Home | Magazine | Rasik | Promotion for Shooting Article by parikshit Suryavanshi

संवर्धनासाठी शूटिंग

परीक्षित सूर्यवंशी | Update - Dec 09, 2018, 12:09 AM IST

चिंताजनक काळात रिता बॅनर्जी माहितीपटाच्या माध्यमातून ईशान्य भारतात वन्यजीव संवर्धनाची मोहीम राबवत आहेत.

 • Promotion for Shooting Article by parikshit Suryavanshi

  वन्यजीवांची शिकार हा वर्तमानातला अत्यंत चिंतेचा विषय आहे. कधी खुद्द सरकारचे प्रतिनिधीच शिकारीचे आदेश देत आहेत, तर कधी तस्करांकडून शिकारीचे फर्मान सुटते आहे. अशा या चिंताजनक काळात रिता बॅनर्जी माहितीपटाच्या माध्यमातून ईशान्य भारतात वन्यजीव संवर्धनाची मोहीम राबवत आहेत. त्यांच्या कार्याचा धांडोळा घेणारा हा लेख...

  सर्वप्रथम ती तिथे गेली, २००२ मध्ये. शिकार झालेल्या अस्वलाच्या दोन अनाथ पिल्लांचे पुनर्वसन केले जाणार होते. त्यावर तिला एक फिल्म बनवायची होती. हे सर्व पाहून ती खूप अस्वस्थ झाली होती. तिच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले होते. या प्रश्नांची उत्तरे शोधताना पारंपरिक शिकारीत झालेल्या बदलांमुळे हे घडत असल्याचे तिला जाणवले. मांसासाठी वन्यजीवांची शिकार हा पूर्वी येथील लोकांच्या सांकृतिक जीवनाचा एक भाग होता. आधी प्रत्येक गावात मोजके कसबी शिकारी असत, त्यांनी केलेल्या शिकारीचे मांस संपूर्ण समूहात वाटले जाई. महत्त्वाचे म्हणजे, शिकार ही धार्मिक विधी आणि उत्सवांशी जोडलेली होती. परंतु आता शिकार केली जाते, ती पैशांसाठी आणि शहरांतील मांस-बाजारात वन्यजीवांचे मांस विकण्यासाठी. परंतु पुरेशा संख्येने वन्यप्राणीच शिल्लक नसल्यामुळे बरेचसे जंगल आता शांत झाले आहे, आणि शिकार करणाऱ्यांना आता शिकारीसाठी जंगलात खूप खोलवर जावे लागत आहे. या बदलत्या परिस्थितीचा वेध तिने घेतला, तो ‘वाइल्ड मीट ट्रेल’ या ग्रीन ऑस्कर मिळालेल्या फिल्ममधून. या फिल्मवर काम करतानाच या समस्येवर स्थानिक लोकांसोबत काम करण्याची गरज तिला जाणवली. तिने कामाला सुरुवात केली, ती मुख्यत्वे तरुणांसोबत, उद्या ते पुन्हा वन्यजीवन बहरायला मदत करतील, या आशेने. वरील उतारा ज्या व्यक्तीबद्दल आहे त्यांचे नाव आहे, रिता बॅनर्जी, तो प्रदेश आहे, ईशान्य भारत आणि त्यांनी सुरू केलेल्या उपक्रमाचे नाव आहे - ग्रीन हब!


