आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीव्हीसी 63 दिवसांपासून चौकशी करत होते, सुप्रीम कोर्ट म्हणाले-14 दिवसांतच पूर्ण करा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लाचखाेरीच्या आरोपात सक्तीच्या रजेवर पाठवलेले सीबीअाय संचालक आलोक वर्मांविरुद्ध तपास पूर्ण करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने सीव्हीसीला १४ दिवसांची मुदत दिली आहे. सीव्हीसी २४ आॅगस्ट म्हणजे ६३ दिवसांपासून तपास करत होती. आता सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती ए.के. पटनायक तपासावर देखरेख करतील. न्या. पटनायक हे टूजी स्पेक्ट्रम प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या २ सदस्यीय पीठात होते. सीबीआयचे अंतरिम संचालक एम. नागेश्वर राव यांना कोर्टाने धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाई केली आहे. २३ ऑक्टोबरला पद स्वीकारल्यापासून घेतलेल्या सर्व निर्णयांची माहिती त्यांना कोर्टाला द्यावी लागेल. अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि विशेष संचालक अस्थानांविरुद्ध तपास पथक बदलण्याच्या निर्णयाचाही त्यात समावेश आहे. पुढील सुनावणी १२ नोव्हेंबरला होणार आहे.


रजेवर पाठवण्याच्या निर्णयाला वर्मांनी कोर्टात आव्हान दिले होते. सरन्यायाधीश रंजन गोगोईंच्या अध्यक्षतेखालील पीठाने याचिकेवर सीव्हीसी व केंद्राला नोटीस बजावली. दुसरीकडे, कॉमन कॉजच्या याचिकेवर सरकार, सीबीआय, सीव्हीसी, वर्मा आणि अस्थानांकडून उत्तर मागवले. दरम्यान, एम.एल. शर्मा या वकिलाने सीबीआयकडे तक्रार देत रफाल कराराबद्दल गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.

 

सॉलिसिटर जनरल म्हणाले, १० दिवस पुरेसे नाहीत, सरन्यायाधीश उत्तरले - मग २४० तास घ्या

कोर्टात सकाळी ११:१५ ला सुनावणी सुरू झाली. वर्मांकडून ज्येष्ठ वकील फली एस. नरिमन यांनी युक्तिवाद केला. सीव्हीसीकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हजर झाले.

* फली एस. नरिमन : वर्मांना बेकायदेशीरपणे सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. 
* सरन्यायाधीश : सीव्हीसीने १० दिवसांत चौकशी पूर्ण करावी. प्राथमिक तपास पाहून तो पुढे कायम ठेवायचा की नाही, याच निर्णय घेऊ
* तुषार मेहता : १० दिवसांची मुदत पुरेशी नाही. अनेक दस्तऐवज तपासायचे आहेत. तपासासाठी पुरेसा वेळ मिळायला पाहिजे. 
* सरन्यायाधीश : हरकत नाही, तुम्हाला २४० तास देतो. ते वाढवण्याची इच्छा नाही. 
* तुषार मेहता : काही दिवसांनी दिवाळीच्या सुट्या लागतील. तपास मुदतीत पूर्ण हाेणार नाही. सीव्हीसीचा तपास कोर्टाच्या देखरेखीत केल्याने चुकीचा पायंडा पडेल. 
* सरन्यायाधीश : दिवाळी तर एकाच दिवशी असेल. तसेही सीव्हीसी आणि सीबीआयला दिवाळीची सुटी नसते. आणखी चार दिवस देतो. १४ दिवसांत तपास अहवाल द्यावा लागेल. 

 

वर्मांच्या २ पीएसओंची अज्ञात स्थळी बदली वर्मांच्या घराबाहेर आयबीच्या अधिकाऱ्यांना मारहाण केली होती. आयबी संचालकांनी एनएसए अजित डोभाल यांना तक्रार केली. यानंतर कारवाई करण्यात आली.

 

सीबीआय संचालक अालाेक वर्मांना रजेवर पाठवण्याच्या विरोधात काँग्रेसने ९ शहरांतील सीबीआयच्या कार्यालयांसमोर निदर्शने केली. राहुल गांधी यांनी प्रतीकात्मक अटक करवून घेतली. ते म्हणाले, ‘वर्मा रफाल कराराची चौकशी करणार होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३० हजार कोटी अनिल अंबानींच्या खिशात घातले. नीरव मोदी व मेहुल चौकसीप्रमाणे अनिल अंबानीही फरार होतील. चौकीदार चोर आहे.’

 

बातम्या आणखी आहेत...