Home | Magazine | Rasik | Prof. Abhijit Deshpande Write Article About Watching movies

सिनेमा पाहणे एक जाणता रियाज

प्रा. अभिजित देशपांडे | Update - Aug 05, 2018, 12:36 AM IST

आपले प्रेक्षक असणे हे असे विविध घटकांनी घडलेले असते. जाहिरातींपासून ते अनेक दृश्य-अदृश्य घटकांनी आपले प्रेक्षकपण प्रभावि

 • Prof. Abhijit Deshpande Write Article About Watching movies

  आपले प्रेक्षक असणे हे असे विविध घटकांनी घडलेले असते. जाहिरातींपासून ते अनेक दृश्य-अदृश्य घटकांनी आपले प्रेक्षकपण प्रभावित केलेले असते. पण सजग-सक्रिय प्रेक्षकाला बऱ्याच अंशी या नियंत्रणांपासून मुक्त राहूनही आपल्या प्रेक्षकपणाला आकार देता येतो, त्याला समृद्ध करता येते. त्यासाठी प्रेक्षक असण्याचा जाणता रियाज हवा. कारण प्रेक्षक असणे, ही जन्मजात नाही, तर घडवण्याची बाब आहे...


  "Great Films will be made, only when we become great Audience.”
  Andre Malraux.
  आपण सर्वच जण चित्रपट पाहतो. थिएटरमध्ये जाऊन किंवा घरी टीव्हीवर. डीव्हीडी प्लेअरवर किंवा कॉम्प्युटरवर. इंटरनेटवर ऑनलाइन किंवा आता अगदी मोबाइल वा टॅब्लेटवरही. पूर्वी सिनेमा पाहायला थिएटरमध्ये जाणे हा एकच मार्ग उपलब्ध होता. त्यामुळे सिनेमाला जाणं हा मोठ्ठाच बेत असायचा. घरच्यांसोबत किंवा मित्र-मैत्रिणींसोबत. सिनेमा पाहणं ही खासगी बाब नसायचीच कधी. थिएटरमधल्या शेकडो अनोळखी लोकांसोबत आपण सिनेमा पाहायचो, एरवी, आजूबाजूचे लोक अनोळखी असूनही, त्यांच्यासोबत सिनेमा पाहणं हा निव्वळ खासगी अनुभव उरत नाही. तो सामूहिक अनुभव बनतो. सामूहिकता, सामाजिकता ही अशी सिनेमाच्या पाहण्याच्या प्रक्रियेतच अंतर्भूत असते. सिनेमा पाहताना मग मध्यंतरात हमखास गरमागरम वडे-समोसे, चहा किंवा मग पॉपकॉर्न आणि कोला ड्रिंक किंवा तत्सम काही तरी. त्या अर्थाने सिनेमा पाहणं हा सोहळाच असतो, आपल्यासाठी. थिएटरच्या भव्य पडद्यावर ‘लार्जर दॅन लाइफ’ असं काही तरी अनुभवतानाही, आपण तो सोहळाच तर साजरा करत असतो. थिएटरमधल्या मोठ्या पडद्याचं अप्रूप पूर्वीही होतंच आणि आजही आहेच. पण टीव्हीद्वारे सिनेमा आपल्या घराघरांत शिरला आणि (तेव्हापासून) आपल्या सिनेमा पाहण्याच्या सवयीही बदलल्या.


  पूर्वी आपण महिन्या- दोन महिन्यांतून एखादा सिनेमा बघायचो. आता तोच घरात येऊन बसल्याने आणि कुणा ना कुणासाठी तरी घरी टीव्हीचा पडदा सतत चालू असल्याने सिनेमाच तुमच्यावर येऊन आदळतो. तुम्ही तो पाहता. कळत-नकळत, पण सिनेमाची आणि आपली साथसंगत वाढलीय, एवढं मात्र नक्की.


  इंग्रजीत प्रेक्षक या शब्दासाठी Audience हा प्रतिशब्द आहे. Oxford शब्दकोशानुसार, Audience म्हणजे the people gathered to see, or to listen to a play, concert, film etc. एखादे नाटक, सांगीतिक कार्यक्रम किंवा चित्रपट पाहण्या किंवा ऐकण्यासाठी (आणि खरे तर पाहण्या-ऐकण्यासाठी) जमलेले लोक म्हणजे प्रेक्षक. त्यातही गंमत आहेच. Audience हा शब्द मुळात लॅटिन शब्द Audiere म्हणजे ऐकणे, या शब्दापासून घडला आहे. तेव्हा Audience चा मूळ अर्थ ऐकणारा - म्हणजेच श्रोता - असा होतो. पण आज आपण तो शब्द पाहणारा - म्हणजे प्रेक्षक - या अर्थाने वापरतो. वस्तुतः त्याहीपलीकडे जाऊन पाहणारा आणि ऐकणारा जनसमुदाय म्हणजे Audience असा व्यापक अर्थ आपल्याला अभिप्रेत आहे. आणि हल्ली तर क्रीडा मैदानावर खेळ बघणाऱ्यांनाही आपण Audience च म्हणतो. प्रेक्षक या शब्दाचा अर्थ बघणारा असा होत असला तरी आपण काहीही व कसेही बघणाऱ्याला प्रेक्षक म्हणत नाही. ‘प्रेक्षक’ या शब्दात ‘जाणीवपूर्वक’ बघणे अपेक्षित आहे.


