आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रकुल स्पर्धेपासून प्रकल्प रखडला, एक दशक भ्रष्टाचाराने ग्रासले : मोदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - हरियाणाला दिल्लीशी जोडणाऱ्या कुंडली-मानेसर-पलवल एक्स्प्रेस-वे अखेर नऊ वर्षांच्या विलंबानंतर सुरू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी त्याचे उद््घाटन झाले. हा मार्ग सुरू झाल्यामुळे दिल्लीची अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे होणारी कोंडी सुटणार आहे. अशा वाहनांना दिल्लीत येण्याची गरज भासणार नाही. एक्स्प्रेस-वे हा एकप्रकारे रिंग-रोड आहे. उद््घाटनाच्या निमित्ताने मोदींनी काँग्रेसवर टीका केली. एक दशकापूर्वी राष्ट्रकुल स्पर्धेवेळी हा मार्ग तयार व्हायला हवा होता.

 

परंतु भ्रष्टाचारामुळे तो रखडला, अशी टीका मोदींनी काँग्रेसवर केली. मात्र, हा मार्ग सुरू झाल्याने हरियाणात वाहतुकीचे नवे पर्व सुरू होईल. दुसरीकडे काँग्रेसने मोदी सरकारवर एक्स्प्रेस-वेचे घाईघाईत उद््घाटन उरकल्याचा आरोप केला. पाच राज्यांतील निवडणुकीत लाभ मिळवण्याच्या उद्देशाने भाजप सरकारने जनतेच्या प्राणाशी खेळ खेळला आहे. या मार्गाच्या थर्ड पार्टी कन्सल्टंट फर्मने कम्प्लिशन सर्टिफिकेट देण्यास मनाई केली आहे. हरियाणा राज्य आैद्योगिक व पायाभूत विकास महामंडळही एक्स्प्रेस-वे सुरू करण्याच्या विरोधात आहे. कारण काही घटना घडल्यास त्याची जबाबदारी ते घेणार नाहीत, असा दावा काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला. काही अपघात झाल्यास त्याची जबाबदारी मोदी घेणार की खट्टर? असा प्रश्नही सुरजेवाला  यांनी केला. 

 

५० हजार वाहनांची वर्दळ, ६४०० कोटी खर्च

या रिंग रोडवरून दररोज सरासरी ५० हजार अवजड व छोटी वाहनांची वाहतूक होईल. ही वाहने दिल्लीबाहेरूनच वळण घेत इतर राज्यांत जातील. एक्स्प्रेस-वे सुरू करण्याची मुदत २००९ होती. ती लांबल्याने त्यावरील खर्च ६४०० कोटी रुपये असा तिप्पट झाला.३ हजार ८४६ एकरच्या भूसंपादनासाठी २ हजार ७८८ कोटी रुपये लागले आहेत. 

 

वेस्टर्न पेरिफेरी वे अशी आेळख, २७० किमी लांब

केएमपीला दिल्ली वेस्टर्न पेरिफेरी वे असेही आेळखले जाते. एनएच-१, एनएच-२, एनएच-८ व एनएच-१० च्या कक्षेत येणाऱ्या शहरांना जोडण्याचे काम हा मार्ग करेल. मानेसर ते कुंडलीपर्यंत ८३ किमी आहे. ११७ अंतर्गत मार्ग आहेत. केएमपीवर ७ टोल प्लाझा बनवण्यात आले आहेत. ईस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेस-वे धरून या मार्गाची एकूण लांबी २७० किलोमीटर एवढी आहे. 

 

एक्स्प्रेस मार्गावर दूरपर्यंत शौचालये, रुग्णवाहिका, बस थांब्यांचाही अभाव 
-‘भास्कर’ने काँग्रेसच्या आरोपांचे तथ्य तपासण्यासाठी एक्स्प्रेस-वे व कुंडली ते पलवलची पडताळणी केली. त्यात या मार्गावर शौचालयांची व्यवस्था दिसली नाही. वास्तविक सरकार देशभरात खुल्यावरील शौचमुक्तीचे अभियान चालवत आहे. 
- केएमपीवर बस स्थानक सोडा. परंतु बससाठी एकही थांबा बनवलेला नाही. त्यावरून सरकारला बायपासवर बस चालवायची नाही, हे दिसते.
- कुंडली ते पलवलपर्यंत एकही पोलिस बूथ नाही. लुटालुटीच्या वाढत्या घटना पाहता एक्स्प्रेस-वे प्रवासासाठी जोखमीचा ठरतो. {संपूर्ण मार्गावर पेट्रोल पंप नाही. अर्थात डिझेल-पेट्रोल संपल्यावर वाहन चालवताना चालकाला ही बाब त्रासदायक ठरू शकते. 
- ८४ किमीच्या परिसरात रुग्णवाहिका दिसली नाही. फोन बूथही नाही. अर्थात आणीबाणीच्या स्थितीत ही बाब अडचणीची ठरणारी आहे. 

 

२००३ मध्ये वाजपेयी सरकारचा प्रस्ताव

- केएमपी प्रस्ताव २००३ मध्ये अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली रालोआने आणला होता.
- २००४ मध्ये मनमोहन सरकारने प्रकल्पाचा खर्च १९१५ कोटी केला.  
- २००९ मध्ये प्रकल्प तयार अपेक्षित. पण २०१२ मध्ये नवीन मुदत निश्चित

- प्रकल्प पूर्ण होण्यासाठी १५ वर्षे लागली. तीन सरकारे बदलल्यानंतर प्रकल्प पूर्ण होऊ शकला. 

 

बातम्या आणखी आहेत...