आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रस्ताव द्या... ठरलं तेच करा, मुख्यमंत्रिपदावर भाजप ठाम; शिवसेनेकडे टाेलवला चेंडू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निकालाला १३ दिवस उलटून गेल्यानंतरही राज्यात सत्तास्थापनेची िचन्हे नाहीत. तरी मुंबईत विधिमंडळ परिसरात विशेष अधिवेशनासाठी शामियाने सजले आहेत. - Divya Marathi
निकालाला १३ दिवस उलटून गेल्यानंतरही राज्यात सत्तास्थापनेची िचन्हे नाहीत. तरी मुंबईत विधिमंडळ परिसरात विशेष अधिवेशनासाठी शामियाने सजले आहेत.

मुंबई/ नागपूर : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तेराव्या दिवशीही मंगळवारी सत्तास्थापनेचा पेच कायम हाेता. भाजप व शिवसेनेचे नेते एकमेकांवर कुरघाेडी करण्यातच व्यग्र हाेते. दाेघेही युतीने सत्ता स्थापन करण्यास तयार आहेत. मात्र, त्यांच्या चर्चेची गाडी अडली हाेती ती प्रस्तावावर. 'आम्ही शिवसेनेला प्रस्ताव पाठवला असून त्यांनीच प्रतिसाद दिलेला नाही. अजूनही भाजपचे दरवाजे शिवसेनेला चर्चेसाठी २४ तास खुले आहेत. आता शिवसेनेने प्रस्ताव पाठवावा,' असे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सत्तास्थापनेचा चेंडू टोलवला. तसेच मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस हेच राहतील, असा काेअर कमिटीने निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी ठासून सांगितले. शिवसेनेला सोबत घेऊनच सत्ता स्थापन करण्यास भाजप अनुकूल असल्याचे काेअर कमिटीच्या बैठकीत ठरल्याचे सूत्रांनी सांगितले.


दुसरीकडे, 'लाेकसभेच्या वेळी जे ठरले तेवढेच करा, हाच आमचा एक अाेळीचा प्रस्ताव आहे,' असे प्रत्त्युत्तर देत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत आपली आग्रही भूमिका कायम ठेवली. मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चेस भाजप तयार असेल तर त्यांनी लेखी द्यावे, अशी अटही त्यांनी घातली.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युतीधर्म पाळा; मुख्यमंत्र्यांना सरसंघचालकांचा सल्ला

शिवसेनेसोबत चर्चेसाठी आमचे दरवाजे २४ तास उघडे : भाजप
चंद्रकांत पाटील म्हणाले, शिवसेनेने अद्याप कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. चर्चेसाठी आमचे दरवाजे २४ तास उघडे आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी राज्यातील आणि केंद्रातील सर्व नेते असून त्यांच्यात नेतृत्वात लवकरच सरकार स्थापन होईल.


सुधीर मुनगंटीवार म्हणाले, भाजपने शिवसेनेला प्रस्ताव पाठवला आहे. मात्र, तो जाहीर करायचा नसल्याने त्याबाबत जास्त काही सांगता येणार नाही. आम्ही सेनेच्या प्रस्तावाची वाट पाहत आहोत. सरकार बनवण्यासाठी काही वेळ द्यावा लागतो. मात्र, कोणत्याही क्षणी तुम्हाला गोड बातमी येऊ शकते.

मध्यस्थीसाठी माेहन भागवत यांना भाजपकडून साकडे
नागपूर शिवसेनेसाेबतच्या सत्तासंघर्षात अाता संघानेच मध्यस्थी करावी, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसंघचालक माेहन भागवत यांना घातले. त्यावर 'हिंदुत्वाच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांनी युतीधर्म पाळत तडजाेड करावी', असा सल्ला डाॅ. भागवत यांनी दिल्याची माहिती अाहे. मंगळवारी रात्री संघ मुख्यालयात सुमारे दीड तास या दाेघांची बैठक झाली.

फाॅर्म्युला : कसे होईल सरकार स्थापन? भाजप सभागृहातले संख्याबळ कमी करण्याचा प्रयत्न करू शकेल
1 भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याने सत्तास्थापनेचा दावा करू शकतो. त्यांना १५ दिवसांत बहुमत सिद्ध करावे लागेल. तोपर्यंत शिवसेना सोबत आली तर सरकार तरेल. परंतु शिवसेनेने आडकाठी केली तर राष्ट्रवादी किंवा काँग्रेस वा काही आमदारांना गैरहजर राहण्यास सांगून बहुमतासाठीचे संख्याबळ कमी करेल आणि भाजप बहुमत सिद्ध करू शकते.


2 कर्नाटकमध्ये पुरेसे संख्याबळ नसताना आणि काँग्रेस जेडीएस बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याने भाजपने सत्तास्थापनेचा दावा केला होता. यानंतर सभागृहात आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर केला गेला होता.

शिवसेनेने 'एनडीए' सोडावी, आम्ही साथ देऊ : राष्ट्रवादी
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, भाजपला वगळून राज्यात सरकार स्थापन होऊ शकते. मात्र, त्यासाठी शिवसेनेने पुढाकार घ्यायला हवा. तसे झाल्यास राष्ट्रवादी पर्याय देण्यास तयार आहे. मात्र, त्यासाठी शिवसेनेला एनडीएतून बाहेर पडावे लागेल. दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील म्हणाले की, शिवसेनेचा प्रस्ताव आल्यास आम्ही त्या संदर्भात विचार करू.

युतीत जे ठरलंय ते लेखी द्या, त्यानंतरच चर्चा होईल : शिवसेना
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार या आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले, अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेप्रमाणे भाजपने जे ठरले आहे ते लेखी द्यावे, त्यानंतर चर्चेला सुरुवात होईल. भाजपने आता सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याचे ठरवले आहे. हेच जर अगोदर केले असते तर आता राज्यात सरकार सत्तेवर आले असते. आमच्याकडून प्रस्ताव येण्याची ते वाट पाहत आहेत, परंतु आधीच्या बैठकीत जे ठरले तोच आमचा प्रस्ताव आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल ही आमची आधीपासूनची भूमिका आहे, असेही ते म्हणाले.


3 सन २०१४ मध्येही राज्यात भाजपने आवाजी मतदानानेच विश्वासदर्शक ठराव मंजूर केला होता आणि नंतर शिवसेना सत्तेत सहभागी झाली होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते.

बातम्या आणखी आहेत...