आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Kashmir: पुलवामा हल्ल्यासाठी स्फोटके गोळा करणाऱ्या मुदस्सिरसह जैशच्या 2 दहशतवाद्यांना कंठस्नान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत जैश ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, यातील एका दहशतवाद्याचे नाव मुदस्सिर अहमद खान उर्फ मोहम्मद भाई (23) असे होते. त्याच्या कुटुंबियांना सोमवारी मृतदेह सुपूर्द करण्यात आला. डीएनए सॅम्पल घेतले असता ठार झालेला दहशतवादी मुदस्सिरच असल्याचे स्पष्ट झाले आहे. तत्पूर्वी रविवारी पोलिस अधिकाऱ्यांनी मुदस्सिर हाच पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड होता असे सांगितले होते. त्याने 14 फेब्रुवारीच्या हल्ल्यासाठी स्फोटके गोळा केली होती. त्या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते.

 

स्फोटकांनी घरच उडवले...
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंगलिश परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर रविवारीच शोध मोहिम सुरू करण्यात आली. या दरम्यान एका घरातून जवानांवर फायरिंग करण्यात आली. प्रत्युत्तर दिल्यानंतर दोन्हीकडून चकमक उडाली. यानंतर सोमवारी सकाळी दोन दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले. सोबतच, मोठ्या प्रमाणात दारुगोळा देखील जप्त केला. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी संबंधित घरच उडवले होते.

 

इलेक्ट्रीशियन होता दहशतवादी मुदस्सिर
एनआयएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 फेब्रुवारी रोजी दहशतवादी हल्ला घडवण्यापूर्वी मुदस्सिर सतत आत्मघातकी हल्लेखोर आदिल अहमद डारच्या संपर्कात होता. मुदस्सिरने ग्रॅजुएशन आणि इलेक्ट्रीशियन विषयात डिप्लोमा केला होता. 2017 मध्ये तो मसूद अझहरच्या दहशतवादी संघटनेत सामिल झाला. फेब्रुवारी 2018 मध्ये लष्करी तळावर हल्ला झाला होता. त्यामध्ये सुद्धा मुदस्सिरचा हात होता असे सांगितले जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, पुलवामा हल्ल्याच्या 10 दिवसांपूर्वीच जैशचा आणखी एक दहशतवादी सज्जा भटने मारुती इको विकत घेतली होती. याच कारने आत्मघातकी हल्ला घडवण्यात आला. तेव्हापासूनच सज्जाद फरार आहे. गेल्या महिन्यातच एनआयएच्या टीमने सज्जाद आणि मुदस्सिरच्या घरांवर धाड टाकून चौकशी केली होती.

बातम्या आणखी आहेत...