Home | Magazine | Rasik | prof. Abhijit Deshpande article in rasik

सद्गुरूवाचोनि सापडेल सोय

प्रा. अभिजित देशपांडे | Update - Sep 02, 2018, 07:16 AM IST

शिक्षकाला अतोनात महत्त्व दिले जाते, तेव्हा विद्यार्थीच काय, तर ज्ञानदेखील दुय्यम ठरायला लागते.

 • prof. Abhijit Deshpande article in rasik

  विद्यार्थी हा जसा निव्वळ परीक्षार्थी असता कामा नये, तसा शिक्षकही निव्वळ अर्थार्जनाचे साधन म्हणून या क्षेत्राकडे पाहणारा असता कामा नये. पण जेव्हा, या एकंदर ज्ञानव्यवहारात शिक्षकाला अतोनात महत्त्व दिले जाते, तेव्हा विद्यार्थीच काय, तर ज्ञानदेखील दुय्यम ठरायला लागते. भक्तसंप्रदाय निर्माण केला जातो. भाबडेपणावर पोसलेली व्यवस्था निर्माण होते. सबंध ज्ञानव्यवहारच धोक्यात येतो...


  गुरुपौर्णिमा-शिक्षकदिन जवळ आला, की शाळा-महाविद्यालयांतल्या विद्यार्थ्यांची लगबग सुरू होते. सोहळे करायचे. शिक्षकांचे स्तुतिपर कार्यक्रम करायचे. यांतला बराचसा भाग निव्वळ पारंपरिक रिवाज म्हणून आलेला असतो, तर काही भाग सच्च्या कृतज्ञतेचा असतो. खरं तर, अध्यात्म असो की शाळा-महाविद्यालयांतली औपचारिक शिक्षणव्यवस्था, शिक्षक-ज्ञान-विद्यार्थी या मूलभूत त्रयीत सर्वोच्च महत्त्व ज्ञान, या गोष्टीलाच असायला हवे. विद्यार्थी हा जसा निव्वळ परिक्षार्थी असता कामा नये, तसा शिक्षकही निव्वळ अर्थार्जनाचे साधन म्हणून या क्षेत्राकडे पाहणारा असता कामा नये. पण जेव्हा, या एकंदर ज्ञानव्यवहारात शिक्षकाला अतोनात महत्त्व दिले जाते, तेव्हा विद्यार्थीच काय, तर ज्ञानदेखील दुय्यम ठरायला लागते. शिक्षक हाच काय तो सर्वोच्च ज्ञानी, तोच गुरू-तोच ब्रह्म असे सोयीचे व्यक्तिकेंद्री भ्रम जोपासले जातात. भक्तसंप्रदाय निर्माण केला जातो. भाबडेपणावर पोसलेली व्यवस्था निर्माण होते. सबंध ज्ञानव्यवहारच धोक्यात येतो. आणि त्यातूनच स्तुतीपर सोहळे जन्माला येतात.

