Home | National | Other State | PUBG-Fortnite addiction, gaming patients tripled in two years

पबजी-फोर्टनाइटचे व्यसन, दोन वर्षांत गेमिंगचे रुग्ण तिप्पट वाढले

धर्मेंद्रसिंह भदौरिया | Update - Dec 09, 2018, 06:45 AM IST

देशातील आबालवृद्ध मोबाइल गेमिंगच्या जाळ्यात अडकले

 • PUBG-Fortnite addiction, gaming patients tripled in two years

  बंगळुरू- बंगळुरूच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस (निम्हांस) परिसरात शट क्लिनिकमध्ये तीन-चार मुले आई-वडिलांसह आली होती. डॉक्टरच्या केबिनमध्ये विशाल बसलेला होता. तुला किती मित्र आहेत, अशी विचारणा डॉक्टरांनी विशालला केली. त्याने विचारले-ऑनलाइन की ऑफलाइन? ऑनलाइन ५०० पेक्षा जास्त, तर ऑफलाइन दोन-तीन. विशालने सांगितले, “मी दिवसभरात १० ते १२ तास ‘पबजी’ हा खेळ खेळतो. माझे विदेशी ‘मित्र’ रात्रीच खेळतात, त्यामुळे मीही बहुतेकदा रात्रीच खेळतो.” विशालप्रमाणेच पबजी (प्लेअर-अननोन्स बॅटलग्राउंड्स) आणि फोर्टनाइट यांसारख्या व्हिडिओ गेम्सच्या व्यसनाचे बळी वेगाने वाढत आहेत. ‘दिव्य मराठी’ने देशातील शाळांत केलेल्या सर्वेक्षणांत, ‘६८% मुले कुठला ना कुठला गेम खेळत आहेत. देशात २२ कोटींपेक्षा जास्त गेमर्स आहेत,’ असे समोर आले आहे.

  समस्या एवढी गंभीर झाली आहे की, मुले ४ ते १४ तास मोबाइल गेम्समध्ये घालवतात. शट क्लिनिकचे प्रा. डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी सांगितले की, बहुतांश प्रकरणांत आपण आजारी आहोत हे मुलांना मान्यच नाही, हेच सर्वात मोठे आव्हान आहे. या आजाराशी संबंधित रुग्ण २०१३ पासून सतत भेटतात २०१६ पासून इंटरनेट स्वस्त झाल्यानंतर अशा रुग्णांची संख्या तिप्पट वाढली आहे. सध्या सर्वाधिक केसेस पबजीच्याच येत आहेत. १२ ते २३ वर्षे वयापर्यंतचे युवक माझ्याकडे येत आहेत. दर आठवड्याला तीन ते चार नवे रुग्ण आमच्याकडे येतात.

  औषधांव्यतिरिक्त अशा मुलांच्या उपचारासाठी ८ ते २५ समुपदेशन सत्रे घ्यावी लागत आहेत. क्लिनिकच्या वरिष्ठ रिसर्च फेलो अश्विनी तडपत्रीकर यांनी सांगितले की, मुलांच्या शारीरिक हालचाली बंद झाल्याचीही प्रकरणे आमच्याकडे आली आहेत. फक्त सामाजिक जीवनच संपत आहे असे नाही तर ही मुले अंघोळही करत नाहीत, जेवतही नाहीत. रात्र-रात्रभर झोपतही नाहीत. दिवसा झोपतात, शाळेत जात नाहीत-शाळेत गेले तरी तेथे डुलक्या घेतात. एखादा मित्र आला की त्याच्यासोबत पबजी खेळतात.

