आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिरेक्यांसाठी संपूर्ण पाकिस्तानला जबाबदार ठरवता येणार नाही : सॅम पित्रोदा; मागितले हवाई दलाच्या कारवाईचे पुरावे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आणि काँग्रेसच्या आंतरराष्ट्रीय विभागाचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी बालाकोट येथे भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईचे पुरावे मागितले आहेत. सपाचे नेते रामगोपाल यादव यांनीही पुलवामा हल्ला हे मतांसाठीचे षड््यंत्र असल्याचे म्हटले आहे. पित्रोदा आणि यादव यांच्या वक्तव्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जनता यांना माफ करणार नाही.  पित्रोदा यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी यांनी गप्प राहणे पसंत केले आहे. हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे सांगत काँग्रेसने हात झटकले आहेत. 

 

 

अतिरेक्यांसाठी संपूर्ण पाकिस्तानला जबाबदार ठरवता येणार नाही : पित्रोदा 
हवाई दलाने जर ३०० अतिरेकी मारले असतील तर ठीक आहे, मात्र याचे पुरावे देता येतील का ? आठ अतिरेक्यांसाठी संपूर्ण पाकिस्तानला दोषी ठरवू शकत नाही. सत्य काय आहे हे जाणून घेण्याचा मला हक्क आहे. 

 

 

काँग्रेसने हात झटकले; पित्रोदांचे वक्तव्य वैयक्तिक : 

पित्रोदांचे वक्तव्य वैयक्तिक : पुलवामा हल्ला ही मोदी सरकारची सर्वात मोठी राष्ट्रीय सुरक्षेतील चूक होती. बालाकोट एअर स्ट्राइक हे हवाई दलाच्या चमकदार कामगिरीचे उदाहरण होते, हे काँग्रेसने यापूर्वीच हे स्पष्ट केले आहे.  मोदी आणि भाजपने एखाद्याच्या वैयक्तिक विचारांचा आधार घेत विष कालवणे बंद करावे. असे काँग्रेसचे मीडिया प्रमुख रणजित सुरजेवाला म्हणाले.  

 

मोदींचे उत्तर -

काँग्रेसकडून पाकिस्तानचा राष्ट्रीय दिवस साजरा करण्याची सुरुवात केली, हे लज्जास्पद आहे.
मोदींनंतर अरुण जेटली म्हणाले, जर गुरू (सॅम पित्रोदा) असे भाष्य करत असेल तर त्यांचा शिष्य (राहुल) कसा असेल, हे लक्षात येते.

 

 

भाजपच्या टीकेनंतर पित्रोदा म्हणाले,

हे माझे वैयक्तिक विचार आहेत, काँग्रेसचा याच्याशी संबंध नाही. मी पुरावे मागितले आहेत. लोकशाहीत प्रत्येकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. त्यावर एवढा गहजब का? 

 

 

सपाचे रामगोपाल यादव यांचे वादग्रस्त वक्तव्य    
सपाचे नेते रामगोपाल यादव यांनी गुरुवारी इटावातील सैफई येथे वादग्रस्त वक्तव्य केले होते की, निमलष्करी दल सरकारवर नाराज आहे. मतांसाठी जवान मारले गेले. जम्मू-श्रीनगरदरम्यान तपासणी होत नव्हती. जवानांना साध्या बसमधून पाठवण्यात आले, हे एक प्रकारचे षड‌्यंत्र होते.