आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे डायरी : 'टाकून दिलेल्या' मुलांचे काय?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयश्री बोकील

कचराकुंडीत टाकून दिलेली तसेच गर्दीच्या ठिकाणी सोडून दिलेली अर्भकं समाजातलं एक काळं वास्तव आहे. गेल्या काही दिवसांत नांदेड, परभणी, पुण्यात नवजात अशा घटनांची लागोपाठ झालेली नोंद हे वास्तव अधोरेखित करणारी आहे. अशा घटना संवेदनशील मनाला अस्वस्थ करतात.

पुण्यातील पाषाण तलावाजवळच्या एका कचराकुंडीजवळ फाटक्या गादीत गुंडाळलेली दोन अर्भकं (त्यांची नाळ कापल्यावरचा चिमटाही तसाच होता) नुकतीच पोलिस आणि सामाजिक भान जागृत असणाऱ्या नागरिकांनी वाचवली. तपासणीनंतर ही दोन्ही बालकं जुळी असावीत आणि ती अवघ्या तीन-चार दिवसांची असावीत, असं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यापैकी एक मुलगा तर एक मुलगी आहे. आसपासच्या नागरिकांनी या बाळांना कचऱ्यातून उचलून मायेची ऊब दिली आणि नंतर १०८ क्रमांकावर संपर्क साधून त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. आठ दिवसांपूर्वी मराठवाड्यातील काही ठिकाणीही अशा प्रकारची 'टाकून दिलेली अर्भकं' आढळली होती. अशा घटना आपल्या सामाजिक वास्तवावर, मानसिकतेवर काही सांगू पाहत असतात. वरवर ठिकठाक दिसणाऱ्या समाजात काहीतरी खदखदतंय, चुकतंय, गैर घडतंय, त्याची कारणं खोलवर रुजली आहेत याची जाणीव करून देणाऱ्या या घटना असतात.


अर्भकाला टाकून देण्यामागे नेमकं काय कारण असतं याचा विचार केला तर पहिला मुद्दा असतो, तो ते अर्भक अनौरस संतती असल्याचा. सामाजिक संकल्पनेनुसार, पती-पत्नी नात्याने बांधले गेल्यानंतर झालेली संतती हीच कायदेशीर संतती आणि वारस मानली जाते. मात्र प्रत्यक्षात अनेक कारणांमुळे विवाहापूर्वी मुली गरोदर राहतात आणि मग सामाजिकदृष्ट्या त्या संततीला 'स्थान' उरत नसल्याने ती बाळं 'टाकून देण्या'चा मार्ग अवलंबला जातो. यामध्ये बहुतेक वेळा पौगंडावस्थेतील आकर्षण, कुणाच्यातरी वरवरच्या गोड वागण्याला भुलून जाऊन त्याच्या मागणीला दिलेला होकार, अर्धवट वयातली लैंगिक संबंधांविषयीची जिज्ञासा, असुरक्षित संबंध, कुणीतरी केलेली जबरदस्ती किंवा बलात्कार...कारणे अनेक असू शकतात, मात्र त्या क्षणांची किंमत मुलींना चुकवावी लागते. कित्येक घटनांमध्ये असे संबंध नकळत घडून जातात, त्याचे गांभीर्य संबंधित मुलीलाही माहिती नसते. आपल्याला मूल हवंय का नको याचीही जाणीव नसते. या संबंधांतून मूल जन्माला येऊ शकते हेदेखील माहिती नसते अशाही घटना घडल्या आहेत.

दुसरा मुद्दा, जाणत्या वयात 'आपलं मूल' या संज्ञेचा नेमका अर्थ मुलीला उमगलेला असतो. त्या होणाऱ्या बाळाशी तिच्या मनात अनुकूल भावनिर्मिती झालेली असते. तिची त्या गर्भावस्थेतील जिवासोबत केवळ शारीरिक गुंतवणूक नसते, तर ती मानसिक, भावनिकदृष्ट्याही त्यात गुंतलेली असते. पण नकळत्या वयात, इच्छेने-अनिच्छेने, फसवणुकीने, अज्ञानाने, आकर्षणाने...जेव्हा एखादी मुलगी गरोदर राहते तेव्हाच 'टाकून दिलेल्या अर्भकां'च्या घटना प्रामुख्याने घडतात. अनेकदा उपरोक्त कुठल्याही कारणामुळे मुलगी गरोदर राहिल्यास सधन मंडळी गर्भपाताचा मार्ग स्वीकारतात. पण अनेक घटनांमध्ये गरोदर राहिलेली मुलगी निर्धन, निराधार, असहाय असते. गर्भपाताचा मार्ग तिला शक्य नसतो. त्यामुळेही अर्भक टाकून देण्याचा निर्णय घेतला जातो. काही वेळा जन्मलेलं मूल अनाथालयाच्या दारावर ठेवून जाण्याच्या घटनाही घडतात.

या सगळ्या घटनाक्रमांत मुलगे-पुरुष मात्र नामानिराळे राहतात. सामाजिक व्यवस्था पुरुषप्रधान असल्याने दोष मुलीचाच मानून सगळी जबाबदारी मुलीवर ढकलली जाते. विवाहाशिवाय झालेले मूल आपला समाज स्वीकारत नाही. अशी मुलगी, स्त्री आणि तिचे मूल कायम संशयास्पद, लांच्छन म्हणूनच पाहिले जाते. पाश्चात्त्य समाजात विवाहाच्या नात्याशिवाय झालेले मूल कित्येक मुली, स्त्रिया उघडपणाने वाढवतात. त्यांच्यावर अनौरस संततीचा शिक्का मारला जात नाही. पण आपल्या सामाजिक रचनेत अशा संबंधांतून जन्मलेल्या संततीला 'आयडेंटिटी' नसते. मुलगी गरीब, असहाय, निराधार असेल तर मूल सांभाळायचे कसे, वाढवायचे कसे, जबाबदारी कशी घ्यायची..असे प्रश्न आज एकविसाव्या शतकातही अनुत्तरितच आहेत. याचा एकत्रित परिणाम म्हणून समाजात 'टाकलेल्या अर्भकांचा' प्रश्न निर्माण होतो, असे निरीक्षण वैद्यकीय व सामाजिक समुपदेशकांनी नोंदवले आहे.


जयश्री बोकील
jayubokil@gmail.com