आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकत्व विधेयकाविरोधात आंदोलन करणार : आयपीएस अधिकारी अब्दुर रहमान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हे देशाच्या एकोप्याचा, शांतीचा भंग करणारे आहे. यामुळे अनेक दशकांपासून देशात गुण्यागोविंदाने राहणाऱ्या हिंदू-मुस्लिम समाजामध्ये दुही पसरणार असून या विधेयकाला सगळ्यांनी विरोध केला पाहिजे. या विधेयकाच्या विरोधात देशभरात होणाऱ्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे आयपीएस अधिकारी अब्दुर रहमान यांनी खास दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला बुधवारी संसदेत मंजुरी मिळाल्यानंतर त्याला विरोध करीत अब्दुर रहमान यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा दिला. १९९७ च्या बॅचचे अब्दुर रहमान सध्या मानवी हक्क आयोगाच्या महानिरीक्षकपदी काम करत होते. त्यांनी काही महिन्यांपूर्वी घरगुती कारणास्तव व्हीआरएस घेण्याची इच्छा दर्शवली होती. परंतु त्यांची ही मागणी केंद्र सरकारने मान्य केली नव्हती.

राजीनामा का दिला, असे विचारता अब्दुर रहमान म्हणाले, केंद्र सरकारने जे नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आणले आहे ते घटनेच्या विरोधात आहे. घटनेने देशात सर्व धर्मांच्या लोकांना समान वागणूक देण्यास सांगितले आहे. या मूळ भावनेच्या विरोधातील हे विधेयक मंजूर झाल्याने मला अत्यंत वाईट वाटले. घटनेच्या विरोधात कसा निर्णय घेतला जाऊ शकतो, असा प्रश्न माझ्या मनात आला आणि म्हणूनच मी राजीनामा दिला.

घटनेच्या विरोधात काय आहे, असे तुम्हाला वाटते, असे विचारता अब्दुर रहमान म्हणाले, घटनेने सगळ्यांना समान संधी दिली आहे. यात कोणाच्याही धर्माचा उल्लेख नाही. देशात राहणारे सर्व नागरिक हे घटनेने देशाचे नागरिक आहेत. परंतु त्यांच्या या मूलभूत अधिकाराचेच या विधेयकाने उल्लंघन केले आहे. धर्माच्या आधारावर कोणतेही सरकार कशा प्रकारे भेदभाव करू शकते ते समजत नाही. दुरुस्ती विधेयकात ज्या धर्मांचा उल्लेख केला आहे त्यात मुस्लिम धर्माचा उल्लेख करण्यात आला नाही. त्यावरून या सरकारच्या मनात काय आहे ते समजून येते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुस्लिमांना घाबरण्याचे कारण नाही. त्यांनाही नागरिकत्व दिले जात आहे, असे म्हटले आहे. त्याबाबत विचारता अब्दुर रहमान म्हणाले, बोलणे आणि कागदावर उतरवणे यात फरक आहे. जर असे होते तर त्यांनी दुरुस्ती विधेयकात मुस्लिम शब्दाचा उल्लेख का केला नाही, असा प्रश्नही त्यांनी केला.

जे कुणी आंदोलन करतील त्यात सहभागी होईन... जागृती करेन

देशात जो कोणी किंवा संस्था आंदोलन करतील मी त्यात सहभागी होणार आहे. याबाबत जनजागृती करणार आहे, असे सांगून रहमान म्हणाले, यामुळे महाराष्ट्रात सौहर्दाने राहणारे एकमेकांविरोधात उभे ठाकतील. देशात किंवा महाराष्ट्रात गुंतवणूक येणे बंद होईल. आर्थिक संकट निर्माण होईल, असेही त्यांनी नमूद केले.
 

बातम्या आणखी आहेत...