म्हणजे, जोपर्यंत जंगलं आदिवासींच्या ताब्यात होती, तोपर्यंत त्यांनी प्राणपणाने त्याचं रक्षण केलं. पर्यावरणाला कसलीही हानी पोहोचू दिली नाही. पण ती सरकारच्या ताब्यात गेली आणि आदिवासींच्या जीवनाबरोबरच निसर्गाचाही समतोल बिघडायला सुरुवात झाली.
आज वायू, जल आणि भूमीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणात प्रचंड बदल होताहेत. त्याचा परिणाम म्हणून कित्येक आदिवासी जमाती नामशेष झाल्यात. काही होण्याच्या मार्गावर आहेत. ऑस्ट्रेलियन आदिवासी (विचारवंत) विलियम क्लार्क म्हणतो, आता पृथ्वी आपलं समर्थन करूच शकत नाही. कारण निसर्गचक्र पुरतं बिघडून गेलं आहे. चक्रीवादळ, भूकंप, तापमान वाढ पिण्याच्या पाण्यातील खारटपणा, भूस्खलन, मोठ्या प्रमाणात बर्फ वितळणे, दुष्काळ, आम्लयुक्त पाऊस, समुद्राचं आम्लीकरण हे दुष्टचक्र वाढतच चाललं आहे. संपूर्ण मानवजातीचा ऱ्हास आणि पृथ्वीचा विनाश थांबवण्यासाठी आदिवासींना जगवलं पाहिजे. त्यांच्या पर्यावरणपूरक जगण्याच्या नैसर्गिक धारणा समजून घ्यायला पाहिजे. निसर्ग ही जगातील सगळ्यात मोठी संपत्ती आहेत. भौतिक सुखामागे धावत असताना आपल्या पायाखाली आपलंच भविष्य आपण तुडवीत आहोत, याची जाणीव निर्माण होणं, हेच या जागतिक आदिवासी दिनाचं खरं औचित्य आहे. म्हणूनही हा दिवस आदिवासींइतकाच शहरी-ग्रामीण जनतेनेही गांभीर्य ठेवून साजरा करण्यासारखा आहे.(लेखक मविप्र समाजाचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, नांदगाव, नाशिक, येथे हिंदी विभागात कार्यरत आहेत.)
- प्रा.शांताराम शेल्या भिल-वळवी
sssvalvi3@gmail.com
लेखकाचा संपर्क : ०९४२०१७९३९४ -
-