  कुठलाही शिक्षक आपल्या विषयातदेखील सर्वोच्च ज्ञानी असल्याचा दावा आजघडीला करू शकणार नाही. ज्या काळी पुस्तके वा ग्रंथ आजच्यासारखे सहज उपलब्ध नव्हते, ऐकीव माहितीवरदेखील अवलंबून राहावे लागायचे, त्या काळी कणकण गोळा करून ज्ञानाचा ध्यास घेतलेली व्यक्ती लाखमोलाची ठरणे स्वाभाविकही होते. त्याकाळी ज्ञानाचा ध्यास असलेला विद्यार्थीवर्ग शिक्षकाकडील हे ज्ञान समजून घ्यायचा, व्यवहाराचे जगच मुळी छोटे असल्याने त्यात क्वचितच विरोधी वा बाहेरील मतांचा शिरकाव होऊन-त्यांत वादसंवाद होऊन ज्ञानाची अशी अर्थपूर्ण घुसळणदेखील क्वचितच चालायची. त्यामुळे शिक्षकाने आत्मसात केलेले व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविलेले ज्ञान हेच अंतिम मानले जाऊन एका ऐतिहासिक टप्प्यावर शिक्षकाचे महत्त्व प्रस्थापित झाले असेलही, पण आजघडीला ते नव्याने तपासायला हवे. ज्ञानव्यवहार ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. प्रश्न विचारत-गुंत्यापर्यंत पोहोचत-वेगवेगळ्या शक्यता तपासत पक्ष- प्रतिपक्ष यांत सुदृढ वादसंवाद करत ती सतत करावयाची गोष्ट आहे. शिक्षक हा ज्ञानाचा निर्माता असेलच असे नाही, पण त्याने सतत आत्मसात केलेल्या या ज्ञानाशी कुतूहलापोटी, पण झुंजत राहायला हवे. शिक्षक असण्याची पहिली अट विद्यार्थी असणे हीच आहे. आणि विद्यार्थी असणे म्हणजे विलक्षण कुतुहल धगधगते ठेवत उपलब्ध माहितीला सतत तर्कसंगत प्रश्न-प्रतिप्रश्न उपस्थित करीत - आपल्या आकलनाला सतत धार लावणे. शिक्षकाने आपल्याच ज्ञानाला सतत विस्तारत ठेवले पाहिजे. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारावेत, प्रसंगी आपल्या ज्ञानाला आव्हान मिळाले तरी चालेल, पण याप्रकारच्या वादसंवादाला पोषक अशी भूमी तयार करीत ज्ञानाच्या कक्षा विस्तारत राहणे, ही शिक्षकाची खरी जबाबदारी आहे. प्रश्नांचे स्वागत - प्रश्नांसाठीचे खुलेपण आणि कदाचित माझ्याकडेही सर्व उत्तरे असणार नाहीत - ती त्या प्रश्नांनी खुल्या केलेल्या दिशांनी शोधता येतील कदाचित - कदाचित ती एकट्याने नव्हे, तर एकत्रपणे धुंडाळता येतील - या जाणिवेतून केलेल्या शिक्षक - विद्यार्थी यांच्यातील अर्थपूर्ण परस्परसंवादावरच खरा ज्ञानव्यवहार उभा राहतो.

  शिक्षण घेणे म्हणजे, मेंदूत निव्वळ माहितीचा साठा करणे नाही, तर त्या माहितीला प्रश्न विचारत विचारप्रवृत्त होणे. विचारांना चालना देते ते शिक्षण. शिक्षकाचे काम विद्यार्थ्यांना विचारप्रवण करणे हे आहे, आयत्या विचारांना पाठ करायला व त्यावरच विसंबून राहायला सांगणे हे नाही. शिक्षक-विद्यार्थी यांतील ज्ञानव्यवहार हा एकांगी असूच शकत नाही. शिक्षक कितीही उत्तम असेल, पण समोरचा विद्यार्थी जिज्ञासू व प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा नसेल, अथवा, विद्यार्थी कुतूहलाने भारलेला - मेहनती असूनही शिक्षक जर निव्वळ पोपटपंची करणारा, प्रश्नांना वावच न देणारा असेल - तर अर्थपूर्ण ज्ञानव्यवहार संभवणारच नाही. शिक्षक-विद्यार्थी ही परस्परपूरक अस्तित्वे आहेत. एकमेकांशिवाय त्यांना अर्थपूर्णता लाभणारच नाही. चांगला शिक्षक विद्यार्थ्यांना विचारप्रवृत्त करतो. तर चांगला विद्यार्थी शिक्षकाच्या मर्यादा ओलांडत ज्ञानव्यवहार विस्तारतो. खरंतर परस्परसंवादांत दोघेही परस्परांना समृद्ध करीत असतात. आपापल्या मर्यादा ओलांडत असतात. परस्परांच्या विचारांना आव्हान देत असतात- आवाहन करीत असतात. शिक्षक विद्यार्थ्याला स्वत:च्या पातळीवर खेचून घेत असतो आणि विद्यार्थीही त्याला प्रतिसाद देत प्रयत्नपूर्वक ती पातळी गाठू पाहतो. दोघांनाही परस्परांकडून शिकण्यासारखं खूपच असतं. आणि ही जुगलबंदी रंगते तेव्हाच खरे ज्ञान अस्तित्वात येते.
  असे शिक्षक आता राहिलेत कुठे? किंवा असे विद्यार्थी तरी आता कुठे आहेत? - हा रास्त प्रश्न विचारता येईलच. शाळा-महाविद्यालयांच्या बंदिस्त ‘मार्कस्’वादी करिअरिस्टिक चौकटीत हे कठीण आहे, हे मान्यच. पण चौकट कुठलीही असो, चांगला शिक्षक वर्गात ज्ञानाला पोषक असे वातावरण निर्माण करणारा हस्तक्षेप करूच शकतो. आजच्या घडीला हेही वास्तव लक्षात घ्यायलाच हवे, की माहिती-तंत्रज्ञानाचा विस्फोट झालेला असण्याच्या या काळात, विद्यार्थी आता पूर्वीसारखा माहितीसाठी शिक्षकावर अवलंबून राहिलेला नाही.

