आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गांधींविषयीच्या आकलनात बदल 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतील वरळी भागात असलेले नेहरू सेंटर या वास्तूचा नाटक, संगीत, चित्र, छायाचित्रं वगैरेंसारख्या कलांचा आस्वाद घेण्याचे उत्तम केंद्र असा सार्थ लौकिक आहे. अशा कलांच्या जोडीला तेथे अनेकदा जागतिक दर्जाच्या विचारवंतांची व्याख्यानं आयोजित केली जातात. २४ जानेवारीला तेथे लॉर्ड भिखू पारेख यांचे महात्मा गांधींच्या विचारांवर व्याख्यान झाले. हे वर्ष २०१९ म्हणजे गांधीजींच्या जन्माचे  १५० वे वर्ष!  


पारेख सरांचा ‘राज्यशास्त्र’ हा अभ्यासाचा विषय आहे. ‘मार्क्स थिअरी ऑफ आयडियॉलॉजी’, ‘गांधीज पोलिटिकल फिलॉसॉफी’ वगैरे चटकन आठवणारी त्यांची महत्त्वाची पुस्तकं. त्यांचा अभ्यासाचा विषय म्हणजे ‘बहुसंस्कृतिवाद’. २००१ मध्ये प्रसिद्ध झालेले त्यांचे ‘िरथिकिंग मल्टिकल्चरॅलिझम ः कल्चरल डायव्हर्सिटी अँड पोलिटिकल थिअरी’ हे पुस्तक आजही चर्चेत असते. १९९१ मध्ये सुरू झालेले जागतिकीकरण सर्वांना गोड वाटत होते. पण जेव्हा जागतिकीकरण म्हणजे फक्त परदेशी बनावटीचे सेंट किंवा लिपस्टिक एवढेच नव्हे, तर यात जगभर माणसांचा कामाच्या शोधात मुक्त संचार हेसुद्धा यात येते हे लक्षात आले. माणसं रोजगारासाठी मायदेशातून परदेशी जातात तेव्हा ते फक्त कामगार नसतात. त्यांच्यात एक जिवंत संस्कृती असते व ती संस्कृती घेऊन इतर देशांत/संस्कृतीत जातात. अशा वेळी स्थानिक संस्कृतीने या बाहेरून आलेल्या संस्कृतीशी कसे संबंध ठेवावेत हा आजच्या जगात सर्वांना त्रस्त करणारा प्रश्न आहे. भिखू पारेख यांनी याचा अभ्यास केला व आजही करत आहेत. त्यांच्या मते, प्रत्येक देशातील स्थानिक संस्कृतीने बाहेरच्या लोकांनी आणलेल्या त्यांच्या संस्कृतीशी सहिष्णुतेने व्यवहार केला पाहिजे.  


ही सहिष्णुता महात्मा गांधींच्या विचारात आहे. म्हणूनच पारेख सरांनी आपोआपच गांधी विचारांचा मागोवा घेतला. नेहरू सेंटरने आयोजित केलेल्या व्याख्यानाचा विषयच ‘गांधीयन व्हॉइस इन कंटेम्पररी इंडिया’ होता. आपल्या देशात  काही वर्षांपासून असहिष्णुता वाढत आहे. ते बघता याच भारतात मोहनदास करमचंद गांधी नावाचा महामानव होऊन गेला होता यावर विश्वास बसत नाही. अशा प्रतिकूल स्थितीत केवळ भारतानेच नव्हे, तर साऱ्या जगाने गांधी विचारांची नव्याने ओळख करून घेतली पाहिजे. 


