आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका डोळ्याने अधू; पण ३७ वर्षे मेहनत घेऊन केला ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा इंग्रजीतून अनुवाद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर  । माधुकरी मागून शिक्षण पूर्ण करत आणि एका डोळ्याने अंध असूनही तब्बल ३७ वर्षे मेहनत घेऊन पंजाबराव कृषी विद्यापीठातील कृषी रसायनशास्त्राचे माजी प्राध्यापक रघुनाथ सीताराम कडवे यांनी ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचे इंग्रजीत अनुवाद केले आहे.  १९८२ मध्ये त्यांनी ज्ञानेश्वरीच्या अनुवादाला सुरुवात केली. त्यास ३७ वर्षे लागली. आता ते प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

 
प्रा. कडवे यांचा जन्म सामान्य कुटुंबात झाला. बालपणीच वडील गेले. आई रुक्माबाईने मोलमजुरी करून शिकवले. दानशूरांच्या घरी वार लावून जेवून, एकेक रुपया मागून शिक्षण पूर्ण केले. एका डोळ्याची दृष्टी बालपणीच गेली. तुकडोजी महाराजांच्या कार्याचा परिचय बालपणीच झाला होता. म्हणून स्वेच्छानिवृत्ती घेऊन पूर्णपणे राष्ट्रसेवेला वाहून घेतल्याचे कडवे यांनी सांगितले. आपल्याकडे ज्ञानेश्वर-तुकारामादी संतांनी अमूल्य साहित्य संपदा निर्माण केली. परंतु समाज त्याकडे दुर्लक्ष करतो. आपण इक्वेटझर, टाॅलस्टाॅय, कन्फ्युशियस, साॅक्रेटिस, लिंकन आदींचे साहित्य आवर्जून वाचतो. आपल्या लेखन, भाषणात त्यांची अवतरणे देतो. त्यामुळे आपले भाषण भारदस्त होते, असा एक समज आहे. मग ज्ञानेश्वरादी संतांनी याहीपेक्षा चांगले तत्त्वज्ञान सोप्या भाषेत मांडलेले आहे.  

 

देश-विदेशात पाठवणार ज्ञानेश्वरी  :

आंग्लाळलेल्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्ञानेश्वरीचा ओवीबद्ध अनुवाद केला. ३ खंडांत ९०१४ अोव्या आहेत. पहिल्या खंडात ९, दुसऱ्यात  १० ते १५ व तिसऱ्यात १६ ते १८ अध्यायांचा समावेश आहे. सध्या प्रत्येकी १०० प्रती छापणार अाहे. त्यातील काही विदेशातील ग्रंथालयांना पाठवणार असल्याचे कडवे यांनी सांगितले. अ. ना. देशपांडे यांच्याकडून ज्ञानेश्वरीचा अर्थ समजून घेतला.  
 

५१ देशांतील वाचनालयांत राष्ट्रसंतांची इंग्रजी ग्रामगीता  
प्रा. कडवे यांनी ४०० छायाचित्रांचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे आत्मचरित्र आणि संत गाडगेबाबांवर ८ पुस्तके लिहिली आहेत. आतापर्यंत ५१ देशांतील वाचनालयात त्यांनी अनुवादित केलेली इंग्रजी ग्रामगीता पोहोचली आहे. आता ज्ञानेश्वरीही पाठवण्याचा त्यांचा मानस आहे.

बातम्या आणखी आहेत...