आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंडित हरिप्रसाद चौरसियांना पुल स्मृती सन्मान जाहीर, अशोक सराफांचा सन्मान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाने मराठी वाचक आणि रसिकता घडवणाऱ्या पु. ल. देशपांडे यांचा जन्मशताब्दी सांगता समारोह पुण्यात ८ ते ११ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. याप्रसंगी ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांना पुल स्मृती सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सामाजिक-शैक्षणिक कार्यकर्त्या रेणू दांडेकर, अभिनेते शरद पोंक्षे आणि चिन्मय मांडलेकर यांचा पुल स्मृती सन्मानाने गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘आशय सांस्कृतिक’चे वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार यांनी सोमवारी दिली. पुलंच्या स्मृतींचे जागरण गेल्या वर्षभरात देश-विदेशांत अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून करण्यात आले. त्या सोहळ्याची सांगता पुण्यातील कार्यक्रमांनी होणार आहे, असे सांगून चित्राव म्हणाले, ‘पुलोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आणि डॉ. नरेंद्र जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खाँ यांचा ८० व्या वाढदिवसानिमित्त सत्कारही होणार आहे. कलाक्षेत्रातील मान्यवर आणि गुणवंत युवा कलाकारांचा सन्मान, सादरीकरण आणि पुलंच्या स्मृती जागवणारे विविध कार्यक्रम पुलोत्सवात रंगणार आहेत.

पुलस्त्य विज्ञान महोत्सव
पुल जन्मशताब्दी सांगता समारंभाचे वेगळेपण अधोरेखित करणारा पुलसत्य विज्ञान महोत्सव ‘आयुका’मध्ये ६ ते ८ नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. पुल, सुनीताबाई आणि आयुका संस्था यांचे अखेरपर्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. पुलंच्या देणगीतूनच आयुका विज्ञान सेंटर आणि मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्राची स्थापना झाली होती.