आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pune Bhima Koregaon War Memorial 201 Anniversary News And Update

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शौर्यदिनास 201 वर्षे पूर्ण..कोरेगाव भीमात उसळला अभूतपूर्व भीमसागर, गतवर्षीच्या हिंसाचारामुळे संख्या घटण्याची शंका ठरली फोल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेरेगाव भीमा- ब्रिटिश सरकारमधील महार रेजिमेंटच्या बहाद्दर सैनिकांनी केलेल्या अतुलनीय पराक्रमाच्या स्मृतिप्रीत्यर्थ काेरेगाव भीमा येथे उभारण्यात आलेल्या जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मंगळवारी राज्यासह देशाच्या वेगवेगळ्या कानाकाेपऱ्यातून तब्बल ४ ते ५ लाख अनुयायी आले हाेते. गेल्या वर्षी झालेल्या हिंसाचाराचे सावट असल्यामुळे पुणे पाेलिसांनी या साेहळ्याच्या निमित्ताने तैनात करावयाच्या चाेख बंदाेबस्ताचे दाेन महिन्यांपासून नियाेजन केले हाेते. माेठा फाैजफाटा, सीसीटीव्ही, ड्राेनची नजर, मेटल डिटेक्टरने प्रत्येकाची तपासणी आणि गावात बाहेरील वाहनांना बंदी केल्याने हा कार्यक्रम यंदा निर्विघ्नपणे पार पडला. स्थानिक गावकऱ्यांनीही अनुयायांचे स्वागत करून त्यांच्याशी सलाेख्याचा व्यवहार केला. दरम्यान, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर यांच्यासह अनेक नेत्यांनी व लाेकप्रतिनिधींनीही हजेरी लावली. मराठवाड्यासह साेलापूर, विदर्भ, खान्देश, मुंबई, पुणे आदी भागातून माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते. 

 

पाेलिसांनी पुण्याकडून येणारी खासगी वाहने शिक्रापूर व लाेणीकंद येथून वळवली हाेती. तसेच पुण्याकडून काेरेगावकडे जाणारी वाहने पाच किलाेमीटर अंतरावरील लाेणीकंद, तुळापूर, थेऊर येथेच अडवली. तसेच नगरकडून येणारी वाहने १२ किलाेमीटर अलीकडेच शिक्रापूर चाैक, एल अँड टी फाटा, सणसवाडी येथे राेखली हाेती. या ठिकाणी ११ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली हाेती. तिथून पुढे बसेसद्वारे अनुयायांना काेरेगाव भीमात पाठवले जात हाेते. त्यामुळे गावात वाहनांची गर्दी टाळणे शक्य झाले.


गतवर्षीच्या हिंसाचारामुळे संख्या घटण्याची शंका ठरली फोल, सुमारे पाच लाख अनुयायांनी लावली हजेरी 

देशभरातून आलेल्या लाखो आंबेडकरी अनुयायांचा अभूतपूर्व भीमसागर पेरणे फाटा (कोरेगाव भीमाजवळ) येथील स्मृतिस्तंभाने मंगळवारी पाहिला. महार सैनिकांच्या पराक्रमाच्या स्मृतिप्रीत्यर्थ ब्रिटिशांनी १८१८ मध्ये उभारलेल्या स्मृतिस्तंभाला अभिवादनासाठी सकाळपासून सुरू झालेला जनांचा प्रवाह सूर्यास्त झाल्यानंतरही अखंड वाहत होता. यंदा अभिवादनास सुमारे ५ लाख लोक आल्याचे सांगण्यात आले. वढू येथे छत्रपती संभाजी महाराज व गाेविंद गायकवाड यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठीही गर्दी झाली हाेती.
 
लाखोंच्या संख्येने आलेली आंबेडकरी जनता गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा गजर करत स्मृतिस्तंभ परिसरात येत होती. गेल्या वर्षी १ जानेवारीला या परिसरातील हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर यंदा गर्दी कमी होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या सर्व भागांतून व गोवा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश आदी भागांतून प्रचंड संख्येने लोक दिवसभर येत राहिले. आंबेडकरी जनतेची शिस्त आणि पोलिस व पुणे जिल्हा प्रशासनाने ठेवलेली व्यवस्था यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. समता सैनिक दलाच्या निळ्या टोप्या घातलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनीही जनसमुदायाचे नियंत्रण केले. 

केंद्रीय मंत्री रामदास आठवले, बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रा. जोगेंद्र कवाडे, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे भीमराज आंबेडकर व मीराताई आंबेडकर, भीम आर्मीचे चंद्रशेखर रावण, रोहित वेमुलाची आई राधिका आदींसह अनेक आंबेडकरी संघटनांचे नेते उपस्थित होते. मंगळवारी सर्वप्रथम भल्या पहाटे राज्यमंत्री दीपक केसरकर पोहोचले. त्यानंतर अॅड. प्रकाश आंबेडकर सकाळी ७ वाजताच स्मृतिस्तंभाला अभिवादनासाठी आले. तोपर्यंत आंबेडकरी जनतेचे थवेच्या थवे येऊ लागले होते. या गर्दीने अॅड. आंबेडकर यांना भेटण्यासाठी झुंबड उडवून दिली. राज्यमंत्री दिलीप कांबळे, भाजप खासदार अमर साबळे, आदींनीही भेट दिली. महार रेजिमेंटच्या आजी-माजी सैनिकांनीही स्मृतिस्तंभाला मानवंदना अर्पण केली. 

