आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सार्वजनिक शौचालयाचा सेफ्टी टँक ३ महिन्यांपासून तुंबला; वापर थांबल्याने पालिकेवर 'टमरेल मोर्चा'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ  - शहरातील प्रभाग क्रमांक २२ मधील कृष्णानगर भागातील महिलांसाठी असलेल्या सार्वजनिक शौचालयाचेे सेफ्टी टँक तीन महिन्यांपासून तुंबले आहे. प्रचंड अस्वच्छतेमुळे या शौचालयाचा वापर होत नाही. नगरसेवकांना सांगूनही उपयोग होत नसल्याने संतप्त महिलांनी सोमवारी नगरपालिका कार्यालयावर टमरेल मोर्चा काढला. उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे यांना घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती केली. या प्रश्नी त्वरीत तोडगा काढण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर महिलांनी आंदोलन थांबवले. 

 

पालिकेने गेल्या विशेष सभेत शहराला ओडीफ्री प्लस मानांकन देण्याबाबत ठराव केला. मात्र, यानंतर अस्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रभाग २२ मधील कृष्णानगर भागातील महिला सिंधी कॉलनीतील राज टेंट हाऊसच्या मागील भागात असलेल्या सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात. मात्र, या शौचालयाच्या सेफ्टी टँक गेल्या तीन महिन्यांपासून चोकअप झाल्या आहेत. यामुळे हे सार्वजनिक शौचालय वापरात नाही. उघड्यावर शौचालयासाठी देखील जागा नाही. यामुळे महिलांची कुचंबणा होत आहे. या प्रकरणी महिलांनी तीन महिन्यांपूर्वी या भागाचे नगरसेवक किरण कोलते यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले होते. कोलते यांनी पालिकेत तब्बल आठ ते दहा वेळा हे शौचालय व्हॅक्युमच्या सहाय्याने स्वच्छ करुन वापर सुरु करावा, अशी मागणी केली.

 

मात्र सत्ताधारी भाजपच्या गटातील कोलतेंच्या मागणीकडे दुर्लक्ष झाले. ही समस्या पुन्हा वाढतच गेल्याने संतप्त महिलांनी सोमवारी कृष्णानगर भागातून हातात टमरेल घेऊन पालिकेवर मोर्चा काढला. पालिका आवारात येताच ठिय्या आंदोलन केले. उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे यांना घेराव घालून महिलांनी समस्या मांडल्या. प्रभाग २२ मधील सार्वजनिक शौचालय व अन्य समस्या तत्काळ मार्गी लावल्या जातील, असे आश्वासन मकासरे यांनी दिल्यानंतर मोर्चेकरी महिला घरी परतल्या. दरम्यान, शहरात सत्ताधारी भाजप नगरसेवकांच्या वॉर्डातून पालिकेवर मोर्चे धडकत अाहेत. त्यामुळे हागणदारीमुक्त शहराचा फुगा फुटण्यास सुरुवात झाल्याची कुजबूज होती. 

 

किरण कोलतेंचा दहावेळा पाठपुरावा, प्रश्न जैसे थे 
कृष्णानगर भागातील सार्वजनिक शौचालय चोकअप झाले आहे. टाक्या भरल्या आहेत. मैला

काढला जात नाही, तोपर्यंत प्रश्न सुटणार नाही. तीन महिन्यांपासून नगरपालिकेत माहिती दिली आहे. पालिकेच्या व्हॅक्युमवर चालक नव्हता. पाठपुरावा करुन हा चालकही उपलब्ध केला. आठ ते दहावेळा बोलूनही कर्मचाऱ्याने व्हॅक्युमव्दारे शौचालयाच्या टाक्यांची स्वच्छता केली नाही. कर्मचारी हलगर्जीपणाने वागतात. वारंवार सांगून कामे ऐकत नाहीत, आरोग्य विभागाचे लक्ष नाही. कर्मचारी ऐकत नसतील तर आता कायदा हातात घ्यावा लागेल. नागरिकांची व नगरसेवकांचीही दिशाभूल करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय करणार नाही, असा इशारा सत्ताधारी भाजपचे नगरसेवक किरण कोलते यांनी दिला. 

 

नगरसेवक ऐकत नाहीत 
प्रभाग २२ मधील कृष्णानगर भागातील नगरसेवक आमचे म्हणणे ऐकत नाहीत. शौचालय बंद असल्याने महिलांची गैरसोय होते. नगरसेवक वारंवार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. साफसफाई वेळेत होत नाही, यामुळे वॉर्डात दुर्गंधी पसरली आहे. पालिकेने त्वरीत स्वच्छता करावी, अशी अपेक्षा मोर्चातील महिला व पुरुषांनी व्यक्त केली. पालिकेकडून शौचालय स्वच्छता करुन महिलांची कुचंबणा थांबवावी, अशी विनंती देखील महिलांनी उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे यांच्याकडे केली. 

 

समस्या त्वरित सोडवू 
शहरातील सर्व सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती मध्यंतरी पूर्ण केली आहे. कृष्णा नगरपरिसरातील शौचालयाच्या प्रश्नाची माहिती घेऊन तत्काळ कारवाई केली जाईल. व्हॅक्युमद्वारे शौचालय स्वच्छ केले जात नसतील तर कामचुकार कर्मचाऱ्यांवर प्रशासनातर्फे कारवाई देखील होईल. यासंदर्भात संपूर्ण आढावा घेऊन हा प्रश्न कसा सुटेल? यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. -रमण भोळे, नगराध्यक्ष 

बातम्या आणखी आहेत...