महापोर्टल / शासनाच्या महापोर्टल वेबसाइटवरील ऑनलाइन परीक्षा रद्द करण्याची मागणी, परीक्षेवर बहिष्कार घालत विद्यार्थ्यांनी घातला अलार्ड कॉलेजमध्ये गोंधळ

अचानक लाइट गेल्याने सर्व यंत्रणा ठप्प, काही काळ तणावाचे वातावरण

Dec 03,2019 08:48:00 AM IST

पुणे - महापोर्टल या वेबसाइटद्वारे घेण्यात येणारी परीक्षा रद्द करावी, यासाठी मारुंजी येथील अलार्ड कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला तसेच ही परीक्षा रद्द करावी, अशी मागणी केली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


राज्य शासनाच्या वतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कनिष्ठ लिपिक पदाच्या भरतीसाठी महापोर्टल या वेबसाइटद्वारे मारुंजी येथील अलार्ड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये सोमवारी ऑनलाइन परीक्षा घेण्यात येत होती. मात्र, सर्व्हर डाऊन असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याला लॉगइनसाठी खूप वेळ लागत होता. दरम्यान, पेपर सुरू असताना अनेक वेळा लाइट गेली, बंद पडलेले काही संगणक सुरू होत नव्हते. शेकडो विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर सुरू करून लॉगइनही केले, पण अचानक लाइट गेली अन् सर्व यंत्रणा ठप्प झाली. इन्व्हर्टर अथवा जनरेटर ठेवून पर्यायी व्यवस्था करणे अपेक्षित होते, मात्र महापोर्टलने तशी कोणतीही खबरदारी घेतली नव्हती. यानंतर विद्यार्थ्यांनी गोंधळ घालत परीक्षेवर बहिष्कार घातला. हिंजवडी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत गवारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन विद्यार्थ्यांची समजूत काढली. त्यांनी परीक्षेला पुढील तारीख देण्यासाठी महापोर्टल प्रशासनाशी बोलणी केल्याने प्रकरण निवळले.

X