आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ नामांतर सभांमध्ये लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकत भाजपविरोधात एल्गार...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिनानिमित्त आयोजित सभांमधून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकत भाजपविरोधात एल्गार पुकारण्यात आला. माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, जोगेंद्र कवाडे, आनंदराज आंबेडकर यांनी भाजप संविधान बदलून देशावर मनुवाद लादणार असल्याचा आरोप केला. लोकशाही वाचवण्यासाठी भाजपला सत्तेतून खाली खेचा. याकरिता दलित, मुस्लिम, ओबीसी समाजाने एकत्र यावे, असे आवाहन या नेत्यांनी केले. तर रामदास आठवलेंनी संविधान बदलणाऱ्यांना स्वस्थ बसू देणार नाही, असे वक्तव्य केले. 

 

संविधान बदलणाऱ्यांना स्वस्थ बसू देणार नाही : आठवले 
मागासवर्गीयांचे आरक्षण कायम राहील. त्याला धक्काही लागणार नाही. संविधानही कोणी बदलणार नाही. याची खात्री बाळगा. आणि कोणी असा प्रयत्न केला तर संविधान बदलणाऱ्यांना स्वस्थ बसू देणार नाही, असा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला. संविधान, आरक्षणाच्या रक्षणासाठीच मी मंत्रिमंडळात बसलो आहे. कार्यकर्त्यांनी माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन करताना मुस्लिम, मराठा समाजाला सोबत घेतल्यास एक दिवस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री रिपाइंचा असेल, असेही ते म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिनानिमित्त सोमवारी (१४ जानेवारी) आठवले यांंच्या उपस्थितीत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. खासदार चंद्रकांत खैरे, रिपाइंचे कार्याध्यक्ष बाबूराव कदम, युवक आघाडी प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. आठवले म्हणाले की, काळ बदलतो आहे. त्यामुळे आपल्याला पुढील काळात समाजातील छोट्या-मोठ्या घटकांना सोबत घ्यावे लागेल. विशेषत: मुस्लिम, मराठा समाजाला जोडावे लागेल. त्यांची शक्ती मिळाली तर एक दिवस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री रिपाइंचा असेल. सर्वजण एकत्र येणार असतील तर प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात काम करण्याची माझी तयारी आहे, या वक्तव्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. 

 

 


लोकशाही वाचवण्यासाठी भाजपचे दफन करा : प्रा. जोगेंद्र कवाडे 
देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. मोदी सरकारला बाजूला केल्याशिवाय बाबासाहेबांचे संविधान, लोकशाही, समता, बंधुता शाबूत राहणार नाही. त्यामुळे लोकशाही वाचवण्यासाठी भाजपचे दफन करा, असे खणखणीत आवाहन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजसमोर आयोजित सभेत कवाडे बोलत होते. या वेळी कोरेगाव भीमा ते मुंबई लाँग मार्चमध्ये सहभागी झालेल्या २०० जणांचा सत्कार करण्यात आला. भाजपकडे भीक मागत रामदास आठवले यांनी मंत्रिपद मिळवल्याची टीका जयदीप कवाडे यांनी केली. 


दलित, मुस्लिम, ओबीसी एकत्र आले तरच भाजपला पाडणे शक्य : हंडोरे 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली घटना बदलण्याची भाषा करणाऱ्या मनुवादी भाजपला खाली खेचायचे असेल तर दलित, मुस्लिम आणि ओबीसी समाजाने एकत्र यावे, असे आवाहन माजी सामाजिक व न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी केले. भीमशक्ती, सामाजिक संघटना व जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने आयोजित सभेत हंडोरे बोलत होते. ते म्हणाले, घटना बदलण्याची भाषा देशाच्या ऐक्यासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे आता सर्वांनी एकत्र आले पाहिजे. या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार, माजी आमदार कल्याण काळे, नामदेव पवार, दिनकर ओंकार उपस्थित होते. 


लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीला पाठिंबा : आनंदराज 
वंचितांचा आवाज लोकसभेत पोहोचवण्यासाठी रिपब्लिकन सेना ही वंचित आघाडीला पाठिंबा देईल. स्वतंत्र उमेदवार निवडणूक लढवणार नाही. माेदी सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान बदलण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता त्यांना बदलण्याची वेळ आली आहे, असे रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी सभेत बोलताना सांगितले. 
विद्यापीठ कमानीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात रिपब्लिकन सेनेची सभा झाली. या वेळी विजय वाकोडे, दादाराव राऊत, अरुण लहाने, शांता धुळे, काकासाहेब गायकवाड, अरुण लहाने, सचिन निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. आनंदराज म्हणाले, निवडणुका येताच सवर्णांना १० टक्के आरक्षण देण्याचे नाटक सरकारने सुरू केले आहे. मात्र ते कधीही यशस्वी होणार नाही. न्यायालये, नीती आयोग, सीबीआय अशा सर्व प्रमुख सरकारी संस्थांवर मनुवादी सरकार आपली माणसे बसवत आहे. यातून त्यांना संविधान बदलायचे आहे. मात्र हा प्रयत्न आम्ही हाणून पाडू. प्रकाश आंबेडकर अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढवतील, आम्ही त्यांना पाठिंबा देणार आहोत, असेही ते म्हणाले. 

 

बातम्या आणखी आहेत...