  तडपत्रीकर म्हणाल्या की, आमच्याकडे सर्वाधिक प्रकरणे न्यूक्लिअर फॅमिलीची किंवा ज्यांचे आई-वडील दोघेही नोकरी करत आहेत अशा कुटुंबांची येतात. एकच मूल असलेल्या कुटुंबांचीही प्रकरणे आहेत. सुरुवातीला पालक मुलांना तंत्रज्ञान शिकवतात आणि एक्सपोझरच्या नावावर नंतर मुले मोबाइलचा जास्त वापर करायला लागतात. गेमिंगच्या सुरुवातीला मौज, करमणूक, जिंकण्यासाठी आणि टाइमपाससाठी किशोरवयीन मुले हा खेळ खेळतात. आम्ही प्रेरक वर्ग, रोगनिवारणाची उपचार पद्धती आणि पेरेंटल एज्युकेशन देतो. जीवनशैलीत बदल करण्यासाठी प्रोत्साहित करतो. आम्ही अचानक गेम सोडवत नाही; अन्यथा मूल चिडखोर आणि कधी कधी आक्रमकही होते. आम्ही दिवसा किंवा संध्याकाळी यापैकी एकाच वेळी मर्यादित काळात तो खेळ, अशा मुलांनी जास्त काळ एकटे राहू देऊ नये, कुटुंबासोबत जास्तीत जास्त काळ राहावे,असे सांगतो. गेम्सव्यतिरिक्त ही सवय व्हॉट्सअॅप, फेसबुक यांसारख्या समाजमाध्यमांवर जास्त काळ व्यतीत करणे, पोर्न साइट पाहणे, नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, हॉटस्टारवर विविध मालिका कार्यक्रम पाहणे या कारणांमुळेही लागते असे आढळले आहे. प्रौढांमध्ये या कारणांबरोबरच महिलांमध्ये ऑनलाइन शॉपिंग करणे आणि समाजमाध्यमांवर वेळ घालवणे तसेच पुरुषांमध्ये गॅम्बलिंग आणि ट्रेडिंग करण्याची प्रकरणेही आली आहेत.

  विशेष म्हणजे तंत्रज्ञान आसक्ती (टेक अॅडिक्ट) प्रतिबंधकाचे देशातील पहिले आणि सर्वात मोठे केंद्र निम्हांसमध्येच चालते. तेथे या आजाराने ग्रस्त असलेली मुले देशभरातून येतात. कानपूर, दिल्ली, पंजाब, पाटणा, ओडिशा, बंगळुरू, कर्नाटक या भागांतून मुले येतात. मुले पबजीव्यतिरिक्त डोटा-१, डोटा-२, फोर्टनाइट, काउंटर स्ट्राइक, वर्ल्ड ऑफ वॉर-क्राफ्ट यांसारख्या खेळात अडकत आहेत. आता हा आजार लहान शहरे आणि खेड्यांतील मध्यमवर्गीय कुटुंबापर्यंत पोहोचला आहे.

  रात्रभर गेम खेळायचा, शाळेने काढून टाकले
  हैदराबादचा तेजस १२ वीत शिकतो. गेमची एवढी सवय लागली की १० वीत कमी गुण मिळाले. ११ वीच्या सुरुवातीला गेमची सवय वाढली. तो रात्र-रात्रभर ८-१० तासांपर्यंत पबजी आणि फोर्टनाइट खेळायचा. अभ्यास चांगला नसल्याने शाळेने काढून टाकले. कुटुंबीयांनी गेम खेळण्यापासून रोखले तर तो तोडफोड करायला लागला. वजनही वाढले. सुमारे २५ सत्रांच्या समुपदेशनानंतर तेजस आता सामान्य आहे. त्याला प्रोफेशनल गेमर व्हायचे आहे, त्यामुळे आता दोन-अडीच तासच गेम खेळतो.

  भारतात २२ कोटी गेमर्स
  ‘न्युजू’ या गेमिंग अॅनालिटिक्स फर्मनुसार, आज जगभरात गेमिंग इंडस्ट्रीची कमाई १३८ अब्ज डॉलरपेक्षा (सुमारे ९७०० कोटी रुपये) जास्त झाली आहे. त्यात जवळपास ५१ टक्के भागीदारी मोबाइल क्षेत्राची आहे. दुसरीकडे, गेमिंग रिव्हेन्यूच्या प्रकरणांत भारत अव्वल २० देशांत येतो. २०२१ पर्यंत गेमिंग मार्केटची कमाई १०० अब्ज डॉलरपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. सध्या जगभरात २.३ अब्ज गेमर्स आहेत. त्यापैकी २२ कोटी गेमर्स भारतातील आहेत.

  डब्ल्यूएचओने संबोधले आजार
  जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) याच वर्षी खेळ खेळण्याच्या या सवयीला मानसिक रोगाच्या श्रेणीत समाविष्ट केले आहे. तिला गेमिंग डिसऑर्डर असे नाव दिले आहे. शट क्लिनिकनुसार, तंत्रज्ञान आसक्ती असणाऱ्यांपैकी ६० टक्के लोक गेम्स खेळतात. २० टक्के पोर्न साइट पाहणारे असतात. इतर २० टक्के समाजमाध्यमे, व्हॉट्सअॅप यांचे रुग्ण असतात.