 

स्थानिकांकडून नाष्टा, पाणी, भोजनाची व्यवस्था 
गेल्या वर्षीच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर यंदा पेरणे, कोरेगाव भीमा, सणसवाडी, लोणीकंद, अष्टापूर फाटा, वढू येथील स्थानिक नागरिकांनी आंबेडकरी जनतेचे उत्स्फूर्त स्वागत केले. अनेक ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांनी नाष्टा, पिण्याचे पाणी आणि जेवणाची व्यवस्था केली होती. स्थानिकांनी खाद्य व पेय पदार्थांची विक्रीही रात्री उशिरापर्यंत चालू ठेवली होती. 

 

वाहनांच्या रांगांमुळे दिग्गज नेते 'रस्त्यावर', अनेकांची पायपीट 
केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्याचे मंत्री दिलीप कांबळे, अविनाश महातेकर, आनंदराज आंबेडकर, चंद्रशेखर रावण हे नेते प्रचंड गर्दीमुळे अक्षरशः रस्त्यावर आले. वाहनांच्या तीन-तीन किलोमीटर लांब लागलेल्या रांगा, गर्दीने फुलून गेलेला रस्ता यामुळे या नेत्यांच्या आलिशान गाड्या मुंगीपेक्षाही कमी वेगाने पुढे सरकत होत्या. अखेरीस यातल्या काहींनी गाडी सोडून चालणे पसंत केले. पाच-सहा किलोमीटरची पायपीट करावी लागल्याने आनंदराज आंबेडकर यांची दमछाक झाली. 

 

तीर्थक्षेत्राचा दर्जा हवा 
गेल्या वर्षी जे घडले तो इतिहास झाला. पण त्यामुळेच आजची गर्दी उफाळून आली. अभिवादनासाठी येणाऱ्या भीमसैनिकांची गर्दी यापुढे वाढतच जाईल. त्यामुळे राज्य सरकारने स्मृतिस्तंभ परिसराला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा आणि तशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. -आनंदराज आंबेडकर 

 

भीमसैनिकांत भीती नाही 
आदल्या दिवसापासूनच राज्यभरातून भीमसैनिक येथे येऊ लागले. तेव्हापासून आम्ही ग्रामस्थ गुलाबाचे फूल आणि पाणी देऊन त्यांचे स्वागत करत होतो. आलेल्या भीमसैनिकांच्या मनात कोणती भीती नाही. शंका नाही. आमचे स्वागत त्यांनी आनंदाने स्वीकारले. -रूपेश ठोंबरे, सरपंच, पेरणे फाटा. 

 

सरकारने लोकांना घाबरवू नये 
कोरेगाव भीमा येथील लढाईचा इतिहास ज्यांनी लोकांमध्ये नेला त्यांना सरकार दहशतवादी ठरवते. गेल्या वर्षी मराठ्यांचे मोर्चे निघाले. त्याला प्रत्युत्तर म्हणून ओबीसींचे मोर्चे निघाले. ओबीसी-मराठ्यांमधला हा दुरावा कमी करण्यासाठी कोरेगाव भीमाच्या लढाईचा इतिहास उपयुक्त आहे. 

 

वैद्यकीय पथके, पिण्याच्या पाण्याची साेय : सरपंच 

काेरेगाव भीमाच्या सरपंच संगीता कांबळे म्हणाल्या, 'लाखाेंच्या संख्येने येणाऱ्या अनुयायांकरिता जिल्हाधिकारी व पाेलिस अधीक्षक यांनी माेठ्या प्रमाणात पायाभूत साेयी-सुविधांची उपलब्धता केली. पिण्याच्या पाण्याचे १७० टँकर, वैद्यकीय पथके, पार्किंग व्यवस्था, सीसीटीव्ही, स्वच्छता आदी उपलब्ध हाेते. तसेच १४ रुग्णवाहिका, अग्निशामक दलांची २० पथके तैनात केली हाेती.' 

 

कोरेगाव भीमासाठी १०० कोटींचा विकास आराखडा 
"कोरेगाव भीमा येथील जयस्तंभ परिसरास तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करू. येथील विकासासाठी राज्य सरकारने ६३ कोटींचा विकास आराखडा तयार केला आहे. त्यात वाढ करून १०० कोटींचा आराखडा करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे सहकार्य करण्यात येईल," असे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. "या वर्षी आंबेडकरी जनता व मराठा समाज या दोघांनी शांतता पाळली. याबद्दल दोन्ही समाजांचे आभार मानतो."