आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेडून पडलेले संसार उभारण्यासाठी पुण्यातील पुरग्रस्तांची धडपड सुरू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मुठा उजवा कालवा गुरुवारी दांडेकर पूल परिसरात फुटून दांडेकर वसाहतीतील घरांत पाणी शिरल्याने सुमारे ४०० घरांचे नुकसान झाले. यापैकी १५० घरांतील सामानासह अन्नधान्य आणि इतर बाबींचे अतोनात नुकसान झाले आहे. येथील कुटुंबीयांची आता सामानाची जुळवाजुळव करून मोडलेले संसार पुन्हा उभारण्यासाठी धडपड सुरू आहे. 


बोडेकरांना मिळाला दीड लाखाचा धनादेश 
हमाली करणारे सुरेश बाेडेकर यांनी उसनवारी करून मुलांच्या शिक्षणासाठी घरात दीड लाख रुपये अाणून ठेवले हाेते. मात्र, घरात शिरलेल्या पाण्यात सर्व पैसे वाहून गेले. पत्नी शेवंता यांनी मुलीस लॅपटाॅप व शुल्कासाठी रक्कम जमवली होती. ही बाब समजताच नीलम गाेऱ्हे यांनी शिवसेनेकडून त्यांना दीड लाखाची मदत केली. दरम्यान, भाजप खासदार संजय काकडे यांनी पुरग्रस्तांना त्यांच्या निधीतून ५० लाखांची मदत जाहीर केली आहे. 


संसार फुललेल्या घराला कुलपाची भिंतच राहिली 
सफाई कामगार असलेल्या उषा तिसरभाेळे घटनेवेळी बाहेर हाेत्या. तर, माया परदेशी मुलास घेऊन दवाखान्यात गेल्याने घराला कुलूप लावले हाेते. पाणी थांबल्यावर घरी येऊन पाहिले तर केवळ घराची कुलूप लावलेली भिंत शिल्लक हाेती. घरातील सामान व भिंत वाहून गेली हाेती. आता निवाऱ्यासह भोजनाचाही प्रश्न आहे. मुलांची अभ्यासाची पुस्तके परत काेठून अाणायची, कपडे काेठून द्यायचे, हे प्रश्न उभे राहिल्याचे त्या म्हणाल्या. 


वीजवाहिन्यांचा घटनेशी संबंध नाही : महावितरण 
कालवा फुटण्याशी कालव्याबाहेरील भिंतीच्या बाजूला दोन वर्षांपूर्वी टाकलेल्या भूमिगत वीजवाहिन्यांचा संबंध नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले. भिंतीच्या बाजूला पाच फूट अंतरावर महावितरणच्या दोन भूमिगत वीजवाहिन्यांच्या चार केबल २०१६ मध्ये टाकलेल्या आहेत. 


दुर्गंधी पसरलेल्या भागात औषधी फवारणी, सफाई 
दांडेकर पूल व जनता वसाहत परिसरात सर्वत्र दुर्गंधी अाणि मातीचा गाळ साचला. पालिकेचे सहायक अायुक्त आशिष महाडदळकर म्हणाले, सुमारे ४०० झोपड्या व घरांचे नुकसान झाले अाहे. १०० कर्मचारी सफाई तर २५ जणांची टीम अाैषध फवारणी करत अाहे. 


उंदीर अाणि घुशी काेणत्या अाकाराच्या? : गाेऱ्हे 
उंदीर अाणि घुशींनी कालवा खालून पाेखरल्याने ही घटना घडल्याचे निरीक्षण जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाेंदवले. उंदीर अाणि घुशी काेणत्या अाकाराच्या हाेत्या? त्यांनी पाेखरल्याने नव्हे तर केबल व बेकायदा पाइपलाइनमुळे फुटल्याची टीका नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. 


महापाैर, पालकमंत्र्यांना पुरग्रस्तांनी घातला घेराव 
महापाैर मुक्ता टिळक यांनी गुरुवारी घटनास्थळी भेट दिल्यानंतर एका ठिकाणी हसल्याचा प्रकार घडला हाेता. यामुळे स्थानिक नागरिक महापाैरांवर चिडून हाेते. पालकमंत्री गिरीश बापट यांनी वस्तीत गुडघाभर पाणीच शिरल्याचे म्हटले होते. ते दोघेही शुक्रवारी पाहणीसाठी आलेले असताना त्यांच्या कृत्याने चिडलेल्या नागरिकांनी दोघांनाही घेराव घालत घोषणाबाजी केली. दरम्यान, तत्काळ मदतीची अपेक्षाही व्यक्त केली. या वेळी बापट म्हणाले, पैसे, मनपा किंवा जलसंपदा असा काेणताच वाद नसून पाणीपुरवठा खंडित करणे अवघड असल्याने ताे बंद करता येत नाही. एक ते दीड महिन्यात पर्याय म्हणून पाइपलाइन पूर्ण करून दुरुस्ती केली जाईल. कालव्याच्या बाजूला अतिक्रमणाची घरे असल्याने घरांत पाणी शिरते. घाण कपडे, टायर, कचरा कालव्यात टाकला जाताे, त्यामुळे पुणे परिसरातील ३५ किलाेमीटरचा कालवा २४ किलाेमीटर बंद पाइपलाइनद्वारे करण्यात येणार अाहे. यातून अडीच टीएमसी पाणी वाचेल. त्यासाठी १२०० ते १४०० कोटींपर्यंतच्या निविदा काढून भूमिगत कालवा केला जाईल. 

बातम्या आणखी आहेत...