आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

430 गुंडांच्या तडीपारीचे प्रस्ताव प्रांताकडे सादर: आजी-माजी नगरसेवकांचाही समावेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगरमहापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुमारे ४३० गुंडांच्या तडीपारीचे प्रस्ताव प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी १२० गुंडांना प्रांत कायार्यालयाने नोटिसा बजावल्या असून त्यांची शुक्रवारी सुनावणी घेण्यात येणार आहे. सर्वाधिक प्रस्ताव कोतवाली पोलिस ठाण्यातून सादर करण्यात आले आहेत. तडीपारीच्या यादीत काही आजी-माजी नगरसेवकांचाही समावेश आहे.


एकिकडे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची कार्यवाही सुरू झाली आहे, तर दुसरीकडे पोलिस प्रशासनाने तब्बल ४३० गुंडांच्या तडीपारीचे प्रस्ताव तयार करून ते प्रांताधिकाऱ्यांकडे सादर केले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काही अाजी-माजी नगरसेवकांनाही या कार्यवाहीला सामोरे जावे लागणार अाहे. त्यात केडगाव हत्याकांड, पोलिसांवर झालेली दगडफेक व पोलिस अधीक्षक कार्यालयावर झालेल्या दगडफेक प्रकरणातील आरोपींचे धाबे दणाणले आहे. याप्रकरणात सुमारे ९०० पेक्षा अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे सर्वजण राजकारणाशी संबंधित आहेत. त्यामुळे तडीपारीच्या यादीत नेमकी कुणाची नावे समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

कोतवाली पोलिसांनी दोनशेपक्षा अधिक गुंडांच्या विरोधात तडीपारीचे प्रस्ताव सादर केले असून त्यात दगडफेक प्रकरणातील काही आरोपींचाही समावेश अाहे. भिंगार कॅम्प पोलिसांनी ४१ गुंडांच्या विरुध्द तडीपारीचे प्रस्ताव दिले आहेत. परंतु त्यात पोलिस अधीक्षक कार्यालयात तोडफोड प्रकरणातील आरोपींचा समावेश नाही. भिंगार कॅम्प पोलिसांनी दिलेले हे प्रस्ताव दारू व जुगाराच्या गुन्ह्यातील गुंडाच्या विरोधात दिलेले आहेत. तोफखाना पोलिसांनी १७९, तर एमआयडीसी पोलिसांनी ८ प्रस्ताव दिले आहेत.


महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याची खबरदारी घेत पोलिसांनी हे तडीपारीचे प्रस्ताव पाठवलेले आहेत. राजकीय पक्षांच्या अनेक कार्यकत्यांना या तडीपारीला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे पोलिसांच्या या कार्यवाहीमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.


१२० गुंडांच्या नोटिसांवर आज होणार सुनावणी
पोलिसांनी तडीपारीचे प्रस्ताव सादर केल्यानंतर प्रांत कार्यालयाने संबंधित गुंडांना नोटिसा बजावण्याची कार्यवाही सुरू केली आहे. आतापर्यंत १२० गुंडांना प्रांत कार्यालयाने नोटिसा बजावल्या असून त्यांना शुक्रवारी सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. उर्वरित गुंडांचीदेखील दोन-तीन दिवसांत सुनावणी घेण्यात येणार असून त्यानंतरच त्यांच्या तडीपारीचा निर्णय होणार आहे

बातम्या आणखी आहेत...