आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजनतेला पारदर्शक, गतीमान सेवा देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याची स्थापना करण्यात आली आहे. या अंतर्गत कायदा व नियमांचा सखोल अभ्यास करून सर्वसामान्य नागरिकांना निश्चित केलेल्या वेळेत सेवा द्याव्यात असे आवाहन राज्य सेवा हक्क आयोगाचे उपसचिव सुनील जोशी यांनी बुधवारी (८ मार्च) ला केले. पारनेर तहसील कार्यालयात प्रमुख अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत जोशी बोलत होते. तहसीलदार शिवकुमार अवळकंठे, गट विकास अधिकारी किशोर माने, आयोगाचे पी. बी. घोडके उपस्थित होते. जोशी म्हणाले की, सर्वसामान्यांना ऑनलाईन पद्धतीने सेवा देण्याच्यादृष्टीने अनेक शासकीय विभागांना अधिसूचित करण्यात आले आहे. या सेवा देत असताना किरकोळ त्रुट्यांमुळे नागरिकांना सेवा मिळत नसल्याने नागरिक आयोगाकडे अपील करतात. सामान्य नागरिकांनी मागितलेल्या सेवा नाकारताना तांत्रिक व प्रशासकीय बाबींची पूर्तता होत नसेल तरच सेवा नाकाराव्यात.
किरकोळ त्रुटींची जागेवरच पूर्तता करुन अधिकाधिक नागरिकांना सेवा देण्याच्या सुचनाही जोशी यांनी यावेळी केल्या. नागरिकांना सेवा देत असताना अवाजवी कागदपत्रांची मागणी करण्यात येऊ नये. आवश्यक कागदपत्रांचीच मागणी करण्यात यावी. सेवा देत असताना नागरिकांची कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सुचना करत प्रथम व द्वितीय अपिलीय अधिकाऱ्यांनी नामंजूर अर्जांचा नियमित आढावा घ्यावा. प्राप्त अर्जांची नोंदवही ठेवावी. अर्जाच्या प्रलंबिततेच्या तपासणीसाठी दैनंदिन डॅशबोर्डची तपासणी करावी. नागरिकांनी सेवा मिळण्यासाठी ऑफलाईन अर्ज केले असतील तर ते ऑनलाईन करुन घेण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.
कार्यालयांना भेट
सामान्यांना सेवा देणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्राला जोशी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कामकाजाची पहाणी केली. या सेवा केंद्रातून नागरिकांना सेवा कशा पद्धतीने पुरवल्या जातात, सेवेपोटी योग्य शुल्क आकारण्यात येते काय याबाबत पहाणी करुन केंद्र चालकांच्या अडी-अडचणीही त्यांनी यावेळी समजुन घेतल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.