गांधीजी दक्षिण आफ्रिकेत तब्बल २१ वर्षे होते. या काळात त्यांनी त्यांचे राजकीय तत्त्वज्ञान, अहिंसक लढ्याचे तंत्र पक्के केले. आता त्याच दक्षिण आफ्रिकेतून गांधीजींच्या तत्त्वज्ञानावर, त्यांनी त्या काळी वेळोवेळी घेतलेल्या भूमिकांवर गंभीर आणि अभ्यासपूर्ण आक्षेप घेण्यात येत आहेत. गांधीजींना निग्रोंच्या समस्येत फार काही रस नव्हता, त्यांना दक्षिण आफ्रिकेतील हिंदी समाजावर होत असलेले अन्याय थांबवायचे होते वगैरे आरोप आता व्हायला लागले आहेत. डिसेंबर २०१८ मध्ये तर घाना या पश्चिम आफ्रिकेतील देशातील (लोकसंख्या ः २ कोटी ८० लाख) ‘घाना विद्यापीठा’ने एका ठरावाद्वारे तेथील विद्यापीठाच्या आवारातील गांधीजींचा पुतळा काढण्याचा निर्णय घेतला. घाना विद्यापीठाच्या मतांनुसार निग्रो समाजाबद्दल महात्मा गांधींचे मत प्रतिकूल होते व गांधीजी दक्षिण आफ्रिकेत फक्त तेथील भारतीय समाजाच्या हक्कांसाठी लढले होते, निग्रोंच्या नाही. या निर्णयाचे भारतीयांना आश्चर्य वाटणे, या निर्णयाचा धक्का बसणे स्वाभाविक आहे. मात्र या निर्णयावर प्रतिक्रिया देताना लोकशाही मूल्यांचे भान ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. हा निर्णय एका सार्वभौम देशातील विद्यापीठाने घेतला आहे हे कदापि विसरता कामा नये. हा निर्णय आपल्याला आवडो वा न आवडो, या निर्णयाचा मान ठेवलाच पाहिजे.   


आज ज्या प्रकारे गांधीजींबद्दल घानात पुनर्मूल्यमापन सुरू आहे तसे पाहिले तर हा प्रकार नवीन नाही. लेनिननंतर सोव्हिएत युनियनचे समर्थपणे नेतृत्व करणाऱ्या स्टॅलिनचे १९५६ नंतर त्याच्याच देशात वाभाडे काढण्यात आले होते. स्टॅलिनचा मृत्यू १९५३ मध्ये झाला व अवघ्या तीनच वर्षांत स्टॅलिनचे पुतळे लोकांनी पाडले. असाच प्रकार १९९१ मध्ये लेनिनबद्दलही झालेला दिसून येतो. एखादा महापुरुष सदासर्वकाळ समाजात आदरणीय राहील याची आजच्या काळात खात्री देता येत नाही. महापुरुषांच्या मूल्यमापनात कालानुरूप बदल होत असतात. त्यात धक्का बसावा असे काही नाही. यात जर उच्च दर्जाचे सुसंस्कृत वागणे आणि व्यासंग दिसत असेल तर याबद्दल आक्षेप घेण्याची गरज नाही. २०१५ मध्ये प्रा. अश्विन देसाई व प्रा. गुलाम वाहेद यांनी ‘गांधी : स्टेचर बेअरर ऑफ एम्पायर’ हा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिला. या लेखकद्वयाने दाखवून दिले की, १८९९ मध्ये झालेल्या दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटिश साम्राज्य यांच्यातील युद्धात गांधीजींनी ब्रिटिशांना पाठिंबा दिला होता. एवढेच नव्हे तर इंग्लंड जिंकावे म्हणून त्यांनी इंग्रजांच्या साम्राज्याला स्वयंसेवक पुरवले होते. नंतर मात्र गांधीजींचे विचार बदलले व त्यांनीच भारतातून इंग्रजांनी कायमचे जावे यासाठी स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले होते. लॉर्ड भिखू पारेख यांच्या व्याख्यानाचा विषय आणि दक्षिण आफ्रिकेतील काही अभ्यासकांचा विषय यातील तफावत बघून गंमत वाटली. 

बातम्या आणखी आहेत...