  आपण झोपलेलो नसतो, डोळे मिटलेले नसतात किंवा आपण शून्यात बघत नसू, जागेपणी आपले डोळे उघडेच असतात, तेव्हा आपल्याला काही तरी दिसतच असते. किंवा आपण काही पाहत असतो. आपल्या या पाहण्यातही एक निवड असते. ते निव्वळ, निखळ पाहणे नसतेच. या पाहण्यात आपल्या अनेक सामाजिक-सांस्कृतिक आणि वैयक्तिक आवडी-निवडी, सवयी, शैली, प्राधान्यक्रम, पूर्वपीठिका, पूर्वग्रह - या आणि अशा अनेक गोष्टी त्यात अंतर्भूत असतात. आपले पाहणे, ही जशी एक जैविक-शारीरिक क्रिया आहे, तशीच ती एक सांस्कृतिक क्रियाही आहे. ती केवळ व्यक्तिगत बाब नाही. मग ते पाहणे कशाचेही असो. डोळे उघडे असताना, आपसूकपणे आपण पाहतच असतो. खरे तर ते दिसणे असते. दिसणे आणि पाहणे - यातही फरक आहेच. डोळे उघडे असतात, तेव्हा आपल्याला आजूबाजूचे खूप काही दिसतच असते. पाहण्यात वर म्हटल्याप्रमाणे निवड अंतर्भूत असते. जाणीवपूर्वकता असते. दिसणे, हे नैसर्गिक असते. पाहणे हे ‘सांस्कृतिक’ असते. अनेक प्रदीर्घ व तात्कालिक घटकांनी ते घडलेले असते. पण असे हे पाहणे म्हणजे प्रेक्षकत्वाचे पाहणे नाही. आपण रस्त्यावरून चालतो, तेव्हा आपल्याला आजूबाजूला माणसे-घरे वाहने-झाडे-जमीन-आकाश अशा अनेक गोष्टी दिसतच असतात. मला समजा, नवनव्या कपड्यांची आवड आहे किंवा लवकरच नवे कपडे खरेदी करण्याचा माझा बेत आहे, तेव्हा आपसूकच माझी नजर दुकानात लावलेल्या नव्या कपड्यांकडे वळते. थबकून, तिथे घोटाळून काही काळ का असेना, मी ते न्याहाळतो. हे पाहणेदेखील प्रेक्षकत्वाचे नाही. त्यात जाणीवपूर्वकता असली तरीही. म्हणजेच बघे आणि प्रेक्षक यातही फरक करायला हवाच.
  चित्रपट, नाटक, खेळ, संगीत सभा किंवा तत्सम कार्यक्रमांना ठरवून, आवर्जून जाणारा, मुद्दाम ते बघण्या-ऐकण्यासाठी आलेला, विविध वयोगट आणि वृत्ती-प्रवृत्तींचा, परस्परांशी अपरिचित असलेला आणि तरीही काही एक तात्कालिक समभाव बाळगणारा जनसमुदाय - म्हणजे प्रेक्षक. (अशी एक अतिव्याप्त व्याख्या नोंदवून ही चर्चा पुढे नेऊया.) आपण थिएटरमध्ये दाखल होतो, ते असे प्रेक्षक म्हणूनच. वय, शिक्षण, आवडी-निवडी, सवयी...इत्यादी गोष्टी विभिन्न असूनही, आपण तिथे एक विशिष्ट सिनेमा बघण्यासाठी दाखल झालेलो असतो. तिकिटाचे पैसे मोजून. म्हणजे, त्यात आपले ग्राहक असणेही ओघाने आलेच.


