आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा वर्षांत सर्वात कमी कालावधीत संपली पुण्यातील विसर्जन मिरवणूक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे : पुण्याची वैभवशाली परंपरा असलेली गणरायाची विसर्जन मिरवणूक यंदा २४ तास १३ मिनिटे चालली असून गतवर्षीच्या तुलनेत ती २ तास २३ मिनिटे लवकर संपली. स्पीकर बंद केल्यानंतर मिरवणूक नेहमीप्रमाणे मंदावली होती. मात्र, पोलिसांनी गुरुवारी स्पीकरला परवानगी दिली. मात्र, शुक्रवारी ती दिली नाही. टिळक रस्त्यावरून शेवटचे मंडळ सकाळी दहा वाजता गेले अाणि शेवटचा गणपती सकाळी साडेदहा वाजता विसर्जित झाला. मात्र, १२ वाजून दाेन मिनिटांनी नटेश्वर घाटावर गुरुवार पेठेतील गाैरी अळी मित्रमंडळाच्या गणपतीचे विसर्जन झाले. मागील दहा वर्षांत सर्वात कमी कालावधीत संपलेली विसर्जन मिरवणूक म्हणून यंदाच्या मिरवणुकीचा उल्लेख करावा लागेल.
मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची गुरुवारी सकाळी १० वाजून २३ मिनिटांनी महापाैर मुक्ता टिळक यांनी अारती करून मिरवणुकीला सुरुवात हाेत लक्ष्मी राेडने ती चार वाजून २८ मिनिटांनी नटेश्वर घाटावर पाेहोचली. मानाचा दुसरा गणपती तांबडी जाेगेश्वरीची मिरवणूक १० वाजून ४० मिनिटांनी सुरू हाेत चार वाजून ५४ मिनिटांनी तिची सांगता झाली. मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीची मिरवणूक सकाळी दहा वाजून ५० मिनिटांनी सुरू हाेत विसर्जन पाच वाजून ५२ मिनिटांनी झाले. मानाचा चाैथा गणपती असलेल्या तुळशीबाग गणपतीची मिरवणूक सकाळी साडेअकरा वाजता सुरू हाेत सायंकाळी सहा वाजता तिचे विसर्जन झाले. मानाचा पाचवा गणपती असलेल्या केसरीवाडा गणपतीची मिरवणूक दुपारी पावणेबारा वाजता सुरू झाली. पांचाळेश्वर घाटावर सायंकाळी साडेसहा वाजता सांगता झाली. तर, रात्रीच्या मिरवणुकीतील महत्त्वाचे गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची मिरवणूक शुकवारी मध्यरात्री १२ वाजून पाच मिनिटांनी सुरू हाेऊन सकाळी सात वाजता नटेश्वर घाटावर गणपतीचे विसर्जन झाले. अखिल मंडई मंडळाच्या गणपतीची मिरवणूक मध्यरात्री दाेन वाजता सुरू हाेऊन सकाळी साडेसात वा. पांचाळेश्वर घाटावर सांगता झाली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणपतीची मिरवणूक मध्यरात्री सव्वातीन वा. सुरू हाेऊन सकाळी अाठ वा. गणपतीचे पांचाळेश्वर घाटावर विसर्जन करण्यात अाले.

साडेचार लाख मूर्तींचे विसर्जन
श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश उत्सवाला सुरुवात हाेऊन ३१९३ सार्वजनिक गणपती अाणि चार लाख ३३ हजार ९३० घरगुती गणपतींचे विसर्जन अनंत चतुर्दशीपर्यंत करण्यात अाले. पुणे शहरातील चार मुख्य मिरवणूक मार्गांपैकी लक्ष्मी रस्त्याने २९० मंडळे, टिळक रस्त्याने १९६ मंडळे, कुमठेकर राेडने ४६ मंडळे तर केळकर रस्त्याने ७० मंडळे अशा एकूण ६०२ मंडळांचे अलका टाॅकीज चाैकामध्ये येऊन विसर्जन झाले. तसेच खडकी, लष्कर, येरवडा, कर्वे राेड, दत्तवाडी व शहराच्या इतर भागातही शांततेत विसर्जन मिरवणुका पार पडल्या. यामध्ये २४८४ सार्वजनिक व एक लाख ७५ हजार ४२४ घरगुती गणपतींचे विसर्जन झाले. १३७ गणेश मंडळांनी जागेवरच गणपतींचे विसर्जन केले.