  रिता बॅनर्जी या भारतातील आघाडीच्या पर्यावरणविषयक चित्रपट निर्मात्या (फिल्ममेकर) आहेत. त्यांच्या अनेक माहितीपटांना ‘ग्रीन ऑस्कर’ म्हणून ओळखला जाणारा पांडा अवॉर्ड मिळाला आहे. ईशान्य भारतात त्यांनी केलेल्या कामाबद्दल बॅनर्जी यांना नुकताच यंदाचा प्रतिष्ठत आरबीएस अर्थ हीरोज ‘इन्स्पायर’ पुरस्कार उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. वन्यजीव संवर्धन क्षेत्रात दबदबा असलेल्या रिता बॅनर्जी गेल्या २५ हून अधिक वर्षांपासून दृश्य माध्यमाचा पर्यावरण संवर्धनासाठी परिणामकारकरीत्या वापर करत आहेत. त्यांच्या अनेक माहितीपटांचा लोकांवरच नव्हे, तर शासकीय धोरणांवरदेखील मोठा प्रभाव पडला आहे. उदा. माईक पांडे यांच्यासोबत त्यांनी तयार केलील्या ‘शोर्स ऑफ सायलेन्स - व्हेल शार्क्स इन इंडिया’ या फिल्ममुळे भारतात व्हेल शार्क्स माशांच्या शिकारीवर पूर्ण बंदी आणण्यात आली आहे. ईशान्य भारतातील ‘वाइल्ड मीट ट्रेल’ या फिल्मचं शूटिंग २००७ मध्ये पूर्ण झाल्यानंतर रिता यांनी तिथे ‘अंडर द कॅनपी’ हा शिक्षकांना प्रशिक्षण देणारा कार्यक्रम हाती घेतला. यात तळागाळातील शिक्षकांना पर्यावरण आणि वन्यजीव शिक्षण दिले जाते, गुवाहाटीतील ‘नॉर्थ ईस्ट नेटवर्क’च्या मदतीने पुढे इको क्लबमध्येही या कार्यक्रमाचा विस्तार करण्यात आला.

  नॉर्थ ईस्ट नेटवर्कच्या साथीनेच २०१४मध्ये बॅनर्जी यांनी ‘ग्रीन हब’ची स्थापना केली. ग्रीन हब हा तरुणांसाठीचा एक समूहाधारित (कम्युनिटी बेस्ड) शिष्यवृत्ती उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत ईशान्य भारतातील तरुणांना तेथील पर्यावरण आणि सामाजिक बदलासंबंधी व्हिडिओ तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. प्राप्त नैसर्गिक वारशाबद्दल त्यांच्या मनात आदर निर्माण होणे, जैवविविधता संवर्धनासाठी सक्षम करणे हे यामागचे उद्देश आहेत. प्रशिक्षणानंतर या तरुणांना पर्यावरणीय प्रकल्पांशी जोडले जाते, जेणेकरून त्यांना पर्यायी उपजीविकेचे साधन मिळेल आणि निसर्ग संवर्धनही घडून येईल. हे सर्व करत असतानाच या उपक्रमाच्या माध्यमातून ईशान्य भारतातील जैवविविधतेसंबंधी माहितीचा एक अप्रतिम संग्रहदेखील अस्तित्वात येत आहे. परंतु ईशान्य भारतासारख्या प्रदेशात असा उपक्रम राबवणे सोपे होते का? तर मुळीच नाही. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असल्याने सगळ्यात पहिले आव्हान होते, ते कल्पनेला मूर्तस्वरूप देण्याचे, कागदावरील विचारांची जमिनीवर अंमलबजावणी करण्याचे. या प्रशिक्षणात दुर्गम भागातील तरुणांना सहभागी करून घ्यावयाचे होते. त्यासाठी पुरेशा अर्जांची प्राप्ती, काटेकोर निवड प्रक्रिया आणि त्यानंतर या क्षेत्रातील मातब्बरांकडून प्रशिक्षण या सर्व पातळ्यांवर कसून तयारी केली गेली. इतकी तयारी करूनदेखील प्रशिक्षणाचा दर्जा राखण्यापासून ते या उपक्रमाच्या प्रत्यक्ष परिणामांपर्यंत प्रत्येक पायरीवर प्रचंड अनिश्चितता होती. सर्वांत मोठे आव्हान होते, ते या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाला खरोखर मदत होईल आणि येथील तरुणांना सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होईल याची खात्री करण्याचे. परंतु स्वच्छ हेतू आणि दृढ निश्चयाच्या बळावर या रोपट्याने लवकरच बाळसे धरायला सुरुवात केली आहे.

