आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीएसओ कार्यालयात अधिकारी अनुपस्थित; कार्यकर्त्यांचा 'प्रहार'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- शेतकऱ्यांप्रमाणेच शेतमजुरांनाही स्वस्त धान्य दुकानातून धान्य पुरवावे, या मागणीसाठी मंगळवारी 'प्रहार'च्या कार्यकर्त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या (डीएसओ) कार्यालयाला घेराव घातला. परंतु त्यांची बाजू एकूण घेण्यासाठी जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने या कार्यकर्त्यांना संबंधितांच्या अनुपस्थितीवरच 'प्रहार' करावा लागला. 


या घटनेमुळे काही काळ या कार्यालयात तणाव निर्माण झाला होता. सिटी कोतवालीचे अधिकारी स्थानिक शाखेच्या पोलिसांनी हा गुंता सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रहारचे पदाधिकारी-कार्यकर्ते व त्यांच्यातही हुज्जत झाली. शेवटी एका लिपीकाने निवेदन स्वीकारण्याचे कार्य केले. कार्यकर्त्यांची याला मान्यता नव्हती. परंतु पोलिस अधिकारी, प्रहारच्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली. दरम्यान त्या लिपीकाने प्रभारी पुरवठा अधिकारी, बार्शीटाकळीचे तहसीलदार रवी काळेंशी दूरध्वनीवरून संबंधितांची चर्चाही घडवली. प्रहार जनशक्ती पक्षाच्या मते शेतकऱ्यांप्रमाणेच केशरी शिधापत्रिका धारक भूमिहीनांना प्राधान्य गटात समाविष्ट करुन रेशनचे धान्य पुरवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. परंतु यावर अंमल केला नाही. परिणामी पात्र नागरिक स्वस्त दरातील धान्याच्या पुरवठ्यापासून वंचित आहेत. या संदर्भात आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील प्रहार जनशक्ती पक्षाने निवेदने दिली. 


संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या पुढ्यातही हा मुद्दा उचलला. परंतु तरीही उपयोग न झाल्यामुळे आज त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडक दिली. प्रहारचे जिल्हाप्रमुख तुषार पुंडकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते येथे आले होते. परंतु कुणीही अधिकारी उपस्थित नसल्याने या विभागाचे प्रमुख निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडेंना भेटण्याचे ठरले . परंतु बैठकी निमित्त ते अमरावतीला गेल्याचे कळल्यानंतर कार्यकर्ते चिडले. पोलिसांनी हस्तक्षेप करुन प्रसंगी समेट केला. आंदोलनात युवक आघाडीचे जिल्हाप्रमुख योगेश पाटील, महानगरप्रमुख पिंटू वाकोडे, गोविंद गिरी, दत्ता बोर्डे, बॉबी पळसपगार, उमेश पाटील, केदार बकाल, विशाल मेश्राम, विठ्ठल वाघमारे, चरण इंगळे, अरविंद बळी, सुनील रामटेके, वैभव नेरकर, दीपक चिमणकर, गौरव देशमुख, प्रशांत गोतमारे आदी सहभागी झाले होते. 


नावे कमी करण्यासही केली जाते टाळाटाळ 
अकोट तालुक्याचे उदाहरण पुढे करुन प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी रेशनकार्डातून नावे कमी करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा मुद्दाही उजेडात आणला. त्यांच्यामते घरात जन्माला आलेल्या बाळाचे नाव नोंदवण्यास किंवा लग्नामुळे सासरी गेलेल्या मुलीचे नाव कमी करण्यासही मोठा विलंब केला जातो. वारंवार चकरा घातल्यानंतरही अधिकारी दाद देत नाहीत. शेवटी कंटाळून नागरिक या बाबींचा पिच्छा सोडून देतात. 


आता पुढे काय होणार ? 
आजच्या आंदोलनानंतरही प्रश्न न सोडवल्यास भविष्यात यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुंडकर यांनी तहसीलदार काळे यांच्याशी दूरध्वनीवरून केलेल्या चर्चेदरम्यान हा इशारा देण्यात आला. त्यांच्यामते आमदार बच्चू कडू यांनी या मुद्द्यावर सभागृहात बरेच रणकंदन माजवले आहे. त्यामुळे शासनाला बदलात्मक निर्णय घेणे भाग पडले. परंतु त्या निर्णयावर अंमल केला जात नसेल तर प्रहार जिल्हाभरात मोठे आंदोलन करेल. 


अपर जिल्हा धिकाऱ्यांनाही भेटले...
डीएसओ कार्यालयात जबाबदार अधिकारी न भेटल्याने आणि फोनवरील चर्चेने पुरेसे समाधान न झाल्याने आंदोलनकर्त्यांनी शेवटी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून अप्पर जिल्हाधिकारी एन. के. लोणकर यांचीही भेट घेतली. त्यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान 'प्रहार'च्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तुषार पुंडकर व योगेश पाटील यांनी या चर्चेत मुद्द्यांची मांडणी केली. 

बातम्या आणखी आहेत...