  ग्राहक हा शब्दही इथे दोन अर्थांनी विचारात घ्यायला हवा. एक तर, चित्रपट हे संवादाचे एक माध्यम आहे. तेव्हा, त्याचे ग्रहण करणारा तो-ग्राहक. संवादाच्या मूलभूत त्रयींमधला अंतिम घटक-ग्राहक म्हणजेच Receiver. ज्या अर्थी चित्रपटाचा काही एक अर्थ त्या व्यक्तीपर्यंत पोहोचला, त्या अर्थी त्या व्यक्तीला ग्राहक म्हणता येईल. दुसरा अर्थ म्हणजे Consumer, वस्तू अथवा उत्पादन विकत घेणारा. चित्रपट ही एक क्रयवस्तूदेखील आहे. आपण पैसे देऊन सिनेमाला आलेलो असतो. पैसावसूल मनोरंजनाची तिथे अपेक्षा असते. याही अर्थाने आपण सिनेमाचे ग्राहक असतो. चित्रपटाच्या संदर्भात हे दोन्ही अर्थ लागू आहेत.
  वरील बाबी आपल्या सांस्कृतिक वातावरणातून घडत असल्याने त्याला सांस्कृतिक संदर्भही आहेत. आपण पैसावसूल मनोरंजनाचीही अपेक्षा करत असल्याने त्याला व्यावसायिक संदर्भ आहे. चित्रपट हे कलामाध्यम असल्याने त्याला सांस्कृतिक संदर्भही आहे.


  तेव्हा, आपले प्रेक्षक असणे हे असे विविध घटकांनी घडलेले आहे. ती स्थिर बाब नाही. ते सतत घडणारे, मोडणारे, अन्यान्य घटकांनी नियंत्रित होणारे आहे. जाहिरातींपासून ते अनेक दृश्य-अदृश्य घटकांनी आपले हे प्रेक्षकपण प्रभावित केलेले असते. पण सजग-सक्रिय प्रेक्षकाला बऱ्याच अंशी या नियंत्रणांपासून मुक्त राहूनही आपल्या प्रेक्षपणाला आकार देता येतो, त्याला समृद्ध करता येते. त्यासाठी आपल्या प्रेक्षक असण्यावर आपल्यालाच मेहनत घ्यायला हवी. प्रेक्षक असण्याचा जाणता रियाज करायला हवा. कारण प्रेक्षक असणे, ही जन्मजात नाही, तर घडवण्याची बाब आहे. आत्मसंस्कारित होण्याची बाब आहे. तिचं सतत उन्नयन शक्य आहे. रसिकता ही प्रेक्षकपणाची पुढची पायरी आहे. आणि त्याच दिशेने आपली वाटचाल असायला हवी. त्या वाटचालीला एकच एक दिशा नाही. ती अष्टमार्गी आहे. रसिकता शिकवता येत नाही, पण रसिकता शिकता मात्र येते. त्यासाठी सजग-सक्रिय असणे गरजेचे आहे.
  सिनेमा समजून घेण्याच्या पाच पायऱ्या कल्पिता येतील.
  प्राथमिक पायरी.
  सिनेमाची ढोबळमानाने गोष्ट, नाच-गाणी, हीरो-हीरॉइन याबद्दलच सर्वसाधारणपणे चर्चा केली जाते. ही प्राथमिक पायरी.
  विषयाचे आकलन.
  चित्रपटाचा मध्यवर्ती विषय कोणता, तो कसा फुलवला गेला आहे, अथवा नाही. त्याअनुषंगाने सिनेमाची जातकुळी - याचे आकलन- हा दुसरा स्तर.
  सिनेमॅटिक स्तर.
  सिनेमाची दृश्य-श्राव्याची स्वतंत्र भाषा आहे. संकलनातून त्याची अर्थ पूर्ण मांडणी केली गेली आहे. त्याचे आकलन ही तिसरी पायरी.
  आंतरसंबंधांचा स्तर.
  सिनेमाचे इतर विविध कलांशी आणि क्षेत्राशी व्यामिश्र नाते असते. सिनेमा आणि साहित्य, सिनेमा आणि संगीत, सिनेमा आणि दृश्यकला.... सिनेमा आणि मानसशास्त्र, सिनेमा आणि समाज-इत्यादी आंतरसंबंधांचे आकलन ही चौथी पायरी.
  संदर्भचौकटीचा स्तर.
  कुठलाही चित्रपट हा एका विशिष्ट स्थल-काल-परिस्थितीतून घडलेला असतो. सिनेमा ज्या काळात नि वातावरणात घडतो आहे, त्याची संदर्भचौकट कळल्यास त्याचे अधिक व्यापक आकलन होते. तेव्हा हा आकलनाचा पाचवा आणि अंतिम स्तर.
  ह्या आकलनासाठी अर्थातच प्रेक्षकपण जाणीवपूर्वक घडवायला हवे. सुप्रसिद्ध फ्रेंच लेखक आंद्रे मालरॉक्स यांनी म्हटल्याप्रमाणे, आपण उत्तम प्रेक्षक बनू, तेव्हाच उत्तम चित्रपट तयार होतील. तेव्हा प्रेक्षक होणे, ही जबाबदारीची गोष्ट आहे.


  - प्रा. अभिजित देशपांडे
  लेखकाचा संपर्क : ९८१९५७४०५०

Trending