आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर- ज्येष्ठ विचारवंत, भाष्यकार, लेखक, संगमेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक फखरुद्दीन बेन्नूर (८२) यांचे शुक्रवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. विजापूर रस्त्यावरील बेन्नूरनगर आयटीआयच्या पाठीमागे असलेल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. प्रा. बेन्नूर यांच्यावर शनिवारी दुपारी दोन वाजता मोदी जवळील मुस्लिम कब्रस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
प्रा. बेन्नूर यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९३८ रोजी सातारा येथे झाला. त्यांनी राज्यशास्त्रात पदवी घेतली होती. सुमारे चार दशके प्राध्यापक लेखक, साहित्यिक म्हणून त्यांची लेखणी व वाणी समाजाला दिशा देत होती. विविध शोधनिबंध त्यांनी सादर केले. तेरा पुस्तके त्यांनी लिहिली. संगमेश्वर महाविद्यालयात १९६६ ते १९९८ या कालावधीत ते प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. अल्पसंख्याक समाजातील विचारांचे भाष्यकार होते. कर्नाटक विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठात हिंदू-मुस्लिम प्रश्न, मुस्लिम राजकारण सामाजिक सौहार्द, कार्ल मार्क्स, महात्मा गांधी, पंडित जवाहर लाल नेहरू, छत्रपती शाहू महाराज यांसह तब्बल दीडशेहून अधिक विषयावर त्यांचे शोध निबंध प्रसिद्ध झाले आहेत. अनेक वृत्तपत्रे. मासिक, साप्ताहिक यात विपुल लेखन केले आहे. त्यांना मानाचा छत्रपती शाहू महाराज पुरस्कार मिळाला होता.
१९७० पासून मुस्लिम समाज प्रबोधनाच्या चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. १९९० साली आखिल भारतीय मुस्लिम साहित्य परिषदेची स्थापना बेन्नूर यांनी केली. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळावर जवळपास दोन वर्षे ते सदस्य होते. शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र परिषदेचे ते दोन वर्षे अध्यक्ष राहिले. २००७ साली कराची येथे घेण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील चर्चासत्रात ते सहभागी झाले होते. २००८ सालच्या नेपाळमधील निवडणुकीची पाहणी करण्यासाठी त्यांची निवड झाली होती. अनेक मुस्लिम मराठी साहित्य संमेलने बेन्नूर यांनी आयोजित केली. त्यांच्या निधनाने साहित्य विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.