आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत उद्रेक...दारुमुळे तरुणाचा बळी, अंत्ययात्रेहून परत येताच नागरिकांचा संताप अनावर, फोडले देशी दारूचे दुकान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद  - विजयनगरातील एका तरुणाचा अति मद्यसेवनामुळे सोमवारी मृत्यू झाला. त्याच्या अंत्ययात्रेहून परत येताच विजयनगरातील संतप्त जमावाने देशी दारूचे फोडले. ऐन बाजारपेठेत असलेले हे दुकान बंद करण्यासाठी विजयनगरातील रहिवासी गेली सतत  २२ वर्षे  प्रशासनाकडे पाठपुरावा करीत होते. मात्र दुकान बंद झाले नव्हते. त्यामुळे सोमवारी अखेर नागरिकांचा उद्रेक झाला. तरुणाच्या अंत्ययात्रेहून परत येताच संतप्त जमावाने दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास वादग्रस्त  देशी दारूच्या दुकानावर हल्लाबोल केला. या वेळी संतप्त नागरिकांनी दुकानातील देशी दारूच्या बॉक्सची तोडफोड केली. तसेच रस्त्यावर बाटल्या फोडून बॉक्ससह पेटवले.  


घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा विजयनगरात दाखल झाला. पोलिसांनी जमावाची समजूत काढल्यानंतर वातावरण शांत झाले. राग अनावर झालेल्या कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे विजयनगरात सायंकाळपर्यंत तणावपूर्ण शांतता होती. यानंतर दारूचे दुकान बंद करण्यासाठी नव्याने नागरिकांनी सहायक पोलिस आयुक्त रामचंद्र गायकवाड यांच्याकडे निवेदन दिले.  


विजयनगर परिसरातील विजय चौकात मीनाबाई के. जैस्वाल  देशी दारूचे दुकान आहे. या देशी दारूच्या दुकानामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रहिवासी श्याम विश्वनाथ फाजगे ( ३९ ) या तरुणाची अडीअडचणीला धावून जाणारा सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख होती. परंतु या देशी दारूच्या दुकानामुळे श्यामही व्यसनाधीन झाला. रविवारी रात्री अति मद्यसेवनामुळे त्याची प्रकृती खालावल्याने त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दारू दुकानामुळे आधीच त्रस्त असलेल्या परिसरातील नागरिकांचा त्यामुळे आणखीच संताप झाला होता. शेकडो शोकाकुल नागरिकांनी काबरानगर स्मशानभूमीत त्याच्या अंत्यविधीला हजेरी लावली. परंतु अंत्यविधीहून परत येताना त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. श्यामच्या मृत्यूस हे दुकानच कारणीभूत असल्याच्या भावनेतून अंत्यविधीहून परतणारा जमाव देशी दारूच्या दुकानावर चालून गेला. त्या वेळी दुकान बंद होते. संतप्त जमावाने कुलूप तोडून दुकानाची तोडफोड सुरू केली. दुकानातील दारूचे बॉक्स रस्त्यावर टाकून त्यातील बाटल्या फोडल्या. फोडलेल्या बाटल्या पेटवून देण्यात आल्या.

 

दरम्यान, दारूच्या दुकानावर संतप्त नागरिकांनी हल्लाबोल केल्याची माहिती मिळाल्यानंतर पुंडलिकनगर ठाण्याचे निरीक्षक लक्ष्मीनारायण शिनगारे कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. जमावाला पांगवून पोलिसांनी परिसरात शांतता राखण्याचे आवाहन केले. या वेळी अति शीघ्र कृती दलासही पाचारण करण्यात आले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत या परिसरात तणावपूर्ण शांतता होती. सहायक पोलिस आयुक्त रामचंद्र गायकवाड आणि पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि नागरिकांचे निवेदन स्वीकारले. या वेळी भाजपचे शहर सचिव प्रा. गोविंद केंद्रे, शहर काँग्रेसच्या महिला शाखेच्या अध्यक्षा सरोज मसलगे पाटील, सचिव मीराबाई प्रधान, जगदीश कापसे, सुनील त्रिभुवन, श्रीकांत तौर, राहुल चव्हाण यांनी पोलिसांना निवेदन दिले. 

 

बातम्या आणखी आहेत...