साहित्य संमेलन / मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे थाटात प्रकाशन

साहित्य संमेलनाला प्रशासनाचे  सहकार्य : जिल्हाधिकारी मुधोळ

Nov 08,2019 08:38:05 AM IST

उस्मानाबाद - उस्मानाबादेत होत असलेल्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी प्रशासन सर्व सहकार्य करेल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिली. सर्वांच्या प्रयत्नातून हे संमेलन ऐतिहासिक होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, उस्मानाबादेत १०, ११ व १२ जानेवारी (२०२०) रोजी होत असलेल्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन गुरुवारी (दि.७) सकाळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले यांची प्रमुख उपस्थिती होती.


जिल्हाधिकारी मुधोळ-मुंढे म्हणाल्या, उस्मानाबादेत होणारे संमेलन हे सर्वार्थाने वेगळे ठरणार आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पाहण्याची संधी साहित्यिक, साहित्यप्रेमींना लाभणार आहे. त्यासाठी आवश्यक ते नियोजन संयोजक समितीने करावे. आवश्यक तेथे प्रशासनाचे सक्रिय योगदान राहील, असेही त्या म्हणाल्या.


पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन म्हणाले, साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हातून ऐतिहासिक संदेश दिला असून ते संस्मरणीय ठरणार आहे.

बोधचिन्ह निर्मितीबद्दल विजयकुमार यादव यांचा सन्मान

संमेलनाच्या बोधचिन्हामध्ये संत गोरा कुंभार यांच्या हाती चिपळ्या घेऊन भक्तिरसात तल्लीन झालेली प्रतिमा साकारण्यात आली आहे. तसेच त्यांच्या साहित्य प्रतिभेची आठवण करून देणाऱ्या ‘म्हणे गोरा कुंभार जीवनमुक्त होणे जग हे करणे शहाणे बापा’ ह्या ओळी लक्ष वेधून घेतात. शहरातील विजयकुमार यादव यांनी तयार केलेल्या बोधचिन्हाची निवड आयोजक समितीने केली आहे.

X