आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे - माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हातात बॅट सोपवत आहेत...पण पवार ती बॅट पुन्हा चव्हाणांकडे देऊन बॉल हाती घेतात. टेनिस बॉल हातात घेऊन पवार चक्क पृथ्वीराज बाबांना गोलंदाजी करतात. हलक्या वेगाने पवारांनी टाकलेले चेंडूही चव्हाणांना टोलवता येत नाहीत हे पाहून उपस्थितांना हसू आवरत नाही....
शरद पवार यांचे सासरे अाणि महाराष्ट्राचे माजी रणजीपटू सदुभाऊ शिंदे यांच्या नावाने पुणे महापालिकेने क्रिकेट मैदान उभारले आहे. त्याचे उद्घाटन सोमवारी पवार आणि चव्हाण यांच्या हस्ते झाले. कार्यकर्त्यांनी उत्साहाने दोघांच्या हातात बॅट- बॉल देत त्यांना खेळायला लावले. त्यावेळी चव्हाण- पवार यांच्यातल्या लुटुपुटूच्या क्रिकेटची मजा उपस्थितांना अनुभवता आली. राजकीय पटलावर फारसा सलोखा नसलेल्या या नेत्यांमधल्या सामन्याची चर्चा उपस्थित 'कॉंग्रेस-राष्ट्रवादी'च्या कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती. कॉंग्रेस नेते उल्हास पवार, विश्वजित कदम, खासदार सुप्रिया सुळे आदी या वेळी उपस्थित होते.
चव्हाणांनी बॉल हातात घेत गोलंदाजीचा पवित्रा घेतला. पण चव्हाणांची इच्छा मोडत पवारांनी त्यांच्या हातातली बॅट चव्हाणांकडे सोपवली आणि चेंडू आपल्याकडे घेतला. पवारांनी दोन चेंडू चव्हाणांना टाकले. पण त्यातल्या एकाही चेंडूला चव्हाणांची बॅट लागली नाही. बॅट-बॉलचा खेळ झाल्यानंतर चव्हाण आणि पवारांनी राजकीय 'बोलंदाजी'ही केली. सहा वेळा नगरसेवकपदी निवडून आलेल्या आबा बागुल यांना उद्देशून चव्हाण म्हणाले, की आम्ही आता बागुलांना विधानसभेत पाठवण्याचे ठरवले आहे. चव्हाणांचा तो धागा पकडत पवार म्हणाले, 'बघू या बागुलांना मदत कशी करता येते. तिकीट देताना पक्षापेक्षा कर्तृत्व महत्त्वाचे मानून आम्ही तिकिटे देणार आहोत.'
'दि. ब. देवधर यांनी महाराष्ट्र क्रिकेटला दिलेले योगदान विसरता न येणारे आहे. नाना जोशी, रंगा सोहनी, वसंत रांजणे हे सदुभाऊ शिंदे यांच्यासोबत क्रिकेट खेळले होते. चंदू बोर्डे यांनी क्रिकेटमध्ये पुण्याचे नाव मोठे केले. भाऊसाहेब निंबाळकर यांनी तर डॉन ब्रॅडमनचे रेकॉर्ड तोडले असते, केवळ नऊ धावांनी ती संधी हुकली कारण लंचनंतर जुनागडचा संघ खेळण्यासाठी मैदानातच उतरला नाही,' अशा क्रिकेटमधल्या अनेक आठवणींना पवारांनी उजाळा दिला. आता श्रीमंतांची नव्हे तर गरिबाची मुले क्रिकेटमध्ये येत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून प्रशिक्षणासाठी पैसे घेऊ नका, अशी सूचनाही केली.
राममंदिर महत्त्वाचे की दुष्काळ : पवार
'अयोध्येच्या प्रश्नात किंवा त्याच्या वादात मला पडायचे नाही. मात्र खऱ्या प्रश्नापासून दूर जाण्याचे काम केले जात आहे. मूर्तीची उंची किती असावी यावर चर्चा करायची की दुष्काळावर,' असा प्रश्न शरद पवार यांनी केला. क्रिकेट मैदानाच्या उद्घाटनापूर्वी शरद पवारांनी धनकवडी येथे संविधान स्तंभाचे लोकार्पण केले. त्या वेळी ते बोलत होते. देशाचे संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना मूठभर लोकांच्या हातात पुन्हा सत्ता आणायची आहे, परंतु लोक तसे होऊ देणार नाहीत, असेही ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.