सरकारी वकीलाने न्यायालयाच्या / सरकारी वकीलाने न्यायालयाच्या व्हरांड्यातच केली न्यायाधीशाला मारहाण, विरोधात निकाल दिल्याच्या कारणावरून हल्ला

Dec 26,2018 06:36:00 PM IST
नागपूर- उपराजधानी नागपुरातील जिल्हा न्यायालयापुढे वकीलांमधील खूनी संघर्षाचे प्रकरण ताजेच असताना न्यायालयाच्या व्हरांड्यातच वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश के. आर. देशपांडे यांना सरकारी वकीलाने मारहाण केल्याची खळबळजनक घटना बुधवारी दुपारी घडली. या घटनेनंतर पोलिसांनी वकीलास ताब्यात घेऊन अटक केली. व्यक्तीगत दिवाणी प्रकरणात आपल्या विरोधात निवाडा दिल्याच्या कारणावरून वकीलाने हा हल्ला केल्याचे उघड झाले आहे.

दुपारी बारा वाजताच्या सुमारास न्यायमंदिरच्या सातव्या माळ्यावर ही घटना घडली.

दिवाणी न्यायाधीश किरण रंगराव देशपांडे हे काही प्रशासकीय कामासाठी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. पी. इंगळे यांच्या कक्षात आले होते. कक्षातून बाहेर पडल्यावर ते त्यांचे सहकारी न्या. एस.व्ही. देशमुख यांच्यासह न्यायालयातील लिफ्टजवळ प्रतीक्षेत उभे होते. त्याचवेळी अतिरिक्त सरकारी वकील अॅड दिपेश मदनलाल पराते (वय ४२) तेथे आला. त्याने संतापाच्या भरात न्या. देशपांडे यांना ठार मारण्याची धमकी देत थापड मारली. त्यामुळे न्या. देशपांडे यांचा चष्मा खाली पडला. त्यांना भोवळ आली. न्या. देशपांडे यांना पुन्हा धमकी देत अॅड. पराते तेथून सहा माळ्याच्या दिशेने पळाला. न्या. देशपांडे यांनी आरडाओरड केल्यावर तेथील पोलिस यंत्रणा सतर्क झाली. पोलिसांनी अड. पराते याच्या दिशेने धाव घेऊन त्याला पकडले. त्याला सुरुवातीला न्या. व्ही. बी. कुळकर्णी यांच्या लघुलेखकाच्या कक्षात आणले गेले. तर या घटनेत किरकोळ जखमी झालेले न्या. देशपांडे यांना न्या. कुळकर्णी यांच्या कक्षात बसविण्यात आले. ही घटना घडली त्यावेळी न्यायालयाच्या व्हरांड्यात पक्षकार आणि वकीलांची वर्दळ होती. घटनेची माहिती न्यायालय परिसरात पसरताच वकील व न्यायालयात आलेल्या लोकांनी सहाव्या माळ्यावर एकच गर्दी केली होती. या घटनेची माहिती सदर पोलिस ठाण्याला देण्यात आल्यावर पोलिसांनी अॅड. दिपेश पराते याला ताब्यात घेतले.

न्या. देशपांडे यांना वैद्यकीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात नेण्यात आले होते. दरम्यान, अॅड. दिपेश पराते याला पोलिस पुन्हा न्यायालयात हजर करीत असताना त्याने आपल्याला या प्रकरणात फसविण्यात आल्याचा कांगावा केला. आपण कोणालाही मारहाण केली नाही, असा दावा करतानाही तो दिसला. दरम्यान, सदर पोलिसांनी अॅड. परातेविरुद्ध भादंविच्या ३५३, ३३२ आणि ५०६ कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

निकाल विरोधात गेल्यामुळे मारहाण
पोलिस सूत्रांनी सांगितले की, अॅड. दिपेश पराते यांचे वडील अॅड. मदनलाल पराते यांनी न्या. देशपांडे यांच्या न्यायालयात पार्टीशन सुट दाखल केली होती. २८ नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयाने सदर प्रकरण कालमर्यादित केले. त्यामुळे दोन्ही बाजू ऐकून न्या. देशपांडे यांनी प्रकरण निकाली काढले. निकाल विरोधात गेल्यामुळे संतापातून अॅड. पराते याने आपल्यावर हल्ला केला, असे न्या देशपांडे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

X