आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय जमिनीवर प्लॉट पाडून बेकायदा विक्री, मेहरूणमधील प्रकार; उल्हास साबळेंची लोकशाही दिनी तक्रार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - मेहरूणमधील गट क्रमांक ४२२ मधील शासनाच्या कोट्यवधी रुपये किमतीच्या जागेचे नियमबाह्य हस्तांतरण करण्यात आले. या जागेत बेकायदेशीररीत्या होत असलेले प्लाॅटचे खरेदी-विक्रीचे व्यवहार त्वरित थांबवण्यात यावे. तसेच जागा सरकार जमा करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याबाबत सामाजिक कार्यकर्ते उल्हास साबळे यांनी जिल्हास्तरीय लोकशाही दिनी तक्रार केली आहे.


मेहरूण शिवारात गट क्रमांक ४२२मध्ये असलेली ही शासकीय जागा सन १९६४मध्ये ओंकारदास बळीराम जोशी यांना स्टोन क्रशर व खडी गोळा करण्यासाठी लीजवर देण्यात आली हाेती. ती सन १९७१ या वर्षी परत घेण्यात आली; परंतु गट क्रमांक ४२२/१ पैकी १ एकर ३० गुंठे जोशी यांना कब्जा हक्कावर शर्त २ कमी करून रहिवासासाठी शर्तीवर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केली. ही जमीन स्टोन क्रशरसाठी देण्यात आल्याचा सातबारा उताऱ्यावर नोंद आहे. शर्तीवर रहिवासासाठी मिळालेल्या जमिनीवर ओंकारदास बळीराम जोशी अॅण्ड सन्स यांनी एकूण १७ भूखंड पाडले. त्याची मिश्रिलाल जोशी, मुरलीधर जोशी, गजानन जोशी यांनी आपसात वाटणी केली. ही जमीन रहिवासासाठी दिल्याची नोंद मंजूर नाही.


फेरफार नोंद क्रमांक १७१४१ अद्याप मंजूर व्हावयाची आहे, असे असूनही प्लॉटस वाटणीची नोंद कशी मंजूर करण्यात आली, हे कोडेच आहे. तत्कालीन सर्कल इन्स्पेक्टर यांनी ७ एकर १९ गुंठे क्षेत्राचा ताबा घेऊनही १ एकर ३० गुंठे क्षेत्र जोशी यांच्या ताब्यात कसे राहिले? याचाच अर्थ कुठेतरी गैरव्यवहार झालेला आहे. मुळात स्टोन क्रशर खडी साठवणुकीसाठी शासकीय जागा का देण्यात आली?, लीजवर घेतलेल्या या शासकीय जागेत प्लॉट पाडून उघडपणे विक्री करून लाखो रुपयांची कमाई करण्यात आली आहे, असे साबळे यांनी तक्रारीत म्हटले आहे.


महसूल अधिकाऱ्यांचेही भ्रष्टाचारात संगनमत
गैरव्यवहाराची तत्कालीन मंडळ अधिकारी दुसाने यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशी करून कारवाईची मागणी केली होती. त्या तक्रारीकडे िजल्हाधिकारी कार्यालयाकडून हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले. भ्रष्ट अधिकाऱ्यांना संरक्षण दिले. हा भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी महसूल कर्मचाऱ्याने वाचा फोडली; परंतु या प्रकरणानंतर त्याला मुदतीपूर्वी सेवानिवृत्ती घ्यावी लागली. ही शासकीय जागा शहरातील बिल्डर्स आपसात संगनमत करून हडप करतात. महसूल प्रशासनातील अधिकारी त्यांच्याशी संगनमत करून या प्रकरणात हेतुपुरस्सर दुर्लक्ष करतात, असा आरोपही साबळे यांनी तक्रारीत केला आहे.

बातम्या आणखी आहेत...