आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएसआय, एएसआय, पोलिस 'एसीबी'च्या जाळ्यात; मागितली दहा हजारांची लाच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शहर कोतवाली पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक शैलेश सुरेश मस्के, त्याचा रायटर एएसआय राजेश धैर्यशील शेंडे यांनी गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदाराला दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांना सापळ्याची चाहूल लागताच त्यांनी तक्रारदाराची अंगझडती घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा कारवाईसाठी दिलेले व्हाईस रेकॉर्डरमधील मेमरी कार्ड काढून फेकले व तक्रारदारास मारहाण केली. या प्रकरणी एसीबीने मंगळवारी पीएसआयसह रायटर व त्यांना मदत करणाऱ्या शहर कोतवाली पोलिस ठाण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत. हे तिघेही आरोपी फरार झाले आहेत.


कारंजा येथील ऋषिकेश नावाच्या एका व्यक्तीला कारंजा बायपास येथे काही महिन्यापूर्वी एक मोबाइल सापडला. २००-३०० रुपये खर्च करून त्यांनी तो मोबाइल दुरुस्त केला व तो मोबाइल त्यांची पत्नी वापरू लागली. मात्र याच मोबाइल चोरीची तक्रार सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात असल्याने ट्रेसिंगमध्ये या मोबाइलचे लोकेशन कारंजा येथे ऋषिकेश यांच्या पत्नीच्या नावाने आले. त्यानुसार सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेश शेंडे (पीएसआय शैलेश मस्के याचा रायटर) याने ऋषिकेश यांना फोन केला व तुमच्याकडे असलेला मोबाइल चोरीचा आहे. म्हणून त्यांना सिटी कोतवाली ठाण्यात बोलावले. तेथे शेंडे याने पीएसआय शैलेश मस्केची ओळख करून दिली. या दोघांनी ऋषिकेश यांनी अकोला रेल्वे स्थानकावरून मोबाइल चोरला असे धाकदपटशा करून त्यांच्यावर दबाव निर्माण केला व कारवाई टाळायची असेल तर १० हजार रुपये द्यावे लागतील असे म्हटले व पुन्हा पैसे घेऊन येण्याचे सांगून पाठवून दिले. मात्र तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्याने १७ नोव्हेंबरला एसीबीकडे तक्रार केली. त्यावरून एसीबीने २२ नोव्हेंबरला पडताळणी सापळा रचला. या वेळी एसीबीने ऋषिकेश यांच्याकडे एक डिजिटल व्हाइस रेकॉर्डर दिले. 

 

ठरल्याप्रमाणे पंचाला घेऊन ऋषिकेश सिटी कोतवालीत गेले. तेथे पीएसआय मस्के, एएसआय शेंडे व ऋषिकेश तिघेही पोलिस ठाण्याजवळील चहाच्या कॅन्टीनवर गेले. तेथे चोरीची तक्रार दाखल न करण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी शेंडे याने केली. तडजोड सहा हजरावर आली. त्याला पीएसआय मस्के याने दुजोरा दिला.

 

तिघांत संभाषण सुरु असताना पीएसआय मस्केला संशय आल्याने त्याने ऋषिकेशच्या खिशातील मोबाइल व व्हाइस रेकॉर्डर हिसकले. तर शेंडे याने त्यांची कॉलर पकडून पोलिस ठाण्यात नेले. तेथे अंगझडती घेऊन नग्न केले व शिवीगाळ केली. इतक्यात एका पोलिसाने डिजिटल व्हाइस रेकॉर्डरमधील सॅन्डीक्स कंपनीचे आठ जीबी मेमरी कार्ड काढून घेतले व थोड्या वेळा दुसरे मेमरी कार्ड आणून त्यात टाकले. काही वेळानंतर तक्रारदारास सोडून दिले. तक्रारदार व पंच थेट एसीबी कार्यालयात गेल्यानंतर त्यांनी आपबीती सांगितली. त्यावरून मंगळवारी एसीबीने पीएसआय शैलेश सुरेश मस्के, एएएसआय राजेश धैर्यशील शेंडे व एका पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे कलम ७, ७ अ, ३९२,२०१, ३४२, ५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई एसीबीचे पोलिस उपअधीक्षक संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक ईश्वर चव्हाण, गजानन दामोदर व सुनील राऊत यांनी केली.पीएसआय शैलेश मस्के पीएसआय, एएसआय, पोलिस 'एसीबी'च्या जाळ्यात; मागितली दहा हजारांची लाच शहर कोतवाली पोलिस ठाणे, गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितले पैसे

 

तिसरा पोलिस कर्मचारी कोण?
पीएसआय मस्के व शेंडे यांच्या मदतीला धावून येणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यानेच डिजिटल व्हाइस रेकॉर्डरमधील मेमेरी कार्ड बदलवले व दोघांना मदत केली. त्यानंतर तक्रारदारास शिवीगाळ करून नग्न ठेवले. हा पोलिस कर्मचारी कोण, अशी चर्चा पोलिस वर्तुळात आहे. या कर्मचाऱ्याचा शोध घेऊन लवकरच एसीबी त्याला बेड्या ठोकणार असल्याची माहिती आहे. मंगळवारी संध्याकाळी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर अनेक पोलिस कर्मचारी पोलिस ठाण्यातून गायब झाले होते.


आयजीपी शहरात अन कारवाई
एकीकडे तक्रार निवारण केंद्राचे उदघाटन अमरावती परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे करीत असताना याच दरम्यान एका पीएसआयसह दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. या कारवाईमुळे पोलिसांची लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे

 

आरोपींना लवकरच अटक करू
आरोपींनी गंभीर गुन्हा केला आहे. त्यांनी डिजिटल व्हाइस रेकॉर्डरशी छेडछाड केली आहे. त्यांना अटक केल्यावर तो तिसरा पोलिस कोण हे समोर येणार आहे. - संजय गोर्ले, डीवायएसपी एसीबी
कारवाईसाठी पोहोचलेले आकस्मिक धाड, तपासणी पथकाचे सदस्य.

बातम्या आणखी आहेत...