Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | Pumps decreased by 1500 MW, 18 thousand of MSEDCL, 21,000 MW demand for state

दुष्टकाळाशी महायुद्ध : पंपांना वीजमागणी १५०० मेगावॅटने घटली, महावितरणची १८ हजार, तर राज्याची मागणी २१ हजार मेगावॅट

प्रतिनिधी | Update - May 11, 2019, 10:00 AM IST

सेंट्रल सेक्टरचे दर घसरले; वाढते तापमान, निवडणुकांमुळे पुन्हा होणार वाढ

 • Pumps decreased by 1500 MW, 18 thousand of MSEDCL, 21,000 MW demand for state

  भुसावळ - गेल्या उन्हाळ्यात एप्रिल व मे महिन्यात २४ हजार मेगावॅटवर पोहोचलेली उच्चांकी वीजमागणी यंदा उन्हाच्या झळा वाढल्यावरही आवाक्यात आहे. राज्यातील दुष्काळी स्थितीत भूजल आटल्याने उन्हाळ्यातच वीज पंप बंद असल्याने राज्यातील कृषी क्षेत्राकडून होणारी वीजमागणी दीड हजार मेगावॅटने घसरली आहे.


  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कोल इंडियासह आयात कोळसा वाढवला आहे. शुक्रवारी महावितरणची वीजमागणी १८,२०० तर राज्याची वीजमागणी अवघी २१,३०० मेगावॅट होती. यंदा राज्यात अल्प पाऊस झाला. यामुळे २१ जिल्ह्यांतील १५१ तालुक्यांत शासनाने दुष्काळ जाहीर केला. विहिरी व कूपनलिकांची भूजल पातळी घटल्याने आता उन्हाळ्यात पिकांसाठी पाणी उपसा करणाऱ्या विजेवरील पंपही बंद ठेवावे लागत आहेत. यामुळे कृषी क्षेत्रातील विजेची मागणी दीड हजार मेगावॅटने घटली. उन्हाळ्यात लोकसभा व आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनमताचा विचार करून राज्याच्या ऊर्जा विभागाने आयात कोळशाचा साठा वाढवून ठेवला. यासह सध्या कोल इंडियाकडूनही सध्या वेळेवर व पुरेशा प्रमाणात कोळसा उपलब्ध होत आहे. महानिर्मितीच्या सातही औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतून वीजनिर्मिती होत असली तरी सध्या विजेला उन्हाळा असूनही मागणी नसल्याने ८० टक्क्यांच्या आत पीएलएफ ठेवून वीजनिर्मिती होत आहे. राज्याचे सध्याचे वीज उत्पादन आणि मागणीचा विचार करता अडीच ते तीन हजार मेगावॅटची तूट असली तरी कृषी क्षेत्रातून कमी झालेल्या मागणीमुळे कोठेही भारनियमन नाही. विजेची मागणी अचानक वाढली तरी सेंट्रल सेक्टरमधून अल्प दरात विजेची उपलब्धता असल्याने सध्या तरी विजेच्या समस्या निर्माण होणार नसल्याचे चित्र कायम आहे.

  २०१८ च्या उन्हाळ्यात राज्याची वीजमागणी उच्चांकी अर्थात २४ हजार मेगावॅटवर गेली होती. सेंट्रल सेक्टरमधून १८ रुपये प्रतियुनिटपर्यंत उच्चांकी दर पोहोचले होते. यंदा एप्रिलपासूनच वाढलेले तापमान, निवडणुकांमुळे हे दर पुन्हा वाढतील, असा अंदाज होता. मात्र, कृषीची वीजमागणी घटल्याने हे दर सध्या अवघे ३ रुपये ते ३.६० पैसे आहेत. सेंट्रल सेक्टरमधून उन्हाळ्यात विविध राज्यांकडून विजेची खरेदी होते. मात्र, यंदा मागणीच नसल्याचे चित्र कायम आहे.

  कोळसा साठा वाढला
  केंद्र सरकारच्या सौभाग्य योजनेमुळे नवीन वीज कनेक्शन वाढले. विजेची मागणी वाढणार असल्याने देशातील कोळशाचे उत्पादनही सात टक्क्यांनी वाढून ६७१ दशलक्ष मेट्रिक टनांवर पोहोचले. यामुळे राज्य शासनालाही कोळशाचा पुरवठा वाढला. सध्या कोळसा पुरवठा मुबलक असून विजेची निर्मिती अधिक होत असली तरी मागणी नसल्याने विजेची मागणी वाढत नसल्याचे महानिर्मितीच्या सूत्रांनी सांगितले.

  उन्हाळ्यातही जुने संच बंदच
  महानिर्मितीचे नाशिक, भुसावळ व परळी येथील २१० मेगावॅटचे जुने संच मागणी नसल्याने उन्हाळ्यातही बंद आहेत. भुसावळातही कर्मचाऱ्यांनी संच कार्यान्वित करण्यासाठी आंदोलन पुकारले. मात्र, यानंतरही राज्यात मागणीच नसल्याने ऊर्जा विभाग, महानिर्मितीकडून बंद असलेले हे संच कार्यान्वित केले जात नाहीत. उलट ५०० मेगावॅट व ६६० मेगावॅट सुपर क्रिटिकल प्रकल्पांतूनही ८० टक्क्यांच्या आत पीएलएफ गाठून वीजनिर्मिती होत आहे.

Trending