आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला हत्याकांड: युवकाचा खून करून पुजाऱ्याने मंदिरातच गाडला मृतदेह; २९ दिवसांनी काढला बाहेर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- युवकाच्या वाढदिवसाला मंदिराच्या पुजाऱ्याने देशी कट्टा भेट दिला होता. काही दिवसांनी पुजारी देशी कट्टा परत मागू लागला. देशी कट्टा परत देण्यावरून दोघांमध्ये ९ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास वाद झाला. रागाच्या भरात पुजाऱ्याने युवकाच्या डोक्यात फावडे मारले. निपचित पडलेल्या युवकाला पुजाऱ्याने मंदिराच्या एका खोलीत खड्डा खोदून गाडले व कुणालाही संशय येऊ नये म्हणून त्यावर कुलर ठेवून दिला. सोमवारी ८ ऑक्टोबरला पोलिसांनी पुजाऱ्याला पकडले व गाडलेला मृतदेह कुजलेल्या अवस्थेत २९ दिवसानंतर बाहेर काढला. ही घटना खदान परिसरातील शास्त्री नगर येथे असलेल्या ओम सेतू बंध रामेश्वर शंकर धाम मंदिरात घडली. 

 

आकाश तुपे (२०)असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर विठ्ठल सुखदेव भारती (३०)असे आरोपी पुजाऱ्याचे नाव आहे. आकाश ९ सप्टेंबरपासून बेपत्ता होता. दरम्यान त्याचे आई-वडील औरंगाबाद येथे असल्याने त्याचा मित्र सागर पाटील याने याने खदान पोलिस ठाण्यात आकाश बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी तपास सुरु केला होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आकाश व मंदिराचा पुजारी विठ्ठल यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यावरून पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मंदिर परिसराचा शोध घेतला असता पोलिसांना मंदिरातील एका टाक्यात आकाशची चप्पल दिसून आली होती. या टाक्यातच त्याचा मृतदेह असावा, या संशयावरून पोलिसांनी संपूर्ण टाके उपसून काढले होते. मात्र पोलिसांच्या हाती काहीही लागले नव्हते. त्यानंतर मात्र पुजारी विठ्ठल हा बेपत्ता झाला. पोलिसांना विठ्ठलवर संशय आल्याने त्यांनी विठ्ठलचा शोध सुरु केला असता सोमवारी ८ ऑक्टोबरला त्याला अहमदाबाद येथून अटक केली. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आकाशची हत्या केल्याचे कबूल केले. 


आकाश हा देशी कट्टा देत नव्हता म्हणून त्याच्यात व आपल्यात झटापट झाली. त्यात त्याचा मृत्यू झाला व मंदिराच्या खोलीत त्याचा मृतदेह गाडल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्याला घेऊन पोलिस सोमवारी सकाळीच मंदिरात पोहोचले. त्याने आकाशला जेथे गाडले ती जागा दाखवली. पोलिसांनी जागा खोदली असता आकाशचा कुजलेला मृतदेह दिसून आला. या प्रकरणी पीएसआय शेख हासम शेख कासम यांच्या फिर्यादीवरून आरोपी पुजारी विठ्ठल भारती याच्याविरुद्ध भांदवी ३०२, २०१ नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला गुरुवारी ११ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या घटनेचा तपास पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर व उपविभागीय पोलिस अधिकारी उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संतोष महल्ले, पीएसआय शेख हाशम शेख कासम, पोलिस कर्मचारी संजय सोनटक्के, दिलीप उमाळे, जगदीश इंगळे यांनी केला. 


असा झाला हत्येचा उलगडा
आकाशची हत्या केल्यानंतर पुजारी बेपत्ता झाला. आकाशची चप्पल शौचालयाच्या टाक्यात सापडल्यानंतर पोलिसांनी घातपाताच्या दिशेने तपास सुरु केला होता. या प्रकरणाचा तपास पीएसआय शेख हासम शेख कासम यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी पुजारी विठ्ठल भारती भोवती तपास केंद्रीभूत केला. पुजारी विठ्ठलचा शोध सुरु केला असता त्याचा मोबाइल हा त्याचे गुरु सुखदेव महाराज भारती यांच्याकडे ठेवल्याचे दिसून आले. पोलिसांनी या मोबाइलमधील सिमकार्ड आपल्या मोबाइलमध्ये टाकले. त्यात असलेल्या सर्व मोबाइल नंबरवर पोलिसांनी संपर्क साधून सुखदेव महाराजांची प्रकृती नाजूक आहे. ते विठ्ठल विठ्ठल करीत आहेत, तुमच्याकडे विठ्ठल भारती असेल तर आम्हाला सांगा, असा बनाव करून त्यातील प्रत्येक नंबरवर संभाषण केले. एका नंबरवरील संभाषणावरून पोलिसांना संशय आला. हा नंबर मध्य प्रदेशातील रिवा जिल्ह्यातील परमेश्वर दुबे याचा असल्याचे समोर आले. पीएसआय शेख हासम हे पोलिस कर्मचारी संजय सोनटक्के, दिलीप उमाळे, जगदीश इंगळे यांच्यासह ३० सप्टेंबरला मध्य प्रदेशातील रिवा येथे गेले. तेथे परमेश्वर दुबे याची चौकशी केल्यानंतर विठ्ठल हा परमेश्वर दुबे याच्या मुलासोबत अहमदाबाद येथे गेल्याचे कळले. त्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा अहमदाबाद येथे वळवला. तेथे विठ्ठल हा सिक्युरिटी गार्डची नोकरी करताना दिसून आल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले व अकोल्यात आणल्यानंतर त्याने आकाशचा खून केल्याचे कबूल केले. 


घटनेपूर्वी मंदिरातच दोघेही सोबत जेवले 
आकाश तुपे याचे मंदिराला लागून स्वस्त धान्याचे दुकान आहे. त्यामुळे आकाश आणि विठ्ठल भारती यांच्यात मैत्री होती. ९ सप्टेंबरला आकाश व विठ्ठल यांनी मंदिरातच सोबत जेवण केले. त्यानंतर देशी कट्ट्यावरून दोघांत वाद झाला. झटापटीत विठ्ठल भारतीने आकाशच्या डोक्यात फावडे मारले त्यात त्याचा मृत्यू झाला. 


कोण आहे पुजारी विठ्ठल.. 
खदान परिसरात ओम सेतू बंध रामेश्वर शंकर धाम मंदिर आहे. या मंदिराचा पुजारी सुखदेव महाराज भारती आहे. सुखदेव महाराज वयोवृद्ध असल्याने त्यांनी त्याचा वारसपूत्र म्हणून धुळे जिल्ह्यातील धडगाव येथील विठ्ठल याची निवड केली. त्यानुसार विठ्ठल हा विठ्ठल सुखदेव भारती झाला. तो मंदिरातच राहू लागला. विठ्ठल भारती हा व्यसनी असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...