आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहसी बालसाहित्यिक कुमार नचिकेत मेकाले : एक रहस्य...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 प्रा.व्यंकट सोळंके

एक यशस्वी गूढ कादंबरीकार म्हणून नचिकेत मेकाले या दहावीत शिकणाऱ्या हुशार, गुणवान व साहसी कुमाराची "नचिकेत मेकाले आणि गूढ गोष्टींचे जग' ही कादंबरी कुमारांसह थोरामोठ्यांनाही मोहिनी घालते. 
 


सध्याच्या पिढीत वाचन संस्कृती वाढली पाहिजे असे आपण नेहमी म्हणत असतो. अभ्यासाशिवाय दुसरे काही करायचे नाही असा दंडक मुलांमध्ये भरून नाकासमोर चालायला लावणारे पालक व शिक्षक भरपूर आहेत. पण शिक्षण विस्तार अधिकारी असलेले केशव मेकाले हे शिक्षक व पालक या दुहेरी भूमिकेत बुद्धीबळ,वाचन,नृत्य, लेखन व शिक्षण ह्या सर्व गुणांनी संपन्न मुलगा नचिकेतचा एक नवा आदर्श समाजापुढे ठेवण्यात यशस्वी होतात. एक यशस्वी गूढ कादंबरीकार म्हणून नचिकेत मेकाले या दहावीत शिकणाऱ्या हुशार, गुणवान व साहसी कुमाराची "नचिकेत मेकाले आणि गूढ गोष्टींचे जग' ही कादंबरी कुमारांसह थोरामोठ्यांनाही मोहिनी घालते. 
या हुशार,कल्पक व गुणी हिऱ्याच्या शोधाचे श्रेय डॉ.सुरेश सावंत सर यांच्या रत्नपारखी दृष्टीला द्यावे लागेल. त्यांच्या बालसाहित्य चळवळीतल्या यशस्वी प्रयोगाचे फलित म्हणजे नचिकेत हा एक हिरा, असे म्हणायला काही हरकत नाही.कादंबरीचे सूक्ष्म वाचन व संपादनाचे श्रेय उपशिक्षणाधिकारी नामदेव माळी यांना जाते. नचिकेतला अनामिक जगाचं कुतूहल, गूढतेचे आकर्षण आठव्या वर्गात असल्यापासूनच आहे. त्यामुळेच या कादंबरीचा जन्म होऊ शकला. दुसऱ्यांना मदत करावी,माणुसकी जपावी, सुजाण नागरिक व भावनांची जपणूक करावी, या आई-वडिलांच्या नंदीनी व केशव मेकाले यांच्या भावनेचा आदर करत जीवनात दडलेल्या गोष्टीचा शोध तो या कादंबरीत मांडताना दिसतो.

दुनिया अनेक गूढ रहस्यांनी भरलेली आहे. प्रत्येक व्यक्ती रहस्य शोधाच्या मागे धावत  असते. माणसांना भुलवणारी रहस्ये कोठेतरी दडलेली असतात. त्यांचा मागोवा घेऊन पाठपुरावा करत ती उत्तरं मात्र प्रत्येकजण आपल्या परीनं शोधत असतो. पृथ्वीतलावर ज्या गोष्टी आहेत त्या वास्तव ज्ञात असतात. पण काही काल्पनिक असतात. त्या काल्पनिक गोष्टीला पंख असतात. कल्पना ह्या सत्य होतात त्यास वैज्ञानिक जोड व वैज्ञानिक दृष्टिकोन मिळावा लागतो. काल्पनिकतेस वैज्ञानिक जोड मिळाली की त्या सत्यात उतरतात म्हणून आईनस्टाईन म्हणतात, ज्ञानापेक्षा कल्पना महत्त्वाची असते. कल्पनेतून सत्य व सत्यातून  ज्ञान ही अनुभूतीशोधाकडे घेऊन जाते. म्हणून नचिकेत मेकाले हा या कादंबरीत नायक आणि संशोधक ह्या भूमिका  साकारतो.त्याचबरोबर तो सत्तेपेक्षा सत्याच्या बाजूने ही सद्विचार संकल्पना जादूई दुनियेत  विज्ञानाच्या कसोटीत खरी उतरण्याचे कसब बाळगून आहे.

समुद्राच्या काठावरची नीरव शांतता नचिकेतला गूढ गोष्टींच्या मागे धावायला लावते. समुद्राच्या क्षितिजापाशी गडप होणाऱ्या सूर्याचे सोनेरी किरणांचे गूढ शिंपण ही निसर्गमय किमया एका अनामिक रहस्यशोधास नचिकेतला प्रवृत करतात. बुडणाऱ्या सूर्याचा सोनेरी गोळा झाडाच्या सावल्यांना आकार देतांना व पक्ष्यांच्या पंखांना सोनेरी किनार सजवतांना वेगवेगळ्या गुपितांनी नायकाला त्यांच्या शोधांचा मागोवा घ्यावयास लावते. उडणाऱ्या पक्ष्यांच्या थव्याने घराकडे परतीचे वेध नचिकेतच्या मनात उमेद जागवते. मावळणाऱ्या सूर्याच्या आकाशात दिसणारी चंद्राची प्रतिमा बघत मनाची अनामिकता जागी होते, त्यांच्या शक्तीची चाहूल देते.

किशोरवयीन मुलांच्या मनातला साहसी नायक नचिकेत हा या नव्या फॅण्टसीचा मराठी हँरी पाॅटर... एव्हेंजर्सच्या लढाईचे तंत्र व सुपर हिरोची पावर घेऊन मराठी मनाचा 'टावर ऑफ होप' व बाल साहित्यातील कुमारांचे उज्ज्वल भविष्य होय. डॉ. सुरेश सावंत सर यांनी केलेली ह्या पुस्तकाची पाठराखण नवोदित लेखकांना बळ देणारी आहे. नयन बारहाते यांचे जादुई नगरीचे नयनरम्य मुखपृष्ठ कादंबरीचे वेगळेपण सांगते. 

(लेखकाचा संपर्क - ९९२२६५४७३२)

बातम्या आणखी आहेत...