  आता दरवर्षी ग्रीन हबकडे एकूण २० जागांसाठी २०० हून अधिक अर्ज येत आहेत. जैवविविधता, सामूहिक पर्यावरण संवर्धन, शेती, पारंपरिक उपचारपद्धती, लोकगीत, विणकाम, परंपरागत ज्ञान अशा विविध विषयांवरील ६० हून अधिक लघु चित्रपटांची निर्मिती ग्रीन हबच्या विद्यार्थ्यांनी केली आहे. बालहक्क आणि स्त्री-पुरुष समानतेवर काम करणाऱ्या संघटनांसह ३० हून अधिक संघटनांनी या प्रकल्पाशी स्वतःला जोडून घेतले आहे. शिवाय, तेजपूर युनिव्हर्सिटी, बंगळुरूचे सृष्टी डिझाइन स्कूल त्याचप्रमाणे डेहराडून येथील वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांसारख्या नावाजलेल्या संस्थाही या प्रकल्पाच्या भागीदार बनल्या आहेत. ४-५ वर्षांच्या काळातच दिसून आलेले, हे सकारात्मक परिणाम खूपच उत्साहवर्धक आहेत. आधीच्या बॅचचे अनेक तरुण आज संवर्धन आणि सामाजिक बदलावरील प्रकल्पांवर काम करत आहेत. ४ सदस्यांनी ‘जेनेसिस ४’ या नावाने आपला स्वतःचा उपक्रम सुरू केला असून, त्यांचे काम उत्तम चालले आहे. इतर काहींना अरण्यक, कॉर्बेट फाउंडेशन, इनसाइड नॉर्थ ईस्ट, मास्क यांसारख्या स्वयंसेवी संस्थांमध्ये संधी मिळाली आहे. तर इतर ४ जणांना पर्यावरण संवर्धनावर काम करण्यासाठी ‘मड ऑन द बूट’ ही शिष्यवृत्ती मिळाली आहे. ४ तरुणांना २०१७ मध्ये बालीपारा फाउंडेशन पुरस्कार मिळाला, तर इतर काही जणांना त्यांच्या फिल्म्स आणि फोटोग्राफ्ससाठी गौरवण्यात आले. बाकीचेही त्यांच्या आधीच्या संस्थांसोबत वाढीव क्षमतेने काम करत आहेत. ईशान्य भारत हा भारतातील जैवविविधतेने संपन्न अशा काही शेवटच्या प्रदेशांपैकी एक आहे. ‘ग्रीन हब’ त्या क्षेत्रातील तरुणांना आपल्या पर्यावरणाचे संरक्षण करण्यास मदत करत आहे. आशा आहे, ते लवकरच बंदूक आणि तीरकमान टाकून हातात कॅमेरा आणि फिल्डगाइड्स घेतील आणि वन्यजीवांना मारण्यासाठी नव्हे, तर तारण्यासाठी ‘शूट’ करतील!

  संवर्धकांचा सन्मान

  आरबीएस समूहाची उपकंपनी असलेल्या रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडने २०११ साली आरबीएस पुरुस्कार द्यायला सुरुवात केली. दरवर्षी, पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धन क्षेत्रात पायाभूत स्तरावर आदर्श स्वरूपाचे काम करणाऱ्यांना या पुरस्कारांनी गौरविण्यात येते. दरवर्षी नवी दिल्ली येथे ऑक्टोबर महिन्यात हा पुरस्कार सोहळा संपन्न होतो. २०१८ हे या पुरस्कारांचे आठवे वर्ष होते. यंदा उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते डॉ. ब्रिजगोपाल, मध्य प्रदेश वनविभाग विशेष कार्यदल,पिरा राम बिष्णोई, देवेंदर सिंग, अभिलाष खांडेकर, ललितकुमार बोस आदींना आरबीएस पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Trending