आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुलवामाच्या हल्ल्यातील संशयितास पुण्यात अटक; जवानांची यादी दहशतवाद्यांना पुरवली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - गेल्या १४ फेब्रुवारी रोजी पुलवामामध्ये भारतीय लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या भयंकर आत्मघाती हल्ल्याप्रकरणी बिहार दहशतवादविरोधी पथकाने गुरुवारी एका संशयितास पुण्यात अटक केली. पुलवामा हल्ल्यापूर्वी भारतीय जवानांच्या तैनातीबद्दलची सविस्तर माहिती व लष्कराबद्दलची अन्य संवेदनशील कागदपत्रे दहशतवादी संघटनेला पुरवल्याचा या संशयितावर आरोप आहे. 


पाटणा येथील बेकायदेशीर हालचाल प्रतिबंधक कृत्य (यूएपीए) कायद्यांतर्गत एका गुन्ह्यात तो आरोपी होता. चाकण परिसरातून त्याला अटक करण्यात आली आहे. शरीयत अन्वर उल हक मंडल (१९) असे संशयिताचे नाव असून तो प. बंगालचा रहिवासी आहे. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करून बिहार एटीएसने त्याचा ट्रान्झिट रिमांड मिळवला. एटीएसचे पथक त्याला घेऊन बिहारला रवाना झाले आहे. पुलवामासह इतर अनेक संशयित कारवायांबद्दल त्याची आता कसून चौकशी होईल. शरीयत मंडल गेल्या दाेन महिन्यांपासून  चाकण परिसरात खालुब्रे गावात राहत हाेता. 

 

संयुक्त कारवाई  

बिहार एटीएस पुण्यात दाखल झाल्यानंतर पुणे एटीएसच्या मदतीने या दोन्ही पथकांनी त्याचा पुणे परिसरात शोध सुरू केला. कसून तपास केल्यानंतर तो चाकणमध्ये असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार शरीयत मंडल यास अटक करण्यात आली. चाकण परिसरात  सुमारे तीन महिन्यांपासून वास्तव्यास असलेला शरीयत एका बांधकाम व्यावसायिकाकडे मजूर म्हणून काम करत होता.

 

असा लागला सुगावा
पुलवामा हल्ल्यानंतर बिहार एटीएसने बांगला देशातील अब्दुल सुलतान आणि खैरुल मंडल या दोघांना संशयावरून अटक केली आहे. या दोघांजवळ जम्मू-काश्मीरमध्ये  तैनात करण्यात येणाऱ्या जवानांसंबंधी माहिती असलेली कागदपत्रे सापडली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एटीएसने पुण्यात ही कारवाई केली.
 

दहशतवादी संघटनांत भरतीची होती दोघांवर जबाबदारी
बांगलादेशी दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट ऑफ बांगलादेश (अाइएसबीडी) आणि जमात उल मुजाहिदीन या संघटनांसाेबत संपर्कात राहून तरुणांना या संघटनांत भरती करण्याची जबाबदारी बिहारमध्ये अटकेत असलेल्या दोघांवर होती, असे चौकशीत स्पष्ट झाले. सिरियामध्ये जाऊन इसिसमध्ये सहभागी हाेण्याचाही त्यांचा कट हाेता. भारतातील शहरांची रेकी करून दहशतवादी संघटनांत तरुणांची भरती करण्याच्या उद्देशाने हे दोन तरुण काम करत होते. 

 

 

त्या’ दाेघांशी असलेल्या संपर्कामुळे फुटले बिंग
पुण्यात अटक करण्यात आलेला शरीयत मंडल हा पाटण्यात अटक करण्यात आलेल्या दोघांशी बराच काळ संपर्कात होता. न्यायालयात त्याने ही कबुलीही दिली. मात्र, या दोघांची दहशतवादी कारवायाची पार्श्वभूमी आपल्याला माहिती नव्हती, असे मंडल याचे म्हणणे आहे.
 

 

जिहादचे व्हिडिओ...  

अब्दुल सुलतान आणि खैरूल मंडल हे दोघे पुण्यात अटक करण्यात आलेल्या शरीयत मंडल याला जिहादबद्दल मौलवीचे व्हिडिओ पाठवत असत. व्हिडिओ कॉल करून ते दहशतवादी प्रशिक्षणाबद्दल माहितीही देत होते.  मात्र, आपला यातील कोणत्याही कारवाईत सहभाग नव्हता, असे संशयित शरीयतचे म्हणणे आहे. यावर विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांनी त्याचा ट्रान्झिट रिमांड मंजूर केला.

बातम्या आणखी आहेत...