  अशी आहेत या रोगाची लक्षणे :
  प्रा. शर्मा म्हणाले की, स्वत:चे स्वत:वरील नियंत्रण संपत आहे, गेम खेळत राहिले की खेळतच राहतात. जणूकाही आयुष्यात हे एकच काम उरले आहे. काय नुकसान होणार हे माहीत असूनही तुम्ही खेळतच राहता. सहा महिने ते एक वर्ष या काळात तुम्हाला तुमच्या मुलांत अशी लक्षणे दिसली तर टेक्नॉलॉजी अॅडिक्शन आहे, असे समजावे.

  पालकांनी कमी वेळ दिल्याने लागली सवय

  सौैरभ आणि सुमन दोघेही आयटी कंपनीत काम करतात. ४ वर्षांपूर्वी पाचवीत शिकत असलेला मुलगा रवी याला मोबाइल दिला. १५ वर्षांच्या रवीला लवकर एक्सपोझर मिळाले. तो ८-९ तास पबजी खेळू लागला. शाळेला नियमित दांडी मारायचा. आई-वडील ऑफिससमधून घरी यायचे तेव्हा तेही इंटरनेटवरच असायचे. रवी पहिल्यांदा क्लिनिकमध्ये आला तेव्हा म्हणाला की, माझ्यापेक्षा उपचारांची जास्त गरज तर आई-वडिलांनाच आहे. ते जास्त वेळ इंटरनेट पाहतात. आता रवी बास्केटबॉल खेळतो.

  गेम एवढा खेळला की १० वीत झाला नापास
  लखनऊचा सौरभ १२ वीत आहे. वडील व्यावसायिक, तर आई दुसऱ्या शहरात नोकरी करते. आठवीतच सौरभने गेम खेळणे सुरू केले. नववीपर्यंत गेमची सवय लागली. त्यामुळे घरात भांडणे वाढली. १० वीत गणिताचा पेपर सुटला. पुन्हा परीक्षा दिली. त्यामुळे त्याचे मनोबल कमी झाले. शाळा बदलली, मित्र बदलले. पण तो जास्त खेळायचा. पालक क्लिनिकमध्ये आले. त्यांनी सौरभला पुनर्वसन केंद्रात ठेवले. तोही पालकांसोबत बॅडमिंटन-बुद्धिबळ खेळला. आता सौरभ ठीक आहे.

  नॉलेज :

  अशी होते गेम्समधून कमाई, पबजीची रोजची कमाई १२ कोटी रु. पबजीचे उत्पन्न २.७ पट वाढले आहे. त्याची रोजची कमाई १२ कोटी रु. पर्यंत आहे. आतापर्यंत ते २० कोटी वेळा डाऊनलोड केले असून तीन कोटी अॅक्टिव्ह युजर्स आहेत. पबजी आणि फोर्टनाइट गेम्स इन-अॅप पर्चेसच्या माध्यमातून पैसा कमावतात. म्हणजे या गेमच्या आतच काही टूल खरेदी करण्यासाठी ऑफर दिली जाते. पबजीत गेमच्या कॅरेक्टरसाठी कॉस्मेटिक आणि ड्रेस खरेदीचा पर्याय आहे. अशाच प्रकारे इलाइट रॉयल पास लाँच केला. त्यामुळे गेम अपग्रेड होतो, नवे चॅलेंज जोडले जातात. पण त्यासाठी पैसे द्यावे लागतात. इतर उत्पादनांच्या ब्रँडिंगद्वारेही पैसे कमावले. उदा. ‘मिशन इम्पाॅसिबल’च्या प्रमोशनसाठी गेमने संकल्पना बदलली होती.

  असे खेळतात पबजी :

  पबजी हा बॅटल गेम आहे, त्यात सुमारे १०० खेळाडू एकत्र खेळू शकतात. शेवटी जो खेळाडू जिवंत राहतो तो विजेता असतो. त्यात खेळाडू परस्परांत ऑनलाइन बोलूही शकतात.

Trending