मुंबई / KBC मध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, राष्ट्रवादीच्या मोर्चानंतर सोनी टीव्हीने दिला लेखी माफीनामा

कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी नामोल्लेख केल्याच्या निषेधार्थ निदर्शने
 

प्रतिनिधी

Nov 08,2019 03:48:37 PM IST

मुंबई - सोनीवरील कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा नामोल्लेख एकेरी केल्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेसने सोनी टिव्हीचे कार्यालय गाठल्यानंतर सोनी टिव्हीच्या वतीने राष्ट्रवादीकडे लेखी माफीनामा देण्यात आला आहे.


आज दुपारी 12 वाजता मालाड येथील सोनी कार्यालयासमोर निदर्शने करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो कार्यकर्ते व पदाधिकारी जमा होताच सोनी टिव्हीच्या व्यवस्थापन विभागामार्फत आपला लेखी माफीनामा राष्ट्रवादीकडे दिला मात्र त्याअगोदर सोनी टिव्हीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

हेही वाचा : 'केबीसी 11'मध्ये शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख, चाहते संतापले, बिग बी आणि वाहिनीने जाहीर माफी मागावी


सोनीवरील कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख करण्यात आल्याने मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली होती. आज याचा निषेध म्हणून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल मातेले, राष्ट्रवादी मुंबई युवक अध्यक्ष अॅड. निलेश भोसले, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष अॅड. इंद्रपाल सिंग, उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष अजित रावराणे, कार्याध्यक्षा फेमिदा खान, मुंबई पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

X
COMMENT