Home | Maharashtra | Vidarva | Akola | Provide subsidy of tur, soybeans etc : Tupkar

अाता तूर, हरभऱ्याचे चुकारे व सोयाबीनचे अनुदान द्या : तुपकर

प्रतिनिधी | Update - Aug 07, 2018, 12:21 PM IST

नाफेडमध्ये विकलेल्या तूर, हरभऱ्याचे चुकारे तातडीने दया, तसेच २०१६ मध्ये सोयाबीन उत्पादकांना प्रति क्विंटल घोषित केलेले

  • Provide subsidy of tur, soybeans etc : Tupkar

    बुलडाणा- नाफेडमध्ये विकलेल्या तूर, हरभऱ्याचे चुकारे तातडीने दया, तसेच २०१६ मध्ये सोयाबीन उत्पादकांना प्रति क्विंटल घोषित केलेले अनुदान अद्यापही २६ हजार शेतकऱ्यांना मिळाले नाही, ते अनुदान वंचित शेतकऱ्यांना ताबडतोब दया, तसेच कपाशीवर पडलेल्या बोंडअळी व सोयाबीनवर पडलेल्या उंटअळी आणि चक्रीभुंगा रोगावर शासनाने तातडीने उपाय योजना करावी, अशी मागणी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी निरुपमा डांगे यांचेकडे आज ६ ऑगस्ट रोजी केली. मागण्या १५ ऑगस्ट पर्यंत मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही रविकांत तुपकरांनी दिला.


    या भेटीत रविकांत तुपकरांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडतांना सांगितले की, मागील २०१६ मध्ये महाराष्ट्र सरकारने सोयाबीन या पिकाला बाजारभाव कमी मिळत असल्याने २०० रुपये प्रति क्विंटल अनुदानाची घोषणा केली होती. परंतु अंमलबजावणी करताना यामध्ये बुलडाणा जिल्हयातील जवळपास २६ हजार शेतकरी अजूनही वंचित राहिले आहेत. पावत्या चुकीच्या असल्याच्या कारणावरून शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. खरे तर, या प्रकरणी चुकीच्या पावत्या देणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे अपेक्षित होते, परंतु चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार शासनाकडून होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची पुनर्चौकशी करून वंचित शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे.


    सध्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. अनुदान मिळाल्यास शेतकऱ्यांना आधार होईल. दरम्यान शासनाने नाफेड अंतर्गत शेतकऱ्यांची तूर व हरभऱ्याची खरेदी केली. मात्र अद्याप शेतकऱ्यांना तूर व हरभऱ्याचे चुकारे मिळाले नाहीत. पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना तूर व हरभऱ्यांचा पैसा कामा येईल असे वाटत होते. मात्र एेन पेरणीच्या काळातही हे चुकारे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला. दुसरीकडे मागील वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. जिल्ह्यात बोगस बीटीचे मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्याने शेतकऱ्यांनी याच बीटीची लागवड केली आहे.


    परिणामी कपाशीचे पीक धोक्यात आले आहे. शिवाय सोयाबीनवर उंट अळी तसेच चक्रीभुंगा या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या रोगावर तातडीने शासनाने उपाय योजना करावी, अशी मागणीही त्यांनी केली. या चर्चेवेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वराडे उपस्थित होते. तसेच स्वाभिमानीचे राणा चंद्रशेखर चंदन, पवन देशमुख, एकनाथ पाटील थुट्टे, महेंद्र जाधव, दत्ता जेऊघाले, अमीन खासाब, गजानन पटोकार, आकाश माळोदे, योगेश तुपकर, हरिभाऊ उंबरहंडे, प्रदीप तुपकर, अनिल तुपकर, गजानन तुपकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Trending