Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | protest for dhangar arakshan in tuljapur

खबरदार, आरक्षण न दिल्यास सत्तेतून पायउतार करू, धनगर समाजाचा मुख्यमंत्री फडणवीस यांना इशारा

प्रतिनिधी | Update - Aug 17, 2018, 12:51 PM IST

सत्तेत राहायचे असेल तर धनगर समाजाला आरक्षण द्यावेच लागेल, अन्यथा सत्तेतून पायउतार करू,

 • protest for dhangar arakshan in tuljapur
  तुळजापूर - सत्तेत राहायचे असेल तर धनगर समाजाला आरक्षण द्यावेच लागेल, अन्यथा सत्तेतून पायउतार करू, असा सज्जड इशारा फडणीस यांना देऊन आता आरक्षण मिळविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार सुरेश कांबळे यांनी केला.

  धनगर आरक्षण अंमलबजावणी समितीच्या वतीने तुळजापूर ते चौंडी पदयात्रेचा गुरुवारी(दि.१६) तुळजाभवानी मातेच्या दरबारात जागरण गोंधळ घालून शुभारंभ करण्यात आला. यावेळी संयोजक सुरेश कांबळे, आमदार नारायण पाटील, माजी आमदार प्रकाश शेंडगे, जिल्हा परिषद सदस्या सक्षणा सलगर, डॉ. इंद्रजित भिसे, गणेश सोनटक्के, अॅड. खंडेराव चौरे, अर्जून सलगर, बालाजी बंडगर, महानंदा पैलवान, रेणुका शेंडगे, विजया सोनटक्के, निमीषा वाघमारे, सविता सोनटक्के, सुमन घोडके, अण्णा बंडगर, समर्थ पैलवान आदींची उपस्थिती होती.

  यावेळी बोलताना कांबळे म्हणाले, सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावर धनगर समाजाची दिशाभूल करण्यात येत असून, समाजाने कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, आरक्षण मिळाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. यावेळी अन्य मान्यवरांनीही भाषण करून शासनावर टीका केली. यावेळी उस्मानाबादसह अन्य जिल्ह्यातूनही धनगर बांधव मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज चाैकातून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. पदयात्रेसाेबत राजमाता अहिल्याबाई होळकर यांची मूर्ती असलेला भव्य रथ होता. पदयात्रेत तरुणांसह महिलांचीही संख्या मोठी होती.तहसीलदारांना धनगर समाजाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

  फडणवीस सरकारवर गुन्हा दाखल करा
  धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या फडणीस सरकारने धनगर समाजाचा विश्वासघात केल्याने फडणीस यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुरेश कांबळे यांनी केली.

  चौंडी येथे २८ ऑगस्टला होणारा पदयात्रेचा समारोप
  धनगर आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. याच मुद्द्यावर सरकारने सत्ता ताब्यात घेतली. मात्र, समाजाची दिशाभूल करण्यात आली असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. दरम्यान, तुळजापुरात सकाळपासूनच रिमझिम तसेच मध्यम पावसाच्या सरी बरसत आहेत. वातावरणात प्रचंड गारठा निर्माण झालेला असतानाही समाजबांधवांचा आरक्षणासाठी एल्गार सुरूच होता.पदयात्रेचा समारोप चौंडी येथे २८ ऑगस्ट रोजी होणार असून, दररोज धनगर समाजासोबतच मंेढ्याही असतील. आंदोलनाचे नेतृत्व भूमचे सुरेश कांबळे करीत आहेत. त्यांनी अनवाणी पायाने या पदयात्रेत सहभाग घेतला आहे.चौंडी येथे समारोपाच्या दिवशी धनगर समाजाचा महामेळावा होणार आहे.

  बसस्थानकासमोर रास्ता रोको
  महाद्वारसमोरील जागरण गोंधळ संपवून परत जाताना जुन्या बसस्थानकासमोर लातूर चौकात मेंढरं रस्त्यावर उभी करून अचानक महामार्गावर रास्ता रोको केल्याने वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही काळ रास्ता रोको करून मेंढरं महामार्गावरूनच पुढे नेण्यात आली. त्यामुळे वाहतूक संथगतीने सुरू होती.

  थेट महाद्वार परिसरात मेंढरं
  आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या दरबारात जागरण गोंधळ घालून फडणवीस सरकारला चलेजावचा इशारा दिला. यावेळी धनगर समाजबांधवांनी शेकडो मेंढरासह थेट तुळजाभवानीच्या महाद्वारापर्यंत धडक मारली. यावेळी पारंपरिक वाद्य ढोल, झांजसह पारंपरिक वेशभूषा घोंगड, कुऱ्हाड घेऊन बांधव आंदोलनात सहभागी झाले होते.

Trending