ध्वनिप्रदूषणाचे १२ गुन्हे
विसर्जन मिरवणुकीदरम्यान १२ ध्वनिप्रदूषणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये दहा साउंड मिक्सर सिस्टिम जप्त केल्या गेल्या. ध्वनी पातळीची मोजणी करून एकूण ४४ स्टेशन डायरी नोंदी विविध पोलिस ठाण्यांत करण्यात आल्या. विसर्जन मिरवणुकीसाठी अपर पोलिस आयुक्त (४), पोलिस उपायुक्त (१२), सहायक पोलिस आयुक्त (२९), पोलिस निरीक्षक (१५०) सहायक पोलिस निरीक्षक/ पोलिस उपनिरीक्षक (४६१), कर्मचारी (७४५७), होमगार्ड(२९३) आणि एसआरपीएच्या दोन कंपन्या असा बंदोबस्त होता.
गर्दीत चोरी, ७ लाखांचे माेबाइल पोलिसांकडून जप्त
विसर्जन मिरवणुकीदरम्यान गर्दीचा फायदा घेत हजाराे मोबाइलची चोरी झाल्याचे पुढे आले आहे. मोबाइल चोरीची तक्रार देण्यासाठी विश्रामबाग पाेलिस ठाणे, संभाजी पाेलिस चाैकी, फरासखाना पाेलिस ठाण्यात शुक्रवारी नागरिकांची गर्दी झाली होती.
१ लाख एलईडी बल्बनी सजला दगडूशेठचा रथ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या १२७ व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाच्या सांगता मिरवणुकीसाठी १ लाख २१ हजार एलईडी बल्बनी साकारलेल्या श्री विकटविनायक रथात विराजमान झालेली श्रींची मूर्ती.
'गणेशाचे कलात्मक रूप खूप आवडते'

विदेशातून आलेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली भावना
गणपती ही भारतीय परंपरेत विद्येची, बुद्धीची देवता मानली जाते, मात्र या देवतेचा 'आर्ट फॉर्म' अधिक भावतो. विशेषत: बालवाडीतल्या चिमुकल्यांपासून ते कसलेल्या मूर्तिकारापर्यंत कुणीही या देवतेची मूर्ती साकारू शकते हे फार विलक्षण वाटते. पुण्यात काही ठिकाणी अगदी छोटी मुले मातीच्या गणेशमूर्ती तयार करताना पाहिली आणि गणेश देवतेमधील या कलात्मक रूपाच्या अनेक शक्यता जाणवल्या... खास गणेशोत्सवासाठी पुण्यात आलेल्या काही विदेशी विद्यार्थ्यांनी या भावना 'दिव्य मराठी' प्रतिनिधीजवळ व्यक्त केल्या.

ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इंग्लंड अशा देशांतून भारतात कलापर्यटनासाठी आलेल्या ग्रॅहम क्लर्ड, इयन रॉस, लुईस अलवर्झ, इझाबेल बेनेट, जॉर्ज क्रोल, मिलुहीन स्टेजोन आणि जेडेन मुरे यांनी प्रथमच पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीचा अनुभव घेतला. त्यांच्या मार्गदर्शन गार्सिका मॅडम यांनी या चमूला प्रत्यक्ष रस्त्यावर नेलेच नाही. जिथून मिरवणूक व्यवस्थित पाहता येईल अशा खासगी घरात गॅलरीत बसून या विद्यार्थ्यांनी विसर्जन मिरवणुकीचा आस्वाद घेतला. 'गणपतीची विविध रूपे पाहूनच आम्ही आश्चर्यचकित झालो. एकच देवता किती असंख्य रूपांनी इथे प्रकटते. प्रत्येक मूर्ती वेगळी, भाव निराळा..पण देवता एकच, हे फारच वेगळे आहे. आम्ही तर पाहून पाहूनच गणपतीचे चित्र काढायला शिकलो, असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...