आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दगडूशेट मंदिरात आता ‘गणेश परिवार’ प्रतिष्ठापित होणार, 25 जानेवारीला पाच मूर्तींची स्थापना होणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • श्रीमंत दगडूशेट गणेशाच्या मूळ मूर्तीच्या जोडीनेच गणेश परिवारातील मूर्ती विराजमान होणार आहेत

पुणे- लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीमंत दगडूशेट हलवाई गणेशापाशी आता संपूर्ण गणेश परिवार मूर्तींच्या स्वरुपात प्रतिष्ठापित होणार आहे. गणेशपत्नी मानल्या जाणाऱ्या देवी महासिद्धी, देवी महाबुद्धी, पुत्र लक्ष व लाभ आणि गणेश क्षेत्ररक्षक नग्नभैरव अशा पाच देवतामूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. सर्व मूर्ती चांदीच्या असून, त्या छगन मिस्त्री या कलाकाराने घडवल्या आहेत. 25 जानेवारीला दुपारी सव्वातीन ते सव्वापाच या वेळात गणेश परिवार मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

दगडूशेट हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी ही माहिती गुरुवारी येथे दिली. ट्रस्टचे अन्य विश्वस्तही यावेळी उपस्थित होते. मूर्तींविषयीची धार्मिक ग्रंथोक्त माहिती देताना गोडसे म्हणाले,“श्रीगणेशाच्या दोन शक्तींना महाबुद्धी, महासिद्धी अशा संज्ञा आहेत. त्या दीप, कमळ, चवरी घेऊन गणेशसेवेसाठी सिद्ध असतात. तसेच लक्ष आणि लाभ यांना गणेशपुत्र मानले जाते. नग्नभैरव हा गणेशरक्षक आहे. या सर्वांना एकत्रितरीत्या ‘गणेशपरिवार’ म्हटले जाते. श्रीमंत दगडूशेट गणेशावर असंख्य भक्तांची श्रद्धा आहे. त्या श्रद्धाभावनेचा विचार करूनच मुख्य मंदिरात श्रींच्या सोबत या मूर्तींच्या रूपाने संपूर्ण गणेश परिवाराचे दर्शन भाविकांना आता घडणार आहे. यानिमित्ताने तसेच श्रीगणेशजन्माप्रीत्यर्थ मंदिर आणि परिसरात आकर्षक सजावट केली जाणार आहे. तसेच धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमही आयोजित केले आहेत,”.

गणेश मंदिरात श्रीमंत दगडूशेट गणेशाच्या मूळ मूर्तीच्या जोडीनेच गणेश परिवारातील मूर्ती विराजमान होणार आहेत. भाविकांनी दान केलेल्या चांदीचा वापर करूनच या नव्या  मूर्ती घडविण्यात आल्या आहेत. यात श्री लाभ देवता मूर्ती 2.272 कि.ग्रॅंम, श्री लक्ष देवता मूर्ती 2.277 कि. ग्रॅम, महाबुद्धी - 4.852 कि. ग्रॅम, महासिद्धी - 4.971 कि. ग्रॅम आणि नग्नभैरव- 4.392 कि. ग्रॅम अशा एकूण 18.761 कि. ग्रॅम चांदीच्या मूर्ती बसवण्यात येतील.