  तेव्हा माहिती देणे इतकेच आता शिक्षकाचे काम राहिलेले नाही. माहिती देण्यासाठी सुसज्ज वाचनालयांपासून ते माहिती महाजालापर्यंत अनेक साधने सहज उपलब्ध आहेत. त्या साधनांची योग्य ती दिशा त्यांना खुली करून द्यावी लागेल, जेणेकरून विद्यार्थी या भरगच्च माहितीजालात भरकटणार नाही. योग्य-अयोग्य प्रस्तुत-अप्रस्तुत माहितीत फरक करायला शिकवणे, त्याबद्दलचा कुतूहल व चिकित्साभाव जागृत करणे, विविधांगी माहितीचे व्यवस्थापन करणे - त्या माहितीतून एक नकाशा निर्माण करीत ज्ञानविषयाचा एक समग्र आराखडा विद्यार्थ्यासमोर उभा करणे - त्याबद्दलची चिकित्सेची साधने उपलब्ध करणे हे आता शिक्षकाचे काम आहे. झपाट्याने बदलणाऱ्या काळात सतत अद्ययावत राहणे, हे शिक्षकासाठी गरजेचे बनले आहे.

  विद्यार्थीही आता पारंपरिक भक्त राहिलेला नाही. राहताही कामा नये. शिक्षकांनाही आता पारंपरिक मठाधिपती बनून राहता येणार नाही. कवी विंदा करंदीकरांची एक सुप्रसिद्ध कविता आहे. अभंग हा पारंपरिक छंद वापरत विंदांनी या कवितेत शिक्षणाबद्दलचा आधुनिक आशय भरला आहे. ‘करितो आदरे, सद्गुरूस्तवन, ज्यांनी सत्यज्ञान वाढविले...’ असे म्हणत, पायथागोरस-न्यूटन-आइन्स्टाइन-पाश्चर-मेरी क्युरी-फ्रॉइड-डार्विन-मार्क्स-व्यास-कालिदास-होमर-शेक्सपिअर...आदी तमाम शास्त्रज्ञ-विचारवंत-भावद्रष्टे कलावंत यांना अभिवादन करीत असतानाच माझ्या विद्यार्थी असण्यालाही काही महत्त्व आहेच- हेही विंदा या कवितेतून ठासून सांगतात. सद्गुरूजवळ त्यांचे मागणे एकच- माझा भक्तिभाव नष्ट व्हावा. दासाचे दासपण नष्ट व्हावे. गुरूबद्दलच्या आपल्या विनम्र भाबड्या श्रद्धांनीच आपल्या ज्ञानपरंपरांना सुरूंग लावला आहे, याची स्पष्ट जाणीव ही कविता करून देते. आणि शेवटी ‘सद््गुरूवाचोनि सापडेल सोय, तेव्हा जन्म होय, धन्य धन्य...’ असे उद््गार काढत ही कविता, गुरू कितीही मोठा - श्रेष्ठ असला तरी, आपल्याला विद्यार्थी म्हणून त्याच्या पुढे जाता आला पाहिजे आणि हे पुढे जाणे ही प्रयत्नपूर्वक करण्याची किंबहुना जबाबदारीची गोष्ट आहे, याची लख्ख जाणीव करून देते. गुरू-शिष्यांच्या पारंपरिक चौकटीत रमणे आपल्या ज्ञानव्यवस्थेला परवडणारे नाही. काळाची नवीन आव्हाने पेलण्यासाठी शिक्षक-विद्यार्थी या दोघांनीही आता स्वत:ला सक्षम आणि परस्परपूरक केले पाहिजे. ‘सद्गुरूवाचोनि सापडेल सोय...’ हा विश्वास शिक्षकानेच आता विद्यार्थ्यांमध्ये पेरला पाहिजे. तरच बंदिस्त झालेल्या ज्ञानव्यवस्था खुल्या होतील.

  लेखकाचा संपर्क : ९८१९५७४०५०

  abhimedh@